एकीकडे देशात करोना अजूनही नियंत्रणात आलेला नसताना केरळमध्ये आता झिका विषाणू आढळून आला आहे. एका गर्भवती महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही महिला ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, तिथल्याच काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले असता ते देखील पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं जात आहे. हा झिका विषाणू म्हणजे काय आणि तो कसा पसरतो? याचे लक्षणे आणि बचावाची कारणे आपण जाणून घेऊया…

झिका विषाणूचा संसर्ग हा डासांमुळे होणारा व्हायरल संसर्ग आहे. हा संसर्ग डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. एडीज डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांमध्ये विषाणू पसरवितात. गर्भवती महिलांवर झिका विषाणू प्रभाव करतो. यामुळे झिका विषाणूची लागण झालेल्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांमध्ये मायक्रोसेफॅली होऊ शकते. मायक्रोसेफली हा एक दुर्मिळ जन्म दोष आहे ज्यामध्ये बाळाचे डोके अपेक्षेपेक्षा लहान असते, जे मेंदूच्या विकासाच्या समस्यांशी संबंधित असू शकते.

झिका विषाणू कसा पसरतो? 

झिका विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने एडीस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हे डास सहसा दिवसा चावतात. एखाद्या व्यक्तीस डास लावल्यामुळे संसर्ग झाल्यास झिका विषाणू त्यांच्या रक्तात काही दिवस तर काही लोकांमध्ये जास्त काळ राहू शकतो. या संक्रमीत व्यक्तींना चावलेला डास इतर लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग पसरवू शकतो. झिका विषाणूचा संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध किंवा दूषित रक्त स्त्रोतांसारख्या इतर माध्यमांद्वारे होऊ शकतो.

हेही वाचा- जाणून घ्या : पावसाळ्यात नक्की कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?

झिका विषाणूची लक्षणे 

ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखी, शारीरिक अशक्तपणा, डोळे लाल होणे, उलटी, ही झिका विषाणूची लक्षणे आहेत. झिका विषाणूचा प्रसार होत असलेल्या प्रदेशातून परत आल्यावर आपल्याला लक्षणे दिसल्यास, वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे. झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणे अनेक इतर कारणांमुळे देखील दिसू शकतात. डॉक्टर आपली लक्षणे आणि प्रवासाच्या तारखांवर आधारित झिका विषाणू संसर्गाचे प्रारंभिक निदान करु शकतात.

उपचार

झिका विषाणूच्या संसर्गासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. उदाहरणार्थ, डॉक्टर ताप आणि डोकेदुखीसाठी औषधाची शिफारस करु शकतात. म्हणजेच आपल्याला असलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो.

हेही वाचा- पावसाळ्याच्या काळात घरात घोंगावणा-या माश्यांचा त्रास होतोय?; हे घरगुती उपाय करुन पाहा

बचावाची कारणे

डास अंधार असलेल्या ठीकाणी, ओलसर जागी किंवा साचलेल्या पाण्यात असू शकतात. त्यामुळे डास चावण्यापासून स्वताचा बचाव करावा. यासाठी, बग स्प्रेचा वापर करावा, मच्छरदाणीचा देखील उपयोग करावा. तसेच झिका विषाणूची लक्षणे दिसल्यास त्वरीत डाक्टरांशी संपर्क साधावा व योग्य उपचार घ्यावा. हा विषाणू करोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.