रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. मंगळवारी रशियाने आक्रमक भूमिका घेत युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली. त्यानंतर रशियाने मंगळवारी या प्रांतांशी करार करून तिथे सैन्यतैनातीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचे ढग गडद झाले आहेत. या दोन्ही देशांत जर येत्या काळात युद्ध झालं तर त्याचे परिणाम भारतावरही होतील. या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
नैसर्गिक वायूच्या किमती वाढणार –
युक्रेन-रशिया संकटाने ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल ९६.७ डॉलरवर गेली आहे. ही वाढ सप्टेंबर २०१४ पासून आतापर्यंतची सर्वोच्च असल्याचं म्हटलं जात्य. रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. सध्याच्या संकटामुळे येत्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त वाढू शकतात. असं झाल्याचं त्याचा परिणाम जागतिक जीडीपीवर होईल. जेपी मॉर्गन यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १५० डॉलरपर्यंत वाढल्यास जागतिक जीडीपी वाढ ०.९ टक्क्यांपर्यंत कमी होईल.
युद्धाचे ढग गडद!; युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास रशिया सज्ज, जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशांकडून निर्बंध
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) कच्च्या तेलाशी संबंधित उत्पादनांचा थेट वाटा ९ टक्क्यांहून अधिक आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारताची WPI महागाई सुमारे ०.९ टक्क्यांनी वाढेल. तर, तज्ज्ञांच्या मते, जर रशियाने युक्रेनशी युद्ध केले तर घरगुती नैसर्गिक वायूची म्हणजेच सीएनजी, पीएनजी आणि वीज यांच्या किमती दहापट वाढू शकतात.
पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार –
देशात इंधनाच्या दरात वाढ कायम आहे. अशा परिस्थितीत रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते.
गव्हाचे भाव वाढू शकतात –
काळ्या समुद्राच्या प्रदेशातून धान्याच्या आयातीत अडचणी आल्यास, त्याचा किमतीवर मोठा परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रशिया हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गहू निर्यातदार देश आहे. तर युक्रेन हा गव्हाचा चौथा मोठा निर्यातदार देश आहे. गव्हाच्या एकूण जागतिक निर्यातीपैकी जवळपास एक चतुर्थांश वाटा या दोन्ही देशांचा आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, आधीच पुरवठा साखळींवर करोनाचा परिणाम झाल्यामुळे अन्नधान्याच्या किमती एका दशकाहून अधिक काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यातच या दोन्ही देशातील युद्धजन्य परिस्थितमुळे येणार्या दिवसांमध्ये ऊर्जा आणि अन्नधान्याच्या किमतींमध्ये अस्थिरता वाढू शकते.
धातूंच्या किमती वाढणार –
ऑटोमोटिव्ह एक्झॉस्ट सिस्टीम आणि मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणार्या पॅलेडियमच्या किमती अलिकडच्या आठवड्यात रशियावर निर्बंध लादल्या जाण्याच्या भीतीने वाढल्या आहेत. हा देश पॅलेडियमचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे.
एलपीजी, केरोसीन अनुदान वाढणार –
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने एलपीजी आणि केरोसीनवरील अनुदानात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
Russia-Ukraine Conflict: “सीमेवर लष्कर वाढणं हे….”; रशिया-युक्रेन तणावावर भारताची पहिली प्रतिक्रिया
भारताचं रशिया कनेक्शन…
भारताला पुरवल्या जाणाऱ्या लष्करी साहित्यापैकी ६० टक्के साहित्य हे रशियामधून येतं. भारत आणि रशियामध्ये काही काळापूर्वीच अनेक महत्वाच्या संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या केल्यात. यामध्ये एस ४०० मिसाइल यंत्रणा आणि एके-२०३ असॉल्ट रायफल्ससंदर्भातील करारांचा समावेश आहे. तसेच पूर्व लडाखमध्ये आधीपासूनच भारत आणि चीन संघर्ष सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाल्यास याचे परिणाम भारतावर देखील होतील.