WhatsApp Investing Scams व्हॉट्सॲपद्वारे होणारी फसवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. सध्या सर्वत्र ट्रेडिंग, स्टॉक, शेअर मार्केटचा ट्रेंड सुरू आहे; जो तो यात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक जण असेही आहेत; ज्यांना याची परिपूर्ण माहिती नाही. घोटाळेबाज त्याचाच गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करीत आहेत.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोचिंग क्लासचे मालक एका शेअर ट्रेडिंग घोटाळ्याला बळी पडले. त्यात त्यांचे १.८८ कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले. या घोटाळ्याची सुरुवात एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्यत्वापासून झाली. हा १७० सदस्यांचा एक ग्रुप होता; ज्यात नियमितपणे स्टॉक आणि शेअर ट्रेडिंगबद्दलची माहिती पोस्ट केली जात होती. ठाण्यातील कोचिंग क्लासच्या मालकाने या ग्रुपवर येणार्या महितीनुसार स्टॉकची खरेदी केली. स्टॉक खरेदीनंतर त्यांना ‘स्टॉक-व्हॅनगार्ड-व्हीआयपी’ नावाच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये सामील करण्यात आले.
या वर्षी मार्चमध्ये हा घोटाळा उघडकीस आल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर ईशा, दिव्या व राज रूपानी नावाच्या तीन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना ‘सेबी प्रमाणपत्र’ दाखवले. त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, ते सीनवेन/आयसी सर्व्हिसेस नावाच्या ॲपद्वारे गुंतवणूक करून मोठा नफा कमवू शकतात आणि त्यांना १.८८ कोटींपेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. मात्र, पैसे परत मागितले असता, त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२० अन्वये विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : एकेकाळी घोडे हाकायचे मुंबईची ट्राम; जाणून घ्या अनोख्या वाहतूक पर्यायाची गोष्ट
व्यावसायिकांना लक्ष्य करून केली जातेय फसवणूक
भारतातील ऑनलाइन गुंतवणूक घोटाळ्याच्या आणखी एका प्रकरणात, बंगळुरूतील एका व्यावसायिकाने या वर्षी एप्रिलमध्ये व्हॉट्सॲपवर शेअर केलेल्या फसव्या स्टॉक मार्केट ॲपमुळे ५.२ कोटी रुपये गमावले, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार ५२ वर्षीय व्यक्तीला किफायतशीर स्टॉक मार्केट रिटर्नचे आश्वासन देणारा एक व्हॉट्सॲप मेसेज प्राप्त झाला. मेसेजमध्ये एक लिंक होती; ज्याद्वारे त्याला bys-app.com वरून ॲप डाउनलोड करण्यास सांगितले गेले.
फेब्रुवारीमध्ये मुंबईतील आणखी एका ७३ वर्षीय व्यक्तीचे ३.६९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, ते गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत एका व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य होते. स्टॉक मार्केटच्या सल्ल्यासाठी म्हणून एका महिलेने त्यांचे नाव या ग्रुपमध्ये सामील केले होते. कालांतराने त्यांनी ३.६९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. जेव्हा त्यांनी त्यांचे पैसे परत मागितले, तेव्हा त्यांनी परत त्यांना ४० लाख रुपये भरण्यास सांगितले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांना स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ते सायबर पोलिसांकडे गेले.
फसवणुकीसाठी व्हॉट्सॲपचा वापर कसा होतो?
भारतात आर्थिक फसवणुकीसाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढत आहे. घोटाळेबाज प्रसिद्ध ब्रॅण्ड आणि व्यावसायिक असल्याचे भासवून बनावट गुंतवणूक ग्रुप तयार करतात आणि स्टॉक व ट्रेडिंग कोर्स ऑफर करतात. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या मते, स्कॅमर प्रतिष्ठित फंड हाऊसचे प्रतिनिधी म्हणून व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना ग्रुपचे आमंत्रण पाठवितात.
हा घोटाळा एक प्रकारे होत नाही, तर अनेक टप्प्यांमध्ये होतो. घोटाळेबाज एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करून आधी गुंतवणूक ग्रुपमध्ये जोडतात. एका ग्रुपमध्ये ती व्यक्ती जोडली गेल्यानंतर असे अनेक ग्रुप तयार केले जातात आणि त्यात प्रसिद्ध गुंतवणूकदारांच्या प्रोफाइल शेअर केल्या जातात. त्यात स्टॉक व गुंतवणुकीविषयीचे सल्ले दिले जातात आणि सक्रिय सदस्यांना त्यात गुंतवले जाते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार घोटाळेबाज अगदी वित्त तज्ज्ञ पोरिंजू वेलियाथ व अजय कचोलिया यांसारख्या प्रभावशाली व्यक्तींची तोतयागिरी करतात. विश्वासार्हता मिळविण्यासाठी यात मेसेजेसही पाठविले जातात; ज्यामुळे समोरची व्यक्ती खरी असल्याचा समज निर्माण होतो. याचाच घोटाळेबाज गैरफायदा घेतात. व्यक्तीच्या मनात पैसे गहाळ होण्याची भीती निर्माण करून, त्यांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात आणि गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. एकदा पैसे मिळाल्यानंतर घोटाळे करणारे गायब होतात.
तुम्ही सुरक्षित कसे राहू शकता?
गुंतवणुकीच्या घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सावध राहणे आणि काही प्रमुख नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सर्वांत प्रथम कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित किंवा इतर विषयांशी संबंधित तपशील तुमच्याकडे आल्यास त्यांची वैधता तपासा; विशेषतः जर ते अज्ञात स्रोतांकडून आले असतील तर. ते विश्वासार्ह आहेत याची खात्री करण्यासाठी कंपनी किंवा व्यक्तीची माहिती तपासा.
अज्ञात लिंकवर क्लिक करणे किंवा अज्ञात स्रोतांकडून आलेले ॲप्स डाउनलोड करणे टाळा. कारण- त्यामुळे घोटाळे होऊ शकतात. कमी जोखमीसह उच्च परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या ऑफर्सची पडताळणी करा. कारण- त्या बऱ्याचदा खऱ्या नसतात.
हेही वाचा : केजरीवालांवर दहशतवाद्याच्या सुटकेसाठी पैसे घेतल्याचा आरोप; कोण आहे देविंदर भुल्लर?
तुमचे व्यवहार आणि गुंतवणूक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मद्वारेच करा. नेहमी तुमचे खाते तपासत राहा. शंका असल्यास योग्य निर्णय घेण्यासाठी आणि घोटाळ्यांना बळी पडण्यापासून वाचण्यासाठी व्यावसायिक आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.