मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशात कारवाई करून मेफेड्रोन अर्थात एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केला. भारतातील ग्रामीण भागांमध्ये रासानिक कारखान्यांच्या नावाखाली एमडीची निर्मिती करण्यात येत आहे. काही ठिकाणी अगदी शेतघरातही एमडी तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले असून मुंबई पोलिसांनी गेल्या तीन वर्षांत सातहून अधिक कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. पण त्यानंतही एमडीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी साडेचारशे कोटी रुपयांहून अधिक किमतीचा एमडी जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत किती एमडी जप्त?

नाशिक, सोलापूर, नालासोपारा, सांगली, कोल्हापूर, तसेच उत्तर प्रदेशातून एमडीची निर्मिती करणारा प्रत्येक एक आणि गुजरातमधील दोन कारखाने अशा एकूण आठ कारखान्यांवर छापे टाकून ते टाळेबंद करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या दोन वर्षांमध्ये एमडी तस्करी व विक्रीबाबत ४९५ गुन्ह्यांची नोंद केली. या गुन्ह्यांमध्ये ७१८ आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये १० कोटी रुपये किमतीचे एमडी जप्त केले होते. २०१९ मध्ये तीन कोटी, २०२० मध्ये पाच कोटी २१ लाख, २०२१ मध्ये ३२ कोटी २९ लाख रुपये किमतीचे, तर २०२४ मध्ये ४५० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एमडी जप्त करण्यात आले.

एमडीच्या मागणीत एवढी वाढ का?

एमडी हा एक रासायनिक अमली पदार्थ आहे. बहुतांशी तो पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाच्या भुकटीच्या स्वरूपात, तर काही वेळा कॅप्सूलच्या स्वरूपात वितरित होतो. त्यामुळे तोंडावाटे गिळून खाता येतो अथवा नाकातून ओढता येतो. व्यसनी मंडळी पानमसाला वा इतर पदार्थांसोबत त्याचे सेवन करतात. एमडी हा पदार्थ साधारण २००० नंतर वितरित होऊ लागला. सुरुवातीला त्याला अमली पदार्थ म्हणून घोषित करण्यात आले नव्हते. प्रतिबंधित नसल्यामुळे राजरोसपणे त्याची निर्मिती व विक्री केली जात होती. त्याचा प्रभाव कोकेनसारखाच असतो. मात्र कोकेनपेक्षा एमडीची किंमत तुलनेने कमी आहे. तसेच एमडीच्या निर्मितीसाठी लागणारी रसायने सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. त्यामुळे एमडीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मुंबई पोलिसांची उत्तर प्रदेशाही कारवाई?

मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशात केलेल्या कारवाईत मेफेड्रोन (एनडी) निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. साकीनाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सात दिवस तपास करून साकीनाका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी इस्राईल अब्दुल सुभान शेखला अटक केली. त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून याप्रकरणी जसीम उर्फ चिकू शकील शेखला तळोजा व प्रदीप उर्फ चिकू वीरेंद्र हरिजनला नालासोपारा येथून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील मोहम्मद गौस उर्फ मोनू इद्रिसी या तिन्ही आरोपींच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. तो आरोपी वावर, बस्ती जिल्हा, वाराणसी, लखनऊ उत्तर प्रदेश येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे साकिनाका पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशाला रवाना झाले. त्यांनी इद्रीसचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी ठिकाण बदलत होता. सलग सात दिवस आरोपीचा बस्ती, आझमगड, वाराणसी, मिर्झापूर, सुल्तानपूर असा पाठलाग करून त्याला लखनऊ येथे ताब्यात घेण्यात आले. आरोपीला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने एमडी बनविणाऱ्या आरोपीचे नाव सांगितले. चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे लखनऊ येथे सापळा रचून आरोपी अखिलेश प्रताप सिंहला अटक करण्यात आली. लखनऊ येथील गोसियागंज येथील शिवलार चौराहा परिसरात एमडी बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती त्याने चौकशीत पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी कारखान्यातून १० कोटी १८ हजार रुपये किमतीचे एमडी व इतर साहित्य हस्तगत केले. त्यात ५ किलो ५८० ग्रॅम वजनाचा द्रवरूप एमडी (किंमत ९ कोटी रुपये) व ५०० ग्रॅम एमडी (एक कोटी रुपये) आणि १८ हजार रुपयांच्या इतर मुद्देमालाचा समावेश आहे.

एमडीचे व्यसन कसे लागते?

विक्रेते तरुणांना अमली पदार्थांचे खोटे फायदे सांगतात. त्याला बळी पडून अनेकजण व्यसनाधीन होतात. मेफेड्रोनमुळे झिरो फिगर मिळते व ऊर्जा मिळते असा अपप्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व तासनतास नाचण्यासाठी बारबाला सध्या मोठ्या प्रमाणात एमडीचा वापर करीत आहेत. सुगंधी सुपारी, पानमसाला यामध्ये मिसळून बारबाला एमडीचे सेवन करीत आहेत. सध्या ५० टक्‍क्‍यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी गेल्या आहेत. याशिवाय महाविद्यालयातील तरुण पिढीला या जाळ्यात ओढण्यासाठी एमडीमुळे झोप येत नाही, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता, त्वचा सतेज राहते असे पसरवण्यात येते. चार-पाच वेळा एमडीचे सेवन केल्यानंतर त्याचे व्यसन लगते. मग विक्रेते त्यांना या ड्रग्जच्या विक्रीत गुंतवतात. अशा विद्यार्थांच्या मदतीने ते इतर विद्यार्थांनाही या नशेच्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी विशेष कारवाया करून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त केले आहे.

एमडीचे दुष्परिणाम काय आहेत?

एमडी हे हळूहळू शरीरात पसरणारे विष म्हणता येईल. सुरुवातील शरीरात एखादी ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतर मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा असे आजार जडतात. त्यानंतर तडफडून त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तसेच एमडीचे सेवन अचानक बंद झाले की सुरुवातीला हातपाय थरथरणे, डोकेदुखी, संभ्रम निर्माण होणे, कासावीस होणे आदी त्रास व्हायला सुरुवात होतो. काहींना फिट्‌सही येतात, तर काहींचा मृत्यूही होतो. भूक मंदावते, निद्रानाश असे अनेक दुष्परिणाम आहेत. एमडी या अमली पदार्थाचे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तीचा तर दोन ते तीन वर्षांनी मृत्यू होतो.

राज्याबाहेर का कारवाई?

एमडीच्या विक्रीत २०१० दरम्यान प्रचंड वाढ झाली होती. पण भारतात त्याला प्रतिबंधित घोषित करण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणेही कठीण होत होते. अमली पदार्थ विरोधी पथकात २०१४-१५ दरम्यान कार्यरत तत्कालीन पोलीस अधिकारी सुहास गोखले यांच्या पुढाकाराने एमडी हा अमली पदार्थ घोषित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला. तो केंद्रात पाठवण्यात आला. फेब्रुवारी २०१५ मध्ये एमडीचा अमली पदार्थ म्हणून कायद्यात समावेश करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी एमडीविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केली. ग्रामीण व छोट्या शहरांमध्ये एमडीची निर्मिती करून त्याचे मुंबईसारख्या शहरांमध्ये वितरण केले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी एमडी वितरणाची ही साखळी मोडीत काढण्याचा निर्धार केला आणि राज्याबाहेर जाऊन एमडीविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.