भारतात कचऱ्याचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. बीबीसीच्या एका तपासणीत, ब्रिटनमधून भारतात लाखोंच्या संख्येत टायर्सची निर्यात होत असल्याचे आढळून आले आहे. हे टायर्स तात्पुरत्या भट्टीत वितळवले जात आहेत. त्यामुळे गंभीर आरोग्य धोके आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. बीबीसीच्या तपासात नक्की काय आढळून आले? ब्रिटनमधून लाखो टाकाऊ टायर्सच्या निर्यातीचे कारण काय? त्याचा काय परिणाम होत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
देशात वाढत्या कचऱ्याचे संकट
या उद्योगातील काही सूत्रांनी ‘बीबीसी फाइल ऑन ४ इन्व्हेस्टिगेट्स’ला सांगितले की, ब्रिटन दरवर्षी सुमारे ५० दशलक्ष टाकाऊ टायर्स तयार करते, ज्यापैकी निम्मे टायर्स परदेशांत पाठवले जातात. त्यापैकीही बहुतेक टायर्स भारतात येतात. हे रिसायकलिंग उद्योगातील गुपित आहे. सोर्समटेरियल पत्रकारिता गटाच्या सहकार्याने केलेल्या तपासणीत असे दिसून आले की, कायदेशीर रिसायकलिंग सुविधांमध्ये प्रक्रिया करण्याऐवजी, या टायर्सचा मोठा साठा पायरोलिसिस प्लांटमध्ये वळवला जातो. हे प्लांट फार पूर्वीपासून भारतातील गंभीर असलेल्या हवेची गुणवत्ता खराब करीत आहेत आणि गंभीर आरोग्य धोके निर्माण करत आहेत.

विषारी पायरोलिसिसचा धोका
या तात्पुरत्या औद्योगिक युनिट्समध्ये टायर्सचे पायरोलिसिस केले जाते. पायरोलिसिस ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत टायर्सला ऑक्सिजनरहीत वातावरणात सुमारे ५०० अंश सेल्सिअस तापमानात वितळवले जाते. या प्रक्रियेत तेल बाहेर पडते, ज्याचा वापर विविध उद्योगांमध्ये केला जातो. विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कार्बन ब्लॅकचे उत्सर्जनही या प्रक्रियेतून केले जाते. परंतु, नियमन आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अभावामुळे या प्रक्रियेतून विषारी वायू आणि घातक रसायने उत्सर्जित होतात.
अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, यातील उत्सर्जन पाण्याचे स्रोत दूषित करते, आजूबाजूच्या वनस्पतींवर त्याचा परिणाम होतो आणि हे उत्सर्जन जीवघेण्या श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरते. या कारखान्यांच्या जवळपास राहणारे रहिवासी या उत्सर्जनामुळे त्रस्त असल्याचेही या तपासात समोर आले आहे. अनेक काळ रासायनिक धुराच्या संपर्कात राहिल्यामुळे सतत खोकला, डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. “आम्हाला या कंपन्या आमच्या गावातून हलवायच्या आहेत; अन्यथा आम्हाला मुक्तपणे श्वास घेणे कठीण होईल,” असे मुंबईबाहेरील वाडा येथील एका रहिवाशाने ‘बीबीसी’ला सांगितले.
भारत सरकारने आयात केल्या जाणाऱ्या टायर्सच्या पायरोलिसिसवर बंदी घातली आहे. ब्रिटनहून भारतात जाणाऱ्या टाकाऊ टायर्सच्या शिपमेंटमध्ये ट्रॅकर्स लपवून एका संस्थेच्या मदतीने बीबीसीने हा तपास केला आहे. तपासादरम्यान टायर्स जळणाऱ्या कंपनीशी जेव्हा संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी म्हटले की, ते जे करत आहेत, ते धोकादायक किंवा बेकायदा नाही. अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील २,००० पायरोलिसिस प्लांटपैकी जवळजवळ निम्मे बेकायदा आहेत.
भारतातील टायर रिसायकलिंगचा काळा बाजार
ब्रिटनमधील निर्यात केले गेलेले टायर्स अधिकृतपणे रिसायकलिंग केंद्रांकडे पाठवले जातात, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, त्यापैकी बहुतेक टायर्स भारतातील काळ्या बाजारात जातात. टायर रिकव्हरी असोसिएशन (टीआरए)नुसार, आयात केलेले सुमारे ७० टक्के टायर परवाना नसलेल्या कंपन्यांकडे जातात. ब्रिटनमधील टायर रिसायकल करणारे इलियट मेसन यांनी बीबीसीला सांगितले की, हे टायर्स योग्यरीत्या रिसायकलिंग केले जात नाहीत, हे या उद्योगातील सर्वांना ठाऊक असणारे गुपित आहे. पुरवठा साखळीची माहिती मिळावी म्हणून बीबीसीने टायर शिपमेंटमध्ये जीपीएस डिव्हाइस लपवले होते. ट्रॅकर्समध्ये स्पष्ट दिसून आले की, टायर्स भारतातील दुर्गम भागात बेकायदा पायरोलिसिस साइट्सवर पोहोचले. त्या ठिकाणी त्यांना असुरक्षित परिस्थितीत जाळले जात होते; ज्यामुळे हवेत हानिकारक प्रदूषक उत्सर्जित होत होते.
बीबीसीने लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील शास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्यांनी म्हटले आहे की पायरोलिसिस प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना हृदयरोग, श्वसन, तसेच काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका असतो. अहवालात असेही उघड झाले आहे की, टायर्स निर्यात करणाऱ्या ब्रिटनमधील अनेक कंपन्या त्यांना परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त शिपमेंट पाठवतात. ब्रिटनमधील टायर्सच्या भारतात निर्यातीशी संबंधित एका व्यक्तीला बीबीसीने प्रश्न विचारला. त्याला विचारण्यात आले की, टायर्समुळे भारतीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत, यावर त्यांचे मत काय. या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला, “हे मुद्दे आंतरराष्ट्रीय आहेत. आपण काहीही करू शकत नाही आणि मी आरोग्यमंत्री नाही.”
आरोग्यावर घातक परिणाम
जानेवारी महिन्यात मुंबईजवळील वाडा येथील अशाच एका पायरोलिसिस प्लांटमध्ये स्फोट झाला. या स्फोटात दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. या प्लांटमध्ये युरोपमधून आणण्यात आलेल्या टायर्सवर प्रक्रिया केली जात होती. ही प्रक्रिया होत असताना मूलभूत सुरक्षा उपायांचाही अभाव होता. या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी या प्रदेशातील सात प्लांट बंद केले होते.
परंतु, पर्यावरण कार्यकर्त्यांचा असा अंदाज आहे की, संपूर्ण भारतात बेकायदा स्वरूपाचे शेकडो पायरोलिसिस प्लांट आजही सुरू आहेत. या प्लांटमुळे वायुप्रदूषणाचे संकट आणखी बिकट होत आहे. भारत सरकारने पायरोलिसिसमध्ये आयात केलेल्या टायर्सच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य रीत्या झाली, असे दिसत नाही, बीबीसीने मुलाखत घेतलेल्या एका पर्यावरण तज्ज्ञाच्या मते, देशातील २,००० पायरोलिसिस प्लांटपैकी सुमारे निम्मे प्लांट परवाना नसलेले आहेत. त्यामुळेच प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले आहे.