सुमारे सहा आठवड्यांपूर्वी म्हणजेच १३ जानेवारी रोजी सुरू झालेला प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सांगता होणार आहे. आज महाकुंभ मेळ्यात अखेरचे अमृतस्नान पार पडणार आहे. महाकुंभमेळ्यात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. २५ फेब्रुवारीला महाकुंभमेळ्यात सुमारे १.३३ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगम आणि इतर घाटांवर पवित्र स्नान केले. उत्तर प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार मेळ्यादरम्यान एकूण भाविकांची संख्या ६४ कोटींहून अधिक झाली. महाकुंभमेळ्याचे महत्त्व, अमृत स्नानाचे महत्त्व आणि कुंभमेळा पुढे कधी होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाकुंभचे महत्त्व

दुर्मीळ खगोलीय संरेखनामुळे १४४ वर्षांनंतर सहा आठवड्यांचा महाकुंभ मेळा आला आहे. अशी मान्यता आहे की, त्रिवेणी संगम (गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम) येथे या काळात स्नान केल्याने एखाद्या व्यक्तीची पापे धुऊन जातात आणि त्यांचे कर्म सुधारते. सहयोगी प्राध्यापक आणि केजे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ रिलीजन स्टडीजच्या प्रभारी संचालिका पल्लवी जांभळे यांच्या मते, डायना एक यांनी कुंभमेळ्याच्या शोधात त्याचे महत्त्व अमृताच्या मिथक असलेल्या देव आणि दानव यांच्यातील वैश्विक युद्धाशी जोडले आहे. डायना एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत. भारतावरील त्यांचे कार्य लोकप्रिय धर्म, विशेषत: मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांवर केंद्रित आहे.

प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र स्थळांमध्ये दर तीन वर्षांनी साजरा होणारा कुंभमेळा खगोलीय संरचनांशी, विशेषत: सूर्य, चंद्र आणि गुरूच्या हालचालींशी खोलवर जोडलेला आहे. परंतु, प्रयागराज येथे केवळ दर १२ वर्षांनी होणारा महाकुंभ हा अधिक महत्त्वाचा मानला जातो. महाकुंभ हा गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमातील स्नान विधी किंवा अमृतस्नानाभोवती फिरतो, जो पापांची शुद्धी करतो आणि लोकांना मोक्षाच्या जवळ आणतो असे मानले जाते.

पुढील पूर्ण कुंभमेळा २०२७ मध्ये महाराष्ट्रात नाशिक येथे होणार आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पुढे महाकुंभमेळा कधी आणि कुठे होणार?

पुढील पूर्ण कुंभमेळा २०२७ मध्ये महाराष्ट्रात नाशिक येथे होणार आहे. खोल आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्वासाठी ओळखले जाणारे नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या त्र्यंबकेश्वर भागात ‘सिंहस्थ कुंभमेळा’ भरणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार नाशिकमधील कुंभमेळा किमान १७ व्या शतकापासून होत असल्याचे मानले जाते आणि त्याच्या भव्यतेसाठी ओळखले जाते. या कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. महाराष्ट्र सरकारने कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी नुकतीच नाशिकला भेट देऊन रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या योजनांवर चर्चा केली, असे ‘मिड-डे’च्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, २०२८ मध्ये उज्जैनमध्ये सिंहस्थ महाकुंभ तर २०३० मध्ये प्रयागराजमध्ये अर्धकुंभ आयोजित करण्यात येणार आहे.

अमृतस्नानाचे महत्त्व

हिंदू पौराणिक कथेनुसार, अमृतस्नान शुद्धीकरण आणि अमरत्वाच्या शोधाचे प्रतीक आहे. जुना आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या मते, बृहस्पति जेव्हा वृषभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य आणि चंद्र मकर राशीत येतात तेव्हा अमृतस्नानाचा योग येतो. ‘अमृतयोग’ म्हणून ओळखले जाणारे हे दुर्मीळ वैश्विक संरेखन दर १२ वर्षांनी एकदा घडते. स्वामी अवधेशानंद यांनी शाहीस्नानाचे नाव बदलून अमृतस्नान केल्याने त्याचे सार किंवा महत्त्व बदलत नाही यावर त्यांनी भर दिला. अग्नी आखाड्याचे महंत अदित्तानंद शास्त्री यांनी अमृतस्नानाची उपमा हजार अश्वमेध यज्ञांशी केली. अमृतस्नानानंतर, साधू आणि संत देवतांचे ध्यान करतात आणि ज्ञानाविषयी चर्चा करतात.

जमशेदपूरमधील भारतीय ज्योतिष अध्यात्म परिषदेचे अध्यक्ष रमेश कुमार उपाध्याय यांनी मकर संक्रांतीवरील अमृतस्नान हिंदूंसाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. मकर संक्रांतीत सूर्य उत्तरेकडे सरकत असल्याने उत्तरायण कालावधी सुरू होतो. हिंदू पौराणिक कथेनुसार, हा काळ देवांचा दिवस असल्याचे मानले जाते. सहा महिन्यांनंतर, सूर्य दक्षिणेकडील टप्प्यात असतो, जी देवांची रात्र असते. तसेच सूर्य धनु राशीतून निघून जातो, ज्यामुळे ३० दिवसांच्या कालावधीत शुभ कार्ये केली जात नाहीत, असे त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. ‘अमृत स्नान’ हे १३ आखाड्यांच्या (धार्मिक आदेश) सहभागाने चिन्हांकित केले जाते, प्रत्येक विधी स्नानासाठी नियुक्त वेळ पाळला जातो.

प्रत्येक अमृतस्नानाचे महत्त्व काय?

पौष पौर्णिमा : पौष पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशी १३ जानेवारीला महाकुंभ सुरू झाला. या दिवशी भक्तांसाठी कल्पवास म्हणजेच आध्यात्मिक साधनेचा महिनाभराचा कालावधी सुरू झाला. पौर्णिमेच्या दिवशी गंगेत पवित्र स्नान करणे शुभ मानले जाते, कारण चंद्राचा तेजस्वी प्रकाश आंतरिक शांती आणि अशुद्धता दूर करण्याचे प्रतीक असल्याचे मानले जाते.

मकर संक्रांती : दुसरे अमृतस्नान मकर संक्रांती १४ जानेवारी रोजी होते. मकर संक्रांतीच्या दिवशी अमृतस्नान केल्याने भक्तांच्या जीवनातील कोणताही अंधार किंवा अज्ञान दूर होईल असे मानले जाते.

मौनी अमावस्या : २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येचे अमृतस्नान होईल. यावेळी भाविक मौन व्रत पाळतात. मौनी अमावस्येला लोक शांत राहून चिंतन करण्याचा निर्णय घेतात. या दिवशी अंघोळ केल्याने त्यांचे पाप धुतले जाते आणि त्यांचे बोलणेही सुधारते, असे मानले जाते.

वसंत पंचमी : ३ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीचे अमृतस्नान लोकांना केवळ ज्ञानच नाही तर चारित्र्य आणि सर्जनशीलतेचे आशीर्वाद देते, असे मानले जाते. वसंत पंचमी हा देवी सरस्वतीचा दिवस आहे, जी लोकांना ज्ञान, सर्जनशीलता आणि बुद्धी प्रदान करते.

माघी पौर्णिमा : माघी पौर्णिमेच्या दिवशी १२ फेब्रुवारीला अमृतस्नानाच्या दिवशी जे लोक दान करतात, त्यांना सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी भक्तांनी ध्यान करावे आणि इतरांना मदत करावी असा सल्ला दिला जातो.

महाशिवरात्री : अमृतस्नानाचा शेवटचा दिवस २६ फेब्रुवारीला आहे. महाशिवरात्री ही भगवान शिवाची महान रात्र मानली जाते, जेव्हा त्यांची ऊर्जा आणि कंपने सर्वात शक्तिशाली असतात. या दिवशी स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे अज्ञान दूर होते आणि ती व्यक्ती भगवान शिवाच्या अधिक जवळ जाते असे मानले जाते.