‘व्हॉट्सअ‍ॅप’ने गेल्या ऑगस्ट महिन्यात भारतातील तब्बल २३ लाखांहून जास्त अकाऊंट बंद केले आहेत. ‘मेटा’च्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने भारताच्या माहिती तंत्रज्ञान २०२१ च्या नियमांनुसार ऑक्टोबर महिन्यातील ‘युझर सेफ्टी रिपोर्ट’ प्रसिद्ध केला आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने तक्रारींच्या आधारावर गेल्या जुलै महिन्यात २० लाख ३९ हजार तर जून महिन्यात २० लाख २१ हजार अकाऊंट बंद केले आहेत, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्त संस्थेने दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे अकाऊंट का बंद करत आहे? अकाऊंटवर बंदी येऊ नये यासाठी काय करता येईल? यासाठीचे हे विश्लेषण.

विश्लेषण : WhatsApp चॅट्स ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड’ आहेत, याचा नेमका अर्थ काय?

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे अकाऊंट का बंद करत आहे?

कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास किंवा हिंसाचाराला उत्तेजन देणाऱ्या पोस्ट केल्यास व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे अकाऊंट बंद करत आहे. भारताच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास अथवा व्हॉट्सअ‍ॅपच्या शर्थींचे पालन न केल्यासही अकाऊंट्सवर कारवाई होऊ शकते. आपल्या प्लॅटफॉर्मवर गैरवर्तन टाळण्यासाठी ही कंपनी तीन स्तरांवर काम करते. नोंदणी, संदेशांची देवाणघेवाण आणि नकारात्मक अभिप्रायांच्या आधारावर कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर होत असलेल्या गैरप्रकारांवर नजर ठेवून असते, अशी माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिली आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एडिट करता येईल मेसेज, लवकरच मिळणार ‘हे’ ५ भन्नाट फीचर

बंदीपासून व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं वाचवाल?

  • व्हॉट्सअ‍ॅपने संदेश फॉरवर्ड करण्यावर मर्यादा घातल्या आहेत. कुठलाही संदेश फॉरवर्ड करण्याअगोदर त्याची सत्यता तपासा. चुकीचा किंवा खोटा संदेश फॉरवर्ड केल्यास तुमच्या अकाऊंटची तक्रार केली जाऊ शकते.
  • वापरकर्त्यांनी एका वेळी खूप जास्त किंवा ऑटोमेटेड संदेश पाठवू नयेत. व्हॉट्सअ‍ॅप ‘मशीन लर्नींग’ तंत्रज्ञानाचा वापर करून अशा अकाऊंट्सचा शोध घेते. या अकाऊंट्सवरुन गरज नसताना ऑटोमेटेड संदेश पाठवल्याचे निदर्शनास आल्यास अशा अकाऊंट्सवर बंदी घालते.
  • ब्रॉडकास्ट यादीचा जास्त वापर करण्यास टाळा. ब्रॉडकास्ट यादीचा वारंवार वापर केल्यास अन्य वापरकर्त्यांकडून तुमच्या संदेशांवर फ्लॅग वापरला जाऊ शकतो. या वापरकर्त्यांनी तुमच्या अकाऊंटची तक्रार केल्यास व्हॉट्सअ‍ॅपकडून कारवाई केली जाऊ शकते.
  • कुणालाही ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्याआधी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे. जर संबंधित व्यक्तीला तुमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं नसेल, तर त्यांच्या इच्छेचा मान ठेवा. इतरांसाठी गैरसोयीचे संदेश ग्रुपवर पाठवू नका.
  • व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट सुरळीत वापरायचे असल्यास या कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करू नका. कंपनीच्या नियमांनुसार, खोटा प्रचार, गैरप्रकार, धमकी देणे, घृणास्पद आणि वंशभेदी टीप्पणी करण्यावर बंदी आहे.
  • पाहा व्हिडीओ –

Photos : Whatapp घेऊन येतय ग्रुपसाठी भन्नाट फीचर; आता ‘व्हॉट्सअ‍ॅपवर कुठलाही ग्रुप बनवला तर…

अकाऊंटवर चुकून बंदी आल्यास काय कराल?

व्हॉट्सअ‍ॅपकडून अकाऊंट बंद करण्यात आल्यास तसा संदेश वापरकर्त्याला कंपनीकडून पाठवला जातो. अकाऊंटवर चुकून बंदी घालण्यात आल्यास वापरकर्ता या कंपनीला ईमेल पाठवून तक्रार नोंदवू शकतो. या शिवाय अ‍ॅपवरील ‘request a review’ वर क्लिक केल्यासही संबंधित अकाऊंट संदर्भात मदत मिळू शकते. रिव्ह्यूची विनंती केल्यानंतर तुमच्या फोन क्रमांकावर सहा अंकी क्रमांक कंपनीकडून पाठवण्यात येतो. हा क्रमांक टाकल्यानंतर कंपनीकडे रिव्ह्यूच्या विनंतीची नोंद केली जाईल. या बाबत तपास केल्यानंतर अकाऊंट संदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून वापरकर्त्याशी संपर्क साधला जाईल.