सगळेच मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करत आहेत. नव्या वर्षाच्या आगमनासह जगभरातील लोक नवीन वर्षाचे संकल्प करत आहेत. या संकल्पांमध्ये व्यायामापासून वजन कमी करणे, आर्थिक स्थिती सुधारणे आणि नवीन नोकरी मिळवणे अशा काही जुन्या संकल्पांचाही समावेश आहे. मात्र, नवीन वर्षानिमित्त संकल्प करण्याची ही परंपरा कुठून आणि कधी सुरू झाली? हे नववर्षाचे संकल्प खरंच पूर्ण होतात का? याबाबत इतिहास काय सांगतो याचा हा आढावा…
प्राचीन बॅबिलोनियन, रोमन काळ
नवीन वर्षानिमित्त संकल्प करणं हा काही २१ व्या शतकातील शोध नाही. खरं तर बहुतेक प्राचीन संस्कृतीत वर्षाच्या सुरुवातीला या पद्धतीने संकल्प केल्याचं दिसतं. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे, प्राचीन बॅबिलोनी लोकांनी सुमारे ४,००० वर्षांपूर्वी अशाप्रकारे प्रथम नववर्षाचे संकल्प केले होते.
बॅबिलोनियन लोकांचं नवीन वर्ष मार्चच्या मध्यावर सुरू झालं होतं. त्यावेळी त्यांनी त्यांचे नवीन वर्षाचे संकल्प धर्म, पौराणिक कथा, शक्ती आणि सामाजिक आर्थिक मूल्यांशी संबंधित होते.
बॅबिलोनियन लोक त्यांच्या १२ दिवसांच्या ‘अकिटू’ उत्सवादरम्यान पुतळ्यांची रस्त्यावरून मिरवणूक काढतात आणि अराजकतेवर त्यांचा विजय साजरा करतात.
द कॉन्व्हर्सेशननुसार, “या उत्सवादरम्यान लोक पीक लावतात, राज्य करणार्या राजाशी निष्ठा ठेवतात किंवा नवीन राजाला राज्याभिषेक करतात आणि पुढच्या वर्षी कर्ज फेडण्याचे वचन देतात. बॅबिलोनियन लोकांचा असा विश्वास होता की, त्यांनी नवीन वर्षातील वचने पूर्ण केली, तर नवीन वर्षात देव त्यांच्यावर कृपा करेन.”
नंतरच्या काळात नवीन वर्षाच्या संकल्पाची परंपरा बॅबिलोनियन्सकडून प्राचीन रोमन लोकांमध्ये गेली. बॅबिलोनियन लोकांनंतर रोमन लोकांनी नवीन वर्ष साजरे करण्यास सुरुवात केली. नवीन वर्षाचा इटालियन देवीचा उत्सवही १५ मार्च रोजी साजरा केला जातो.
इसवी पूर्व ४६ मध्ये परिस्थिती बदलली. सीएनईटीनुसार, हे वर्ष ‘इतिहासातील सर्वात मोठे’ वर्ष म्हणून ओळखले गेले. हे वर्ष तब्बल ४५५ दिवसांचे होते. त्यावेळी ज्युलियस सीझरने फिएटद्वारे ‘ज्युलियन कॅलेंडर’ प्रकाशित केले. तसेच घोषणा केली की, १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात असेल आणि कॅलेंडरने योग्यरित्या काम करावे यासाठी दर चार वर्षांनी एक अतिरिक्त दिवस जोडला जाईल.
जानेवारी हे नाव प्राचीन रोमन देवता जानसच्या नावावरून ठेवण्यात आले. हा दोन तोंडी देव असून तो नवीन वर्षात आणि मागील वर्षात दोन्हीकडे पाहू शकतो, अशी मान्यता आहे.
मध्ययुगानंतर इतर कॅलेंडरमध्ये योग्य दिवस पाहता येत नसल्याने ज्युलियन कॅलेंडर लोकांच्या पसंतीस उतरले. १५८२ मध्ये पोप ग्रेगोरियन यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर लागू केले. तेच कॅलेंडर आजही जगभरात वापरले जाते. त्यामुळेच जगभरात बहुतेक लोक १ जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करतात.
नवीन वर्षाच्या संकल्पांचं काय होतं? लोक ते पूर्ण करतात का?
मेरियम वेबस्टरच्या म्हणण्यानुसार, नववर्षाचा संकल्प (‘न्यू इयर रिझोल्यूशन’) हा शब्द प्रथम १८१३ मध्ये बोस्टन वृत्तपत्रात वापरला गेला. आधी नववर्षाच्या संकल्पात देवाला वचन दिलं जायचं. आता नवीन वर्षाच्या संकल्पांना धार्मिक स्वरुप राहिलेलं नाही. सध्या देवतांना नवस बोलण्याऐवजी लोक स्वतःसाठीच संकल्प करतात.
फोर्ब्स हेल्थ/वनपोल सर्वेक्षणात खालील नवीन वर्षाचे संकल्प सर्वाधिक केले जातात:
फिटनेसमध्ये सुधारणा (४८ टक्के)
आर्थिक परिस्थितीत सुधारणा (३८ टक्के)
मानसिक आरोग्यात सुधारणा (३६ टक्के)
वजन कमी करा (३४ टक्के)
आहारात सुधारणा (३२ टक्के)
प्रवासात वाढ (६ टक्के)
नियमितपणे ध्यान करणे (५ टक्के)
कमी मद्यपान (३ टक्के)
कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करणे (३ टक्के)
हेही वाचा : VIDEO: गोष्ट मुंबईची – इंग्रजांच्या काळात भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत झाली होती दंगल, कारण काय? जाणून घ्या…
अनेक लोक नववर्षाच्या निमित्ताने संकल्प करतात. मात्र, त्यांना ते पूर्ण करता येत नाहीत. हिस्टरी डॉट कॉमनुसार, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, अमेरिकेच्या नागरिकांपैकी फक्त ८ टक्के लोक जे संकल्प केलेत त्याप्रमाणे वागतात. जवळपास निम्म्या लोकांनी म्हणजे ४५ टक्के लोकांनी नववर्षाचे संकल्प केल्याचं मान्य केलं. यानुसार नववर्षाचे संकल्प सरासरी ३.७४ महिने पाळले जातात.