अर्जेंटिनामध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ५३ वर्षीय हावीर मिलेई विजयी झाले आहेत. मिलेई ५५.७ टक्के मते मिळवून विजयी झाले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच मिलेईदेखील उजव्या विचारसरणीचे समर्थक मानले जातात. सध्याच्या प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात एका नव्या राजकीय पर्वाचे आश्वासन देऊन, मिलेई यांनी मतदारांचे लक्ष स्वतःकडे वळविले आणि विजय मिळविला. मिलेई यांनी आश्वासक आश्वासने देऊन निवडणुकीत विजय मिळविला. पण, अर्जेंटिनाची गाळात रुतलेली अर्थव्यवस्था पुन्हा प्रगतिपथावर नेण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निषेध मत

अर्जेंटिनाच्या निवडणुकीचे विश्लेषण करणारे तज्ज्ञ रविवारच्या निकालाला (१९ नोव्हेंबर) ‘निषेध मत’ संबोधत आहेत. काही दशकांपासून अर्जेंटिनामध्ये आर्थिक गैरकारभार आणि भ्रष्टाचाराने टोक गाठले होते. अर्थव्यवस्था गाळात रुतल्यामुळे एका अनिष्ट चक्रात अर्जेंटिना देश फसला होता. अर्जेंटिनाचा महागाई दर १५० टक्क्यांवर पोहोचला. अर्जेंटिनाच्या पेसो चलनाची सातत्याने घसरण होत आहे, गरिबी वाढतेय आणि सरकारी तिजोरी जवळपास मोकळी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारचा निषेध म्हणून मतदारांनी वेगळा पर्याय निवडला असल्याचे सांगितले जाते. त्याला निषेध मत, अशी संज्ञा तज्ज्ञांनी वापरली आहे.

हे वाचा >> विश्लेषण : अर्जेंटिनामधील अध्यक्षीय निवडणुकीत ‘ट्रम्पभक्ता’ची सरशी? नेमके चित्र काय?

अर्जेंटिनाच्या राजकारणात १९४० पासून डाव्या-मध्यममार्गी विचारसरणीच्या पक्षांचा प्रभाव राहिलेला आहे. विल्सन सेंटर (वॉशिंग्टन) या संशोधन संस्थेतील अर्जेंटिनाच्या राजकारणाचे तज्ज्ञ असलेल्या बेंजामिन गेडन यांनी ‘द गार्डियन’ला माहिती देताना सांगितले की, सध्याची महाभयंकर आर्थिक परिस्थिती पाहता, उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून मोठा जुगार खेळलेला दिसत आहे. मध्यम-डाव्या विचारसरणीचे विद्यमान अर्थमंत्री सर्जिओ मास्सा यांना साधारणत: ४४ टक्के मते मिळाली आणि ते मिलेई यांच्याकडून पराभूत झाले.

आर्थिक सुधारणांसाठी मिलेई यांची आश्वासने काय आहेत?

“अर्जेंटिनाची घसरण थांबण्याचे दिवस आजपासून सुरू होत आहेत”, अशी प्रतिक्रिया मिलेई यांनी निकालानंतर दिली. मिलेई यांच्या विजयानंतर काही लोक त्यांना स्पॅनिश भाषेत ‘एल लोको’ असे संबोधित करीत आहेत. एल लोको म्हणजे वेडा किंवा विक्षिप्त. मिलेई यांनी निवडणुकीत जी काही आश्वासने दिली, त्यावरून त्यांच्या उपायांना अर्थव्यवस्थेला दिलेली ‘शॉक थेरपी’ म्हटले जात आहे. सत्ता मिळाली, तर देशाच्या मध्यवर्ती बँकेला टाळे ठोकू, सरकारी खर्च कमी करू आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सध्याचे चलन पेसो बंद करून डॉलर आणू, अशी आश्वासने त्यांनी दिली आहेत. ज्या देशाच्या चलनात दीर्घ काळापासून सातत्याने घसरण होत आहे, ज्यामुळे रोजच्या आर्थिक गरजा भागविणेदेखील कठीण झाले आहे, त्या ठिकाणी डॉलर हे चलन स्वीकारल्यामुळे तात्पुरते स्थैर्य लाभेल; पण त्यासाठी चलनविषयक स्वायत्तता पणाला लागू शकते.

अर्जेंटिना या एवढ्या मोठ्या देशाने स्वतःचे आर्थिक धोरण वॉशिंग्टनमधील धोरणकर्त्यांच्या मताप्रमाणे ठरविलेले नाही. त्यामुळे मिलेई म्हणतात त्याप्रमाणे डॉलर हे चलन स्वीकारले गेले, तर अर्जेंटिना देशासमोर संकट उभे राहू शकते.

राजकीय स्टंटबाजी

मिलेई पाच वर्षांपूर्वीच राजकारणात आले. त्याआधी टीव्हीवर त्यांनी बरीच प्रसिद्धी मिळविली होती. अर्थव्यवस्थेशी निगडित आणि लैंगिक विषयांवर भपकेबाज मते व्यक्त करून मिलेईंनी स्वतःकडे लक्ष वेधून घेतले होते. “प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी गती असते. माझ्याबद्दल बोलायचे झाल्यास मी प्रत्येक तीन महिन्यांतून काहीतरी बरळत असतो”, असे मिलेई यांनीच स्वतःबद्दल टीव्हीवर सांगितले होते.

आणखी वाचा >> अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत हावीर मिली यांनी मारली बाजी, नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

या वर्षीच्या सुरुवातीला निवडणुकीचा प्रचार करताना मिलेई यांनी मिरवणुकीत झाडे कापण्यासाठी वापरले जाणारे चेनसॉ हे यंत्र हाती घेऊन मिरविले होते. मी विद्यमान सरकारला कापून काढणार आहे, हे त्यांना यातून प्रतीकात्मकरीत्या दाखवायचे होते. २०२० साली मिलेई यांनी प्रचारासाठी एका लघु चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यातील शेवटच्या सीनमध्ये मिलेई यांनी मध्ययुगीन काळातील हातोडा हाती घेतला होता. एक बेरकी हास्य दाखवून मिलेई यांनी मध्यवर्ती बँकेच्या प्रतिमेवर हातोड्याने जोरदार प्रहार केला. हा प्रहार केल्यानंतर मिलेई यांच्या समर्थकांच्या ‘मोडून काढा’ अशा घोषणा व्हिडीओत ऐकू येतात.

त्याशिवाय मिलेई यांचा गर्भपाताला कट्टर विरोध आहे. हवामान बदलाच्या चळवळ ही ते समाजवादी थोतांड असल्याचे सांगतात, सत्ता मिळाल्यानंतर बंदूक वापरायच्या नियमांत शिथिलता आणू आणि शारीरिक अवयवांची खरेदी-विक्री कायदेशीर करू, अशी जहाल आश्वासने मिलेई यांनी दिली आहेत. तसेच मूळचे अर्जेंटिनाचे असलेल्या पोप फ्रान्सिस यांचेही ते कट्टर विरोधक आहेत.

सुसान मार्टिन्झा या ४२ वर्षीय शिक्षिकेने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मिलेई यांची धोरणे भीतीदायक आहेत. मास्सा यांनी आपले मत सुसान यांना दिले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What javier mileis win in argentinas presidential election means kvg