Punishment for rape in ancient India? आधी कोलकाता मग बदलापूर अशा लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना आहे. लहान मुली-महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचा रांझ्याच्या पाटलाचा हात-पाय कापून जसा चौरंग केला होता, तसा चौरंगा केला पाहिजे असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते.
गेल्या वर्षी मणिपूर मधील कुकी महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकूणच समाजाच्या विविध माध्यमातून या प्रसंगाची निंदा, निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या, आताही लोकांकडून निषेध होत आहे. विशेष म्हणजे मणिपूर प्रकरणात आरोपींना दोन महिने उलटून गेल्यानंतरही अटक झाली नव्हती. या दंगलीत मतैइ स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले होते. हे केवळ याच प्रसंगात घडलय असं नाही, आज तागायत घडलेल्या अनेक बलात्कारांच्या प्रसंगात हीच स्थिती आढळून येते. बलात्कार घडतो, चर्चा होत राहतात, तत्क्षणी प्रतिक्रियांचा भडीमार होतो; ज्या वेगाने प्रतिक्रिया येतात त्याच वेगाने ते प्रकरण शांतही होते. अशा प्रकारे प्रसंग कुठलाही असो स्त्री ही पिळवणूक करण्यासाठी सहज आणि सोपी म्हणून तिच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जातात.
दिल्लीच्या निर्भया बलात्कार प्रकरणातही हेच निदर्शनास आले. किंबहुना ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तीच कशी चुकीची आहे, याचे दाखले दिले जातात. निर्भया बलात्काराच्या प्रकरणात आरोपींच्या वकिलाने प्राचीन संस्कृतीचा दाखला देवून बाईने घरातच, पडद्यामागे कसे राहावे याविषयी उघड मत मीडियासमोर व्यक्त केले होते. महिलांच्या बाबतीत झालेल्या घटनांमध्ये काहींकडून छुप्या मार्गाने याचे समर्थन केले जाते. एकूणच आपल्या स्वार्थासाठी प्राचीन भारतीय संस्कृतीचे दाखले देण्याचा सध्या ट्रेण्डच आला आहे. त्यामुळे खरंच प्राचीन भारतातले नियम लागू केल्यास काय घडू शकते?, प्राचीन भारतात बलात्कार, विनयभंग यांविषयी कोणती शिक्षा दिली जात होती आणि त्या शिक्षा आजही अमलात आणता येवू शकतात का? हे या पार्श्वभूमीवर पाहणे महत्त्वाचे ठरावे.
आणखी वाचा: विश्लेषण: म्यानमारच्या कोको बेटांवरून चीनची भारतावर नजर! नेमके काय घडते आहे?
सामूहिक बलात्कार- अपराध
कुकी महिलांच्या प्रकरणात सामूहिक अत्याचार झाला आहे. कोलकाता आणि बदलापूरनंतर बलात्काराची अनेक प्रकरणं समोर आली. किंबहुना बलात्कारांची प्रकरणे वाढतच आहेत. लैंगिक अत्याचाराविषयी वेगवेगळ्या प्राचीन भारतीय वाङ् मयात सविस्तर चर्चा आढळते. पा. वा. काणे यांच्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे, “इतरांना अपराध करण्याची चिथावणी देणाऱ्याला अपराध करणाऱ्याच्या दुप्पट शिक्षा करावी आणि अपराध्याला अपराध करण्यासाठी द्रव्य देणाऱ्याला चौपट शिक्षा करावी, असा उल्लेख ‘याज्ञवलक्य स्मृती’मध्ये आढळतो”. अनेक लोकांनी मिळून बलात्कार करून वध केला असेल तर त्यांना खुनी समजावे, जे लोक अपराधाला प्रारंभ करता, अथवा त्या अपराधाला साह्य करतात, त्यांना प्रत्यक्ष अपराध करणाऱ्याच्या निम्मी शिक्षा द्यावी. तसेच अपराध करण्यासाठी धन देणारा, अपराध रोखण्याची क्षमता असतानाही अपराध न रोखणारा, अशा व्यक्तींना कठोर दंड करण्यात यावा, असे कात्यायन आणि बृहस्पती सांगतो.
स्त्रीसंग्रहण
एखाद्या स्त्रीसोबत तिच्या मर्जीविरुद्ध ठेवण्यात आलेल्या संबंधाला वेगवेगळ्या कठोर शिक्षा प्राचीन वाङ् मयात देण्यात आल्या आहेत. या शिक्षांचा उल्लेख ‘स्त्रीसंग्रहण’ या संज्ञेअंतर्गत करण्यात येतो. असे संग्रहण बलात्काराने, फसवून आणि विषयभोगाच्या इच्छेने अशा तीन प्रकाराने घडवून आणलेले असते. काही स्मृतींनुसार बलात्कारासाठी देण्यात येणारी शिक्षा स्त्री कुमारिका की विवाहीत; संरक्षित आहे की असंरक्षित यावरून ठरत असे. किंबहुना काही स्मृतिकार शिक्षेचे वर्णानुसार भेद देतात. इतकेच नाही तर स्व-वर्ण बलात्कार हाही शिक्षेस पात्र मानण्यात आला आहे. अशा वेळी देण्यात येणारी शिक्षा कठोर असल्याचे लक्षात येते. या शिक्षेनुसार पुरुषाची सर्व मालमत्ता जप्त करण्यात येत होती, तसेच त्याचे शिश्न आणि वृषण कापून गाढवावर बसून त्याची धिंड काढण्यात येत असे.
मृत्यूपूर्वीच्या शिक्षा व मृत्यूनंतरच्या शिक्षा
बलात्काऱ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेविषयी मनुस्मृती आणि गरुड पुराणात सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. मनुस्मृतीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने स्त्रियांचे (तिच्या मनाविरुद्ध) अपहरण केले, तर या गुन्ह्यासाठी राजाने त्याला देहदंड दिला पाहिजे. मनुस्मृती म्हणते की, अपराध्याला जाळून मारले पाहिजे आणि शिवाय ही शिक्षा राजाने लवकरात लवकर अमलात आणली पाहिजे. राजा व्यग्र असेल तर समाजातील अधिकृत व्यक्तीकडून शिक्षा दिली जाणे आवश्यक आहे.
मनुस्मृतील शिक्षेचा संदर्भ
महिलांचे अपहरण करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
स्त्रिया, मुले किंवा विद्वान सत्पुरुषांची हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
जे लोक महिलांवर बलात्कार करतात किंवा त्यांचा विनयभंग करतात किंवा त्यांना व्यभिचारासाठी प्रवृत्त करतात त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी, ज्यामुळे इतरांना अशा गुन्ह्याचा विचार करण्याची देखील भीती निर्माण होईल.
एखाद्याने खोटे आरोप केल्यास किंवा आई, पत्नी किंवा मुलीची बदनामी केल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे.
जे लोक आपल्या आई, वडील, पत्नी किंवा मुलांना कोणत्याही वाजवी कारणाशिवाय सोडून देतात त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
भेटवस्तू (स्त्रीला) अर्पण करणे, (तिच्याशी) छेडछाड करणे, तिच्या दागिन्यांना आणि पोशाखांना स्पर्श करणे, तिच्यासोबत अंथरुणावर बसणे, ही सर्व कृत्ये व्यभिचार (संग्रहण) समजली जातात.
(नियम असताना) तरीही जो स्त्रियांशी गुप्तपणे संभाषण करतो किंवा एखाद्याच्या (मालकाने) स्त्री दासीशी आणि स्त्री संन्यासनिसी गुप्तपणे संभाषण करतो, (असे आढळल्यास) त्याला काहीप्रमाणात दंड भरावा लागेल.
परंतु जर एखाद्या पुरुषाने बळजबरीने एखाद्या मुलीला दूषित केले तर त्याची दोन बोटे त्वरित कापली जातील आणि त्याला सहाशे (पानस- तत्कालीन चलन) दंड भरावा लागेल.
स्त्रीला अपवित्र करणार्या महिलेचे ताबडतोब (तिचे डोके) मुंडण किंवा दोन बोटे कापून गाढवावर बसवून (नगरातून) आणले जावे.
गुन्हा (बलात्कार) केला आहे त्या पुरुष गुन्हेगाराला लाल-गरम लोखंडी पलंगावर जाळावे; त्याचे पाप जाळले जाईपर्यंत त्याला तिथेच ठेवावे.
आणखी वाचा: व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)
गरुड पुराणातील संदर्भ
गरुण पुराणानुसार बलात्कार करणाऱ्याला दुष्ट सापांमध्ये फेकून दिले पाहिजे, त्याला प्राण्यांकडून चिरडले पाहिजे. गरुड पुराणात बलात्काऱ्यांना दोन प्रमुख प्रकारच्या शिक्षा आहेत. पहिल्या वर्गात महिलांवर बलात्कार करणाऱ्या लोकांचा समावेश होतो आणि दुसऱ्या वर्गात प्राण्यांवर बलात्कार करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. गरुण पुराणात नमूद केल्याप्रमाणे स्त्रियांवर बलात्कार करणार्या अशा लोकांना नरकातल्या पशूप्रमाणे समजले जाते आणि त्यांना नरकात मलमूत्र, रक्त, कफ, विषारी कीटक आणि प्राणी असलेल्या विहिरीत फेकून दिले जाते आणि त्यांची वेळ येईपर्यंत त्यांना तेथेच राहावे लागते.
(हे पौराणिक संदर्भ असले तरी मध्ययुगीन काळातील देण्यात आलेली “चौरंगा’ ही शिक्षा विशेष प्रसिद्ध होती.)
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला चौरंगा
शिवाजी महाराज त्यांच्या स्त्री दाक्षिण्याविषयी प्रसिद्धच आहे. स्त्रियांचा अवमान शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारे खपवून घेतला नाही, असे स्पष्ट केले होते. महाराजांनी स्त्रियांना दिलेल्या मानाचे अनेक प्रसंग प्रसिद्ध आहेत. पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खेडशिवापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर रांझे गाव आहे. रांझे गावचा पाटील, भिकाजी गुजर याला दिलेली शिक्षा तर जगजाहीर आहे. ही शिक्षा चौरंगा म्हणून ओळखली जाते. भिकाजी पाटील याने केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी महाराजांनी त्याचे हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली होती. याच शिक्षेला ‘चौरंगा करणे’ असे म्हणतात. शिक्षेचा धाक इतका होता की, त्यानंतर अशा स्वरूपाचे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.
त्यामुळेच चुकीच्या गोष्टींसाठी संस्कृतीचे दाखले देणाऱ्यांनी आपल्या संस्कृतीत कठोर दंडही अमलात आणल्या जात होत्या, हे विसरता काम नये.