दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात उत्तर भारतात अचानक उष्णता वाढल्यामुळे व्यापारी संस्था गहू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. तर केंद्रातील अधिकारी अंदाजाइतके उत्पादन होईल, असे सांगत आहेत. वाढत्या उष्णतेचा गहू उत्पादनावर काय परिणाम होईल, त्याविषयी..

उष्णतेच्या लाटेची इतकी धास्ती का?
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या प्रमुख गहू उत्पादक राज्यांत गेल्या वर्षी फेब्रुवारी- २०२२ अखेरपासून महिन्याच्या मध्यापर्यंत उष्मालाट आली होती. गहू पक्व होण्याच्या ऐन काळातच, उष्णतेमुळे गहू उत्पादनात सुमारे सहा टक्क्यांनी घट झाली होती. १०९.५९ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज असताना १०७.७४ दशलक्ष टन उत्पादन झाले. त्यामुळे देशांतर्गत गव्हाच्या किमती वर्षभर तेजीत राहिल्या. गहू, गव्हाचे पीठ, रवा, मैद्याची निर्यात बंद करावी लागली. बाजारातील दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारला वर्षभर कसरत करावी लागली. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा परिणाम शेतकरी, ग्राहक आणि सरकारला भोगावा लागला.

यंदा उष्णतेच्या लाटेची स्थिती काय?
यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात उत्तर आणि मध्य भारतात सध्या उष्णतेची लाट आली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार काही गहू उत्पादक पट्टय़ांमध्ये फेब्रुवारीत काही दिवस तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. सरासरीपेक्षा तापमान १० अंश सेल्सिअस जास्त राहून यंदाचा फेब्रुवारी ‘१२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण’ ठरला. मार्चमध्ये आणखी एक उष्मालाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ही लाट विशेषत: मध्य आणि उत्तर भारतात येणार असून, तापमान जास्त असल्यामुळे पीक लवकर पक्व होईल. गव्हाचे दाणे पूर्ण भरणार नाहीत. त्यांची वाढ कमी होईल, ते आक्रसतील. गेल्या वर्षीही असेच झाले होते.

सरकार काय म्हणते?
केंद्र सरकारने गेल्या महिन्यात यंदाच्या हंगामात गव्हाचे उत्पादन विक्रमी म्हणजे ११२.२ दशलक्ष टन राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. वाढत्या तापमानाचा गहू उत्पादनावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीत प्रमुख गहू उत्पादक राज्यांच्या प्रतिनिधींसह केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. यंदा मध्य प्रदेशसारख्या काही राज्यांमध्ये कापणी सुरूही झाल्यामुळे गहू पिकावर कमी परिणाम होईल, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.

व्यापारी संघटनांचा अंदाज काय?
व्यापारी संघटना केंद्र सरकारच्या अंदाजावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. फेब्रुवारी आणि मार्चमधील वाढलेल्या तापमानामुळे गव्हाचे उत्पादन ४० ते ५० दशलक्ष टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. आमच्या अंदाजानुसार यंदा गहू उत्पादन १०६ ते १०७ (केंद्राचा अंदाज ११२.२ दशलक्ष टन ) दशलक्ष टन राहील, असे रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी म्हटले आहे. काही व्यापार संस्थांचे उत्पादन त्यापेक्षाही जास्त घटण्याची चिन्हे आहेत. आम्ही गहू उत्पादनाचा अंदाज १०९ दशलक्ष टनांवरून कमी करून १०३ दशलक्ष टनावर आणला आहे, असे दिल्लीतील एका व्यापाऱ्याने म्हटले आहे.

व्यापारी अंदाज खरा ठरला, तर?
मार्चमध्ये जर तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले, तर गव्हाचे उत्पादन १०० लाख टनांपर्यंत खाली येऊ शकते. तसे झाल्यास गव्हाचे बाजारातील दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (हमीभाव) जास्त राहतील. यंदाचा गव्हाचा हमीभाव प्रति क्विंटल २१२५ रुपये असून, गव्हाची खरेदी किंमत त्याहून जास्त राहिल्यास ग्राहकांसाठी गहू महाग होईल. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत गव्हाचे किरकोळ बाजारातील दर ३५ ते ४० रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. उत्पादन कमी झाल्यास गव्हाची किरकोळ विक्री ४० रुपये प्रति किलो राहण्याची शक्यता आहे.

गोरगरिबांना रेशनवरील गहू मिळणार?
गेल्या वर्षी सरकारी खरेदीत तब्बल ५३ टक्के घट झाली होती. मागील वर्षी सरकारने ४४४ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजनांसाठी गेल्या वर्षी केवळ १८८ लाख टन गहू खरेदी झाली. मागील दहा वर्षांतील ही सर्वात कमी सरकारी गहू खरेदी ठरली आहे. २०२२ मध्ये हमीभाव २०१५ रुपये प्रति क्विंटल असताना प्रत्यक्षात खरेदी २२०० ते २५०० रुपये दराने झाली. २०२०-२१मध्ये ३८९.९२ लाख टन. २०१९-२०मध्ये ३५७.९५ लाख टन, २०१७-१८मध्ये ३०८. २४ लाख टन सरकारी गहू खरेदी झाली होती.