आसिफ बागवान

ॲपल या कंपनीचा नावलौकिक तिच्या दर्जेदार निर्मितीमुळे आहे. आयफोन, मॅक, एअरपॉड्स, आयपॅड यापैकी प्रत्येक गॅजेटची रचना करताना कंपनीने ग्राहकांची गरज आणि उत्तम तंत्राविष्कार यांना केंद्रस्थानी ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळेच ॲपल जेव्हा व्हर्च्युअल रिॲलिटी क्षेत्रातील गॅजेटची निर्मिती जगासमोर जाहीर करते, तेव्हा त्या उत्पादनाची चर्चा आठवडाभरानंतरही ताजीच वाटते. ॲपलचा ‘व्हिजन प्रो’ हा ‘व्हीआर’ हेडसेट वैशिष्ट्यांच्या बाबतीत कमालीचा प्रगत आहे. त्याच वेळी या व्हीआर हेडसेटची किंमत वेगळ्याच चर्चेला तोंड फोडते. ती म्हणजे, ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’शी संबंधित उपकरणांचे वास्तव वापरातील मूल्य किती?

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?

ॲपलचा ‘व्हिजन प्रो’ काय आहे?

‘व्हिजन प्रो’ हा ॲपलचा ‘व्हीआर हेडसेट’ आहे. मात्र, ॲपलने त्याला ‘व्हीआर’शी न जोडता ‘स्पॅशिअल कॉम्प्युटर’ म्हणून उल्लेखले आहे. ‘व्हीआर हेडसेट’च्या क्षेत्रातील आतापर्यंतच्या उत्पादनांतील हे सर्वात प्रगत उपकरण आहे. ‘व्हीआर हेडसेट’चा आतापर्यंतचा वापर प्रामुख्याने मनोरंजनासाठी म्हणजे चित्रपट पाहण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी केला जात आहे. मात्र, ॲपलने ‘व्हिजन प्रो’मध्ये नवनवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करत त्याची उपयुक्तता फेसटाइम (व्हिडिओ कॉलिंग) करणे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे किंवा फोटो काढणे किंवा संदेश पाठवणे अशा आणखी कामांपर्यंत वाढवली आहे.

‘व्हिजन प्रो’ची वैशिष्ट्ये काय?

‘व्हिजन प्रो’चे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या उपकरणाला आयफोन किंवा अन्य फोनशी न जोडता त्याचा स्वतंत्रपणे वापर करता येऊ शकतो. अर्थात आयफोनशी संलग्न केल्याशिवाय फोनशी संबंधित वैशिष्ट्ये हाताळता येत नाहीत. दुसरे म्हणजे, हा व्हीआर हेडसेट हाताळण्यासाठी हाताची गरज लागत नाही तर, केवळ डोळ्यांच्या हालचालींतून तुम्ही त्याला आज्ञा देऊ शकता. एखादे ॲप सुरू करायचे असल्यास केवळ त्याकडे पाहताच ते सुरू होऊ शकते किंवा नजर वर खाली करून तुम्ही स्क्रीन स्क्रोल करू शकता. बोटांच्या हालचाली करूनही हा व्हीआर हेडसेट हाताळता येतो. त्यासाठी बोटे आणि हेडसेट यांचा संपर्कच काय पण ते एकमेकांच्या जवळ आणण्याचीही गरज नाही. हे हेडसेट परिधान करून तुम्ही अगदी शंभर फुटी स्क्रीनवर सिनेमा पाहत असल्याचा अनुभवही घेऊ शकता.

‘व्हिजन प्रो’ ची किंमत काय?

ॲपलने व्हिजन प्रोची किंमत ३५०० डॉलर इतकी असेल, असे जाहीर केले आहे. तो पुढच्या वर्षीपासून उपलब्ध होईल असेही जाहीर केले आहे. भारतातील त्याच्या आगमनाचा मुहूर्त अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, डॉलर ते रुपया असे रूपांतर करून पाहिल्यास या गॅजेटची किंमत दोन लाख ८८ हजार रुपयांहूनही अधिक ठरते. हा आजवरचा सर्वात महागडा व्हीआर हेडसेट आहेच; पण ॲपलच्या अद्ययावत आयफोन १४ प्रो मॅक्सपेक्षाही तो महाग आहे.

इतकी किंमत वाजवी आहे?

व्हिजन प्रोच्या जाहीर वैशिष्ट्यांवर नजर टाकल्यास, हे उपकरण आपल्याला तंत्राविष्काराचा अचाट अनुभव देऊ शकते, यात शंका नाही. मात्र, त्यासाठी ॲपलने जाहीर केलेली किंमत किती जणांना परवडेल, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे ‘व्हिजन प्रो’ला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आजवरच्या व्हीआर हेडसेटच्या प्रमाणेच ‘व्हिजन प्रो’ही शोरूमवरील काचेत सजवण्यापुरते गॅजेट ठरेल.

आजवरचे व्हीआर हेडसेट कोणते? त्यांचे काय झाले?

व्हर्च्युअल रिॲलिटी किंवा ऑगमेंटेड रिॲलिटी हे तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. या तंत्रज्ञानावर आधारित आणि ग्राहकांना नाविन्यपूर्ण तंत्राविष्काराचा अनुभव देणारी अनेक गॅजेट्स आतापर्यंत बाजारात आली. याची सुरुवात गुगलने केली. गुगलने दहा वर्षांपूर्वी इंटरनेटशी जोडता येणारे आणि छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणारे ‘ग्लासेस’ जाहीर केले. मात्र, ते उपकरण इतक्या प्राथमिक अवस्थेतील होते की ग्राहकांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मायक्रोसॉफ्टने २०१६मध्ये होलोलेन्स हे उपकरण बाजारात आणले. मात्र, त्याचाही फारसा प्रभाव पडला नाही. फेसबुक अर्थात सध्याच्या मेटा कंपनीने ‘क्वीस्ट’ नावाचे हेडसेट बाजारात आणले. ते आतापर्यंतचे सर्वाधिक विकले गेलेले हेडसेट ठरले आहेत. मात्र त्यात प्रामुख्याने व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

व्हर्च्युअल रिॲलिटी उद्योगाचे वास्तव काय?

आभासी वास्तव अर्थात व्हर्च्युअल रिॲलिटी तंत्रज्ञान हे निश्चितच भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानातून अनेक अवघड कामे साध्य करणे शक्य होत आहे आणि दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेत वाढ होत आहे. मात्र, थेट ग्राहकापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रश्न येतो तेव्हा या तंत्रज्ञानात अनेक मर्यादा जाणवतात. यातील सर्वात मोठी मर्यादा म्हणजे त्यावर आधारित उपकरणांच्या किमती. या किमती सामान्यच काय पण श्रीमंत ग्राहकांनाही महाग वाटाव्यात अशा आहेत. व्हीआर हेडसेटचाच विचार करता त्याच्या किमती कमी कशा आणता येतील, याऐवजी हे तंत्रज्ञान अधिक वैशिष्ट्यपूर्ण कसे होईल, यावर कंपन्यांचा भर राहिला आहे. व्हीआर हेडसेटचा वापर अद्याप सर्वाधिक गेमिंग करिताच होत आहे. व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांत होत असला तरी थेट ग्राहकांपर्यंत हे तंत्रज्ञान आतापर्यंत तरी मनोरंजन रुपातच आले आहे. त्यामुळे त्याची उपयुक्तता सिद्ध करणे, हे सर्वात मोठे आव्हान कंपन्यांसमोर असणार आहे.

Story img Loader