‘एनपीसीआय’चा तो नियम कशासाठी?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या नियामकाद्वारे ‘यूपीआय’ ही देयक व्यवहार पद्धती संचालित केली जाते.‘एनपीसीआय’ डिजिटल देयक कंपन्यांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’मार्फत पार पडणाऱ्या एकूण व्यवहार संख्येच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा राखण्याची कोणत्याही एका कंपनीला परवानगी नसेल, असे जाहीर केले होते. या क्षेत्रात लहान डिजिटल देयक कंपन्यांनादेखील व्यवसायसुलभ वातावरण निर्माण व्हावे, यासाठी हा प्रयत्न होता. डिसेंबर २०२४ पर्यंत हा आदेश सर्व डिजिटल देयक कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आला होता. सध्या देशात डिजिटल देयक सुलभ करण्यासाठी गूगलपे आणि फोनपे या दोन अॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. दोन्ही कंपन्यांनी ८५ टक्के बाजारहिस्सा व्यापला आहे. तर एकट्या फोनपेचा बाजारहिस्सा हा ५० टक्क्यांहून अधिक आहे. ‘यूपीआय’ हे माध्यम केवळ एक-दोन कंपन्यांहाती राहू नये, भारतातील ‘यूपीआय’ व्यवहार एकाधिक पेमेंट अॅपमध्ये विभागले जावेत, यासाठी हा नियम होता.
‘गूगलपे’, ‘फोनपे’ला दिलासा काय?
‘एनपीसीआय’ने डिजिटल देयक कंपन्यांसाठी बाजारहिस्सा ३० टक्क्यांवर मर्यादित राखण्यासाठी मुदत दोन वर्षांनी वाढवून, डिसेंबर २०२६ अशी केली आहे. ‘गूगलपे’ (३७ टक्के बाजारहिस्सा) आणि ‘फोनपे’ (४७.८ टक्के बाजारहिस्सा) कंपन्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या दोन कंपन्यांखेरीज व्यतिरिक्त देशात पेटीएम, नावी, क्रेडिट, भीम, व्हॉट्सअॅप पे आणि अॅमेझॉन पेसारख्या कंपन्यादेखील देयक सेवा पुरवतात. या सर्वांचा एकत्रित बाजारहिस्सा हा ३० टक्क्यांहून कमी आहे.
हेही वाचा : गेल्या १५ डावांत एकदा ५०, दोनदा २०… अपयशी रोहितची सिडनी कसोटी अखेरची? कर्णधारपदासाठी दावेदार कोण?
पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे म्हणणे?
देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल देयक प्रणाली पोहोचवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. डिजिटल इंडियाच्या यशासाठी रिझर्व्ह बँकदेखील प्रयत्नशील असून ‘हर पेमेंट डिजिटल’ असे उद्दिष्ट ठेवले आहे. बाजारहिस्सा ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित राखण्याच्या ‘एनपीसीआय’च्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो यामुळे भारतीय लोक बाजारात उपलब्ध असलेल्या डझनभर अन्य ‘यूपीआय’ अॅपचा वापरदेखील करतील, असे पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष विश्वास पटेल म्हणाले. बाजार स्वत: ३० टक्क्यांपर्यंत बाजारहिस्सा मर्यादित राखण्याच्या समस्येचे निराकरण करेल आणि इतर डिजिटल देयक कंपन्यांनादेखील बाजारात स्थान मिळेल.
महिन्याला किती ‘यूपीआय’व्यवहार?
सरलेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांनी २३.२५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये १६.७३ अब्ज यूपीआय व्यवहारांद्वारे २३.२५ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार करण्यात आले आहेत. सणासुदीमुळे गेल्या तिमाहीत यूपीआय व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली होती.
हेही वाचा : ‘Ghost Particle’ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आता समुद्राखाली बसवणार दुर्बिणी; कसं चालणार त्यांचं काम?
यूपीआय व्यवहार कितपत सुरक्षित?
डिजिटल व्यवहार ग्राहकांसाठी लाभदायक असले तरी ते काही अंशी आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतात. बहुतांश लोकांमध्ये मुख्यत: ज्येष्ठ नागरिक किंवा आधुनिक तंत्रज्ञान हाताळता न येणारे लोकांची आर्थिक तंत्र-साक्षरतेच्या अभावी बऱ्याचदा फसवणूक होण्याची शक्यता असते. कोणतेही तंत्रज्ञान हे गुण-दोषांसहच येते. बाजारात रोजच फसवणूक करणाऱ्या नवनवीन अॅप्लिकेशनचा वापर केला जातो. लबाडीसाठी तयार केलेल्या बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून, फसवी प्रलोभने देऊन बँक खात्यातील पैसे काढून घेतले जातात. यामुळे यूपीआय व्यवहारासाठी वापरात येणारा क्रमांक (पिन) गोपनीय ठेवला पाहिजे. यूपीआयमार्फत कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी आर्थिक तपशील तपासून घेतला पाहिजे. यूपीआय अॅप हे क्यूआर कोड स्कॅन करते किंवा व्यवहार करण्यासाठी संपर्क क्रमांक घेतला जातो. तेव्हा प्राप्तकर्त्याचे नोंदणीकृत नाव दिसल्यावर व्यवहार करण्यापूर्वी ते तपासून व्यवहार पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण पैसे चुकून अनोळखी व्यक्तीकडे गेल्यास ते परत मिळविता येत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अॅप प्रदात्या कंपनीकडून नवीनतम सुरक्षा मानके निश्चित काळाने पाठवली जात असतात, ते सतत अद्यायावत करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे अॅप वापरण्यास सुरक्षित बनते.