मेवाड राजघराण्यातील विश्वराज सिंह मेवाड यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर उदयपूर येथे दोन गटांत संघर्ष झाला आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. भाजपा आमदार विश्वराज सिंह मेवाड यांचा अभिषेक झाल्यानंतर काही तासांनंतर त्यांना उदयपूर सिटी पॅलेस येथे प्रवेश नाकारण्यात आला आणि इथूनच तणावाला सुरुवात झाली. सोमवारी (२५ नोव्हेंबर) सिटी पॅलेसच्या बाहेर हिंसक चकमक झाली आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्या. या महिन्याच्या सुरुवातीला विश्वराज सिंह मेवाड यांचे वडील महेंद्र सिंह मेवाड यांचे निधन झाले. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून विश्वराज सिंह यांच्या नियुक्तीनंतर हा वाद निर्माण झाला. घटनास्थळावरील काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये राजवाड्याजवळील तणावपूर्ण परिस्थितीचे चित्र पाहायला मिळत आहे. काय आहे नेमकं प्रकरण? राजघराण्यातील संघर्षाचे कारण काय? जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण काय?

मेवाडचे ७७ वे महाराणा म्हणून विश्वराज सिंह मेवाड यांच्या राज्याभिषेकानंतर, उदयपूरच्या ऐतिहासिक सिटी पॅलेसच्या बाहेर संघर्षाला सुरुवात झाली. सिंह यांना राजवाड्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. हा राजवाडा आता त्यांचे चुलत भाऊ लक्षराज सिंह मेवाड आणि काका अरविंद सिंह मेवाड यांच्या देखरेखीखाली असलेल्या ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केला जातो. आमदारांच्या समर्थकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली आणि राजवाड्याचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला, तर आतील लोकांनीही प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला. नाट्यमय दृश्यांमध्ये दोन्ही बाजूंनी दगडफेक होत असल्याचे दिसून आले. बेकायदा जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तीन जण जखमी झाले. परिस्थिती चिघळत असतानाच उदयपूरचे जिल्हाधिकारी अरविंद पोसवाल आणि पोलिस अधीक्षक योगेश गोयल हे गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती निवळण्यासाठी त्यांनी सिंह आणि त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला.

हेही वाचा : PAN 2.0: पॅन कार्डमध्ये होणार बदल; काय आहे पॅन २.० प्रकल्प? जुने कार्ड निरुपयोगी ठरणार?

“मालमत्तेचा वाद हा वेगळा विषय आहे, पण जे काही होत आहे ते पारंपरिक आणि कायदेशीर दोन्ही दृष्टिकोनातून चुकीचे आहे. मला मंदिरात जाण्यापासून रोखणे योग्य नाही,” असे त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. दरम्यान, उदयपूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलच्या चिंतेकडे लक्ष वेधून ‘एक्स’वर एक पोस्ट केली. “पोलिस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी उपस्थित आहेत, परिस्थिती नियंत्रणात आहे,” असे त्यात सांगण्यात आले. पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी अरविंद पोसवाल यांनी आश्वासन दिले की, “कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. राजवाड्याच्या प्रतिनिधींबरोबरच सोसायटीच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू होती. आम्ही काही मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे, तर काही मुद्द्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे.”

भाजपा आमदार विश्वराज सिंह मेवाड यांचा अभिषेक झाल्यानंतर काही तासांनंतर त्यांना उदयपूर सिटी पॅलेस येथे प्रवेश नाकारण्यात आला आणि इथूनच तणावाला सुरुवात झाली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

उदयपूरमध्ये संघर्ष कशामुळे झाला?

हा संघर्ष म्हणजे मेवाड शाही वंशामध्ये दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक वादाचा परिणाम आहे. मेवाड राजघराण्याचे नव्याने घोषित केलेले वारस विश्वराज सिंह मेवाड यांना सिटी पॅलेसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले तेव्हा तणाव वाढला; ज्यामुळे त्यांचे चुलत भाऊ लक्षराज सिंह मेवाड आणि त्यांचे काका अरविंद सिंह मेवाड यांच्याशी संघर्ष झाला. विश्वराज सिंह यांच्या समर्थकांनी जबरदस्तीने राजवाड्यात घुसण्याचा प्रयत्न केला, परिणामी दोन्ही बाजूंनी हाणामारी आणि दगडफेक झाली. राजसमंद येथील भाजपा आमदार विश्वराज सिंह यांचा त्यांचे वडील महेंद्रसिंह मेवाड यांच्या निधनानंतर १२ दिवसांनी चित्तोडगड किल्ल्यात पारंपरिक समारंभात मेवाडचे ७७ वे महाराणा म्हणून औपचारिकपणे राज्याभिषेक करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, विश्वराज सिंह यांच्या पत्नी महिमा कुमारी राजसमंद मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत.

शतकानुशतके जुन्या परंपरेवर आधारित राज्याभिषेकात ‘राज टिळक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्त विधीचाही समावेश होता. या समारंभादरम्यान एका कुलीन व्यक्तीने तलवारीने आपले बोट कापले आणि विश्वराज यांचा अभिषेक करण्यासाठी रक्ताचा वापर करण्यात आला, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले. समारंभानंतर, विश्वराज सिंह यांना कौटुंबिक देवतांचे आशीर्वाद घ्यायचे होते . राजवाड्यातील धुनी माता मंदिर आणि उदयपूरपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेले एकलिंग शिव मंदिर आहे. परंतु, त्यांना सिटी पॅलेसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला, कारण मंदिरं त्यांचे चुलत भाऊ आणि काका यांच्या नेतृत्वाखालील ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केली जातात. त्यांच्याबरोबर फक्त काही लोकांना राजवाड्यात येण्याची परवानगी देण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्नही अयशस्वी ठरला.

विशेष म्हणजे, मेवाड राजघराण्याची नवीन पिढी राजवाडे, मंदिरे आणि किल्ल्यांसह शाही मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत कायदेशीर वादात गुंतलेली आहे, ज्यावर आता विश्वराज यांच्या नातेवाईकांच्या नियंत्रणात नऊ ट्रस्ट आहेत, असे वृत्त ‘मीडिया आउटलेट’ने दिले आहे. या संघर्षाची सुरुवात १९८४ मध्ये झाली, जेव्हा मेवाडचे माजी महाराणा भागवत सिंहजी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अरविंद सिंह यांची ट्रस्टचे संचालक म्हणून नियुक्ती केली. त्यांचा मोठा मुलगा महेंद्र सिंह याला बाजूला केले आणि परिणामी शाही मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यावरून सतत तणाव निर्माण झाला. आता महाराणा मेवाड चॅरिटेबल ट्रस्टने सार्वजनिक नोटीस जारी करून ट्रस्टच्या आवारात प्रवेश करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांविरुद्ध इशारा दिला आहे. हा शाही मालमत्तेवर अतिक्रमण करण्याचा आणि नुकसान करण्याचा प्रयत्न असू शकतो, असे त्यांचे सांगणे आहे, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.

हेही वाचा : बांगलादेश पोलिसांनी दहशतवादी म्हणत ताब्यात घेतलेले इस्कॉनचे चिन्मय कृष्णा दास कोण आहेत?

परिस्थितीबाबत प्रशासनाची भूमिका काय?

राजवाड्यात प्रवेश नाकारल्यानंतर विश्वराज सिंह आणि त्यांचे समर्थक सिटी पॅलेसपासून काही मीटर अंतरावर असलेल्या जगदीश चौकात गेले. वाढत्या तणावादरम्यान, पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला; ज्यात सिटी पॅलेस परिसरात बाली पोळ ते धुनीपर्यंतच्या भागासाठी रिसीव्हर नेमण्याची शिफारस केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अरविंद सिंह यांच्या मुलाशीही चर्चा केली. मात्र, चर्चा अनिर्णित राहिली. दोन्ही पक्षांमध्ये बोलणी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अरविंद पोसवाल यांनी सांगितले. पोसवाल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “पक्ष लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे.” ते पुढे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने वादग्रस्त धुनी माता मंदिराची जागा रिसीव्हरशिपमध्ये घेतली आहे. “धुनी माता मंदिराची वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाल केली आहे. जर दोन्ही गटांपैकी एकाला गुन्हा नोंदवायचा असेल तर तो नोंदविला जाईल,” असे पोसवाल म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What led to the mewar royal family clash at udaipur palace rac