पर्यावरणाच्या बाबतीत सजग असणाऱ्या जगभरातील मंडळींकरिता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्रात हजारो वर्षांपासून साठलेला बर्फ वितळून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते आणि त्यामुळे जगभरातील किनारपट्टीलगत असलेल्या भागाला धोका निर्माण होऊ शकतो, हे आपण अनेकदा ऐकत, वाचत आलो आहोत. ही समस्या उद्भवू नये, यासाठी जागतिक पातळीवरील तापमान वाढ रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र एका नव्या अहवालानुसार, कार्बन उत्सर्जनात जगभरातील देशांनी कपात करण्याचे प्रयत्न केले तरीही पश्चिम अंटार्क्टिकाच्या सभोवताली असलेल्या समुद्रातील उबदार पाण्यामुळे या ठिकाणची बर्फाची चादर (ice sheet) झपाट्याने वितळणे आता अटळ आहे, असे निदर्शनास आले आहे. जर बर्फाची चादर पूर्णपणे वितळली, तर जागतिक समुद्र पातळीत ५.३ मीटर किंवा १७.४ फूट एवढी पाण्याची पातळी वाढू शकते. असे झाले तर भारतासहित जगभरात किनारपट्टी भागात राहणाऱ्या कोट्यवधी लोकांना याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील.
जागतिक तापमान वाढ पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला, तरीही विसाव्या शतकाच्या तुलनेत अंटार्क्टिकामधील पाणी तिप्पट वेगाने गरम होत राहील, ज्यामुळे या प्रदेशातील बर्फाची चादर वितळण्याचे प्रमाण वाढत राहील, असे नवे विश्लेषण समोर आले आहे. नेचर या जर्नलमध्ये “एकविसाव्या शतकात पश्चिम अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्यात अपरिहार्य वाढ” या नावाने एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणात काम करणारे केटलिन नॉटन आणि पॉल हॉलंड या दोन्ही संशोधकांनी आणि नॉर्थंब्रिया युनिव्हर्सिटीचे जॅन डी रायड (यूके) यांनी हे संशोधन केले आहे.
हे वाचा >> Zombie Ice म्हणजे काय? हा किती धोकादायक आहे? यामुळे समुद्राच्या पातळीत किती वाढ होऊ शकते?
बर्फाची चादर म्हणजे नेमके काय?
जमिनीवर पसरलेला मोठ्या प्रमाणातील हिमनदीच्या स्वरूपातील बर्फ ‘बर्फाची चादर’ असल्याचे ओळखले जाते. जगात आता दोन ठिकाणी बर्फाची चादर आहे. एक ग्रीनलँडमध्ये आणि दुसरी अंटार्क्टिका खंडात. या दोन्ही ठिकाणी एकत्रितपणे पृथ्वीवरील सर्व गोड्या पाण्यापैकी सुमारे दोन तृतीयांश पाणी आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा बर्फाचे वस्तुमान वाढायला लागते, तेव्हा समुद्राच्या पाण्यात घट होते आणि जेव्हा बर्फाचे वस्तुमान कमी होण्यास सुरुवात होते, तेव्हा समुद्राच्या पाण्यात वाढ होण्यास सुरुवात होते.”
पश्चिम अंटार्क्टिकाचा बर्फ कसा वितळतोय?
बर्फाची चादर वितळण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकीच एक कारण म्हणजे समुद्रातील गरम पाण्यामुळे जमिनीवरील बर्फाच्या चादरीशी जोडलेला आणि समुद्राच्या पाण्यापर्यंत पसरलेला बर्फ (Ice shelves) वितळण्यास सुरुवात होते. अंटार्क्टिकामध्ये समुद्रात मोठ्या भिंतीप्रमाणे दिसणारे आईस शेल्व्स अनेक ठिकाणी आहेत. नव्या अहवालाचे संशोधक केटलिन नॉटन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली, “समुद्राच्या किनाऱ्यालगत असलेली पाण्यातील बर्फाची भिंत जमिनीवरील हिमनद्या समुद्रात वाहून जाण्यापासून रोखते. जर ही बर्फाची भिंत वितळून नाहिशी झाली, तर हिमनद्या वेगाने समुद्राला येऊन मिळतील. जमिनीवरील बर्फ पाण्याच्या स्वरूपात समुद्राला येऊन मिळाल्यास समुद्राच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ शकते.” इथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, जमिनीवरील बर्फाची चादर आणि जमीन व समुद्राला वेगळी करणारी बर्फाची भिंत या दोन्ही गोष्टी समुद्रातील बर्फापेक्षा वेगळ्या आहेत. समुद्राचे पाणी गोठल्यामुळे समुद्री बर्फ तयार होतो, जो ध्रुवीय क्षेत्रात अनेक ठिकाणी पाण्यावर तरंगताना दिसतो.
बर्फ वितळण्याची ही प्रक्रिया सध्या पश्चिम अंटार्क्टिका आणि विशेषतः ॲमंडसन समुद्रालगत दिसून आल्याचे नॉटन यांनी आपल्या अहवालात सांगितले आहे. अनेक दशकांपासून या भागातील बर्फाच्या भिंती कमी होत आहेत. त्यामुळे हिमनद्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहत असून बर्फाची चादर हळूहळू आक्रसत चालली आहे.
संशोधनातून काय निष्कर्ष निघतो?
पश्चिम अंटार्क्टिकामधील तापमानवाढीचे आजपर्यंतचे विश्लेषण करण्यासाठी ॲमंडसन समुद्राच्या ठिकाणी संगणकीय मॉडेलच्या सहाय्याने संशोधन करण्यात आले. या मॉडेलच्या माध्यमातून २१ व्या शतकातील भिन्न भिन्न परिस्थितीच्या आकृत्या तयार करण्यात आल्या. या संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. आजच्या परिस्थिीतीचा अंदाज घेतल्यास भविष्यात ॲमंडसन समुद्रातील पाणी उबदार होऊन बर्फाच्या भिंती वितळण्याचा धोका आणखी वाढू शकतो.
हे वाचा >> टोकाच्या हवामानबदलाचा अंटार्क्टिकाला फटका, शास्त्रज्ञांचे निरीक्षण : लहरी हवामानाच्या प्रमाणात वाढ
भारतालाही मोठा समुद्रकिनारा लाभलेला असून किनारपट्टीलगत दाट लोकसंख्या आहे. समुद्रपातळीत वाढ झाल्यास येथील लोकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. किनारपट्टीलगत संरक्षक भिंत किंवा इतर बचावात्मक उपाय न योजल्यास किनारपट्टीतील लोकांना इतर ठिकाणी विस्थापित व्हावे लागू शकते, अशी माहिती केटलिन नॉटन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिली.
हवामान बदल परिणाम कमी करणे सोडू नये
या अहवालातून निराशाजनक निष्कर्ष समोर आलेले असले तरी हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी चालू असलेले प्रयत्न सोडू नयेत, असेही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. संशोधकांच्या मते, पश्चिम अंटार्क्टिका येथे वितळणारी बर्फाची चादर हा हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांपैकी केवळ एक भाग आहे. त्यामुळे हवामान बदल नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सोडू नयेत, असे शास्त्रज्ञांनी आवाहन केले आहे. हवामान बदलांचा फक्त पश्चिम अंटार्क्टिका येथे प्रभाव दिसणार नाही, तर इतर अनेक ठिकाणी असा प्रभाव जाणवणार असल्याचे नॉटन यांनी सांगितले. जसे की, पूर्व अंटार्क्टिकामधील बर्फाची चादर गमावणे, प्रखर उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि अतिवृष्टी इत्यादी.