करोना महासाथीमुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. या महासाथीने एक प्रकारे भविष्यात काहीही होऊ शकते, याची कल्पनाच जगाला दिली आहे. असे असतानाच आता ‘झोंबी डीयर डीसिज’ या आजाराची सगळीकडे चर्चा होत आहे. प्राण्यांमध्ये पसरणाऱ्या या आजारामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात असून हा आजार भविष्यात माणसांनाही होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर झोंबी डियर डीसिज म्हणजे नेमकं काय? या आजाराची काय लक्षणं आहेत? या आजाराची मानवाला भीती आहे का? हे जाणून घेऊ या…
अमेरिकेत शेकडो प्राण्यांना लागण
झोंबी डियर डीसिज हा आजार प्राण्यांना होतो. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत शेकडो प्राण्यांना हा आजार झालेला आहे. तज्ज्ञांच्या मते हा प्राण्यांना होणारा आजार भविष्यातील मोठे संकट असू शकते. म्हणूनच जगाने या आजाराला तोंड देण्यासाठी तयार राहणे आवश्यक आहे, असे या तज्ज्ञांनी सांगितलेले आहे.
झोंबी डियर डीसिज काय आहे?
झोंबी डियर डीसिज या आजाराला ‘कोरोनिक वास्टिंग डीसिज’ (सीडब्ल्यूडी) असेदेखील म्हटले जाते. हा आजार प्रामुख्याने डियर, ऐल्क, कॅरिबू, रेनडियर, मूस अशा हरिणांच्या वेगवेगळ्या जातींना होत आहे. या आजाराची लागण झाल्यास सुरुवातीला प्राण्याचे वजन कमी होते, सुसूत्रता राखणे शक्य होत नाही, सुस्तपणा, तोंडातून लाळ येणे अशी लक्षणे दिसतात. अशा हरिणांना ‘झोंबी डियर’ म्हणतात.
आजाराची लक्षणं काय?
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार शरीरातील ‘प्रिओन’ नावाच्या प्रोटीनची मेंदू तसेच अन्य उतींमध्ये (टिश्यू) वाढ होते, ज्यामुळे अशक्तपणा येतो, प्राण्यांच्या हालचालीत बदल होतो, वागणुकीत बदल होतो. शेवटी अशा प्राण्यांचा मृत्यू होतो. सीडब्ल्यूडीच्या म्हणण्यानुसार हा आजार सर्वांत अगोदर १९६७ साली कोलोरॅडोमध्ये आढळला होता. तेव्हापासून हा आजार अनेक देशांत पसरलेला आहे.
झोंबी डियर डीसिज कसा पसरतो?
झोंबी डियर डीसिज झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसायला बराच कालावधी लागतो. एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याला या आजाराची लागण होते. एखादा प्राणी बाधित प्राण्याच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संपर्कात आल्यास हा आजार पसरतो किंवा वातावरणातील कण, माती, झाडे संक्रमित झाल्यामुळे किंवा संक्रमित प्राण्यांच्या मलमूत्राच्या संपर्कात आल्यावर अन्य प्राण्याला हा आजार होण्याची शक्यता असते.
अमेरिकेत आजाराचे प्रमाण वाढले
अलीकडच्या काळात अमेरिकेत या आजाराची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेतील वायोमिंग या राज्यातील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये या आजाराची लागण झालेले पहिले हरिण आढळले होते. एका शिकाऱ्याने या हरिणाची शिकार नोव्हेंबर महिन्यात केली होती. ते दोन वर्षांचे होते. तेव्हापासून हा आजार वायोमिंग राज्यातील साधारण ८०० मूस, एल्क आणि हरिणांमध्ये आढळला आहे. अमेरिकेतील एकूण ३१ राज्यांत या आजाराची लागण झालेली हरिणे आढळली आहेत.
दक्षिण कोरिया, कॅनडामध्येही लागण
उत्तर अमेरिकेच्या बाहेर नॉर्वे, फिनलँड, स्वीडनमध्येही या आजाराने ग्रस्त असलेली मूस आणि रेनडियर आढळली आहेत. दक्षिण कोरिया, कॅनडामध्येही सीडब्ल्यूडीची प्रकरणं आढळली आहेत.
हळूहळू मोठे होणारे संकट
या आजाराचा मानवांना धोका आहे का? असे विचारले जात आहे. कॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अद्याप माणसांना या आजाराची लागण झालेली नाही. तसे एकही उदाहरण अद्याप आढळलेले नाही. मात्र, तरीदेखील या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून झोंबी डियर डीसिजबद्दल काळजी घेण्याचे सांगितले जात आहे. “ब्रिटनमधील मॅड काऊ रोगामुळे एका रात्रीत गोष्टी कशा बदलू शकतात हे दाखवून दिलेले आहे. प्राण्यांमधून माणसांना आजार कसे होऊ शकतात ते आपण पाहिलेले आहे. त्यामुळे हा आजार माणसांना होईलच असे नाही. मात्र, संभाव्य स्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे”, असे झोंबी डियर डीसिजवर संशोधन करणारे डॉ. कोरी अँडरसन यांनी द गार्डीयन या वृत्तपत्राला सांगितले.
…तर माकडांना होऊ शकतो आजार
सध्या तरी या आजारावर मात कशी करायची हे कोणालाच माहिती नाही. काही अभ्यासानुसार या आजाराने ग्रस्त असलेल्या प्राण्याचे मांस खाल्ल्यास किंवा हा आजार झालेल्या प्राण्याच्या मेंदूंच्या संपर्कात आल्यास माकडांना हा आजार होऊ शकतो, त्यामुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे.