-जयेश सामंत
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आनंद दिघे यांच्या निधनानंतर गेली दोन दशके शिंदे यांच्या खांद्यावर येथील शिवसेनेची धुरा राहिली. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिंदे रात्रीचा दिवस करायचे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एखाद-दुसरी सभा वगळली तर तळागाळातील रणनीतीची आखणी, डावपेच, कार्यकर्त्यांना आवश्यक ती ‘रसद’ पुरविण्याचे काम शिंदे करत असत. पक्षात कोणाला काय हवे नको, पोलीस ठाण्यातील फेऱ्या, न्यायालयीन प्रक्रियेतील मदत, इतर पक्षातील दिग्गजांना गळाला लावण्याचे शिंदे यांचे कसब नेहमीच चर्चेत राहिले. आमदारांच्या बंडाचे केलेले नेतृत्व आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्रीपदाला घातलेली गवसणी यामुळे राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या शिंदे यांना आता माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्याने एके काळी बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.
शिंदे यांच्यामागे ओढा कशासाठी?
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातून शिंदे यांनी राजकारणाचा श्रीगणेशा गिरवला असला तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी सुरुवातीपासून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. नवी मुंबईत महापालिकेच्या स्थापनेपासून गणेश नाईक यांचा एकहाती दबदबा होता. सात वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिंदे यांनी नवी मुंबईत जातीने लक्ष घातले आणि येथील शिवसेना नगरसेवकांची संख्या १६वरून ३८ पर्यंत झेपावली. ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात शिवसेनेची सत्ता आणण्यात शिंदे यांचा वैयक्तिक करिष्मा नेहमीच कामी आला आहे. शिंदे यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा मागील आठ वर्षांत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सतत राबता राहिला. या काळात त्यांनी या ठिकाणी शिंदे समर्थकांची फौज उभी केली असून ही सर्व मंडळी ताज्या घडामोडीत शिंदे यांच्या गटात सहभागी होताना दिसतात.
पाहा व्हिडीओ –
‘मातोश्री’ दर्शन दुर्लभ का राहिले?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष प्रेम राहिल्याचा उल्लेख नेहमीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. हे जरी खरे असले तरी अलिकडच्या काळात स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांशी ‘मातोश्री’चा संवाद कायम होता का हा प्रश्न उद्भवतोच. निवडणुकांची सभा, त्यापूर्वी होणारे कार्यक्रम, विकासकामांच्या उद्घाटनांसाठी उद्धव अथवा आदित्य ठाकरे यांचे ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये येणे होत असे. पण त्याव्यतिरिक्त स्थानिक पदाधिकाऱ्यांशी, नगरसेवकांशी ‘मातोश्री’चा फारसा संवाद राहिलेला नव्हता अशीच तक्रार आता ऐकायला मिळत आहे. पक्ष नेतृत्व आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील हा विसंवाद आता शिवसेनेसाठी मारक ठरू लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या नेमणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेच्या वाटपात ‘मातोश्री’वरून एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जात असे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिंदे यांना मानणारी एक मोठी फळी पक्षात या काळात उभी राहिली. त्याचा फटका आता शिवसेनेला बसू लागला आहे.
मतदार आहेत पण नेता कोण?
आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला नेता कोण असा प्रश्न पडला होता. एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी येताच त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला, कार्यकर्त्यांना बळ दिले, सत्तेची समीकरणे जुळवली. शिंदे यांच्यानंतर पक्षासाठी ही बांधणी नव्याने करू शकेल असा नेता उरला आहे का, हा सवाल ‘मातोश्री’शी अजूनही निष्ठा राखणाऱ्या शिवसैनिकांच्या मनात आहे. स्थानिक पातळीवरील दुखणे घेऊन जायचे कुणाकडे, हा प्रश्न पडलेले असंख्य शिवसैनिक आजही या सगळ्या घडामोडी अस्वस्थ होऊन पाहत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून शिवसेनेने माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. भोईर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे अजिबात जमत नाही. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाला भोईर यांनी साथ दिली नाही. शिवाय नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आग्रह धरत ‘मातोश्री’वरून आगरी-कोळी समाजाला आपलेसे करण्याचा जो प्रयत्न झाला त्यात भोईर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भोईर यांच्यासह ठाण्याचे खासदार राजन विचारे हेदेखील ‘मातोश्री’च्या संपर्कात आहेत. असे असले तरी शिंदे यांच्या बंडानंतर ते जिल्हा तर दूर, पण ठाणे शहरातही फारसे सक्रिय दिसलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेला मानणारा मतदार कायम राहतो असा दावा शिवसेना नेत्यांकडून केला जात असला तरी या मतदाराला जिल्ह्यात आपला नेता कोण, या प्रश्नाचे उत्तर अजून तरी सापडलेले नाही.