अनिकेत साठे
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या एकविसाव्या शतकातील तिसऱ्या कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी राज्य सरकारने चार समित्या गठीत करून तयारीला सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक, साधू-महंत, पर्यटक सहभागी होतात. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन आव्हानात्मक असते. वर्षभर चालणारा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुंभनगरीत विविध स्तरावर अफाट नियोजन करावे लागते. राज्य ते जिल्हा पातळीवर स्थापलेल्या समित्यांमधून त्याची प्रचिती येत आहे.
समित्यांचे स्वरूप कसे आहे?
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नेटके नियोजन होण्यासाठी राज्य सरकारने राज्य ते स्थानिक पातळीपर्यंत वेगवेगळ्या एकूण चार समित्या स्थापन केल्या आहेत. नियोजन व प्रभावी अमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री, नाशिकचे लोकप्रतिनिधी अशा २८ जणांचा अंतर्भाव आहे. तर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत विविध विभागांचे सचिव व नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी अशा १८ जणांचा समावेश आहे. राज्याप्रमाणे जिल्हा पातळीवर दोन स्वतंत्र समित्या कार्यरत असतील. ग्रामविकास तथा पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीवर महत्त्वाची जबाबदारी आहे. कुंभमेळा सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजना सुचवण्यापासून ते कामे वेळेत पूर्ण करण्याचे दायित्व त्या समितीवर असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समितीत सर्वच शासकीय विभागप्रमुखांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण : राखीव वनक्षेत्रातल्या प्रकल्पांत ‘असुरक्षित’ काय?
आगामी सिंहस्थ कधी आहे?
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा त्र्यंबकेश्वरमध्ये आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराजांनी गतवर्षी जाहीर केल्या. त्यानुसार सिंहस्थ ध्वजवंदन ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून प्रथम शाहीस्नान दोन ऑगस्ट २०२७ रोजी होईल. द्वितीय शाहीस्नान ३१ ऑगस्ट, तृतीय शाहीस्नान १२ सप्टेंबर तर, सिंहस्थ समारोप (ध्वजावतरण) २४ जुलै २०२८ रोजी होणार आहे. प्रशासनासह साधू,-महंतांना नियोजन सोपे व्हावे, यासाठी तारखा आधीच जाहीर करण्यात आल्याचे साधू-महंतांनी स्पष्ट केले. नाशिक येथील शाहीस्नानाच्या तारखा मात्र अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
वादाचा इतिहास कसा आहे?
देशात प्रयागराज (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा पूर्वी चक्रतीर्थ येथे भरत होता. सव्वादोनशे वर्षांपूर्वी शाहीस्नानाच्या मानावरून शैव आणि वैष्णव पंथीय साधू-महंतांमध्ये संघर्ष झाला. त्यामध्ये हजारो साधुंना प्राण गमवावे लागल्याचे सांगितले जाते. त्या वादावर वैष्णव पंथीयांनी नाशिक येथे तर शैव पंथीयांनी त्र्यंबकेश्वर येथे स्नान करावे, असा तोडगा काढण्यात आला. तेव्हापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरण्यास सुरुवात झाली. नाशिक येथे वैष्णव पंथीयांचे तीन आखाडे असून त्र्यंबकेश्वर येथे शैव पंथीयांचे १० आखाडे आहेत. उभयतांमधील वाद मात्र आजही शमलेले नाहीत. कुठल्याही कारणांवरून त्यांचे खटके उडतात. आगामी सिंहस्थाच्या तारखा त्र्यंबकेश्वरमधून जाहीर झाल्यानंतर नाशिक येथे वैष्णव पंथीयांनी त्यास आक्षेप घेतला होता. त्या तारखांशी नाशिक येथील तिन्ही आखाड्यांचा संबंध नाही. या संदर्भात कुठलीच बैठक झालेली नाही. याबाबत आखाडा परिषदेचे आमचे अध्यक्ष, महामंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच तारखा जाहीर केल्या जातील.असे नाशिकच्या साधू-महंतांनी म्हटले होते. या निमित्ताने वादाचा श्रीगणेशाही झाला आहे.
हेही वाचा >>>एक वर्षापूर्वी राजकारणातून निवृत्तीचा विचार, सामानही हैदराबादला पाठवले; मग असं काय घडलं की नरसिंहराव पंतप्रधान झाले?
पूर्वतयारी किती व्यापक असते?
गेल्या वेळी म्हणजे २०१५-१६ मधील कुंभमेळ्यात प्रशासनाने वर्षभरात पाच ते सहा कोटी भाविक, पर्यटक व साधू-महंत सहभागी होण्याचा अंदाज बांधून तयारी केली होती. प्रत्येक शाही पर्वणीवेळी नाशिक शहरात ८० लाख ते एक कोटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २५ ते ३० लाख भाविक गृहीत धरले होते. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये येणारे बहुतांश मार्ग प्रशस्त करण्यात आले. अंतर्गत रस्त्यांचे नियोजन भाविकांना डोळ्यासमोर ठेवून झाले. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे चौपदरीकरण पूर्णत्वास गेले. गोदावरी नदीवर पाच नव्या पूलांची बांधणी झाली. महापालिकेने शहरात १०५ किलोमीटरचे रस्ते बांधले. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ६०० किलोमीटरच्या रस्त्यांचे विस्तारीकरण आणि २८ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण केले होते. त्या अंतर्गत वेगवेगळ्या मार्गावर लहान-मोठे ७६ पूल बांधण्यात आले. स्नानासाठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये १० नवीन घाट बांधण्यात आले होते. साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी नाशिक शहरात २८३ एकर क्षेत्रात साधुग्राम ही खास स्वतंत्र नगरी उभारण्यात आली. या ठिकाणी पथदीप, अंतर्गत विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा आदी बरीच कामे करावी लागली. त्र्यंबकेश्वरमधील बहुतांश आखाड्यांकडे स्वत:ची जागा आहे. तिथे सोयी-सुविधा पुरवाव्या लागतात. जागा नसलेले आखाडे व अन्य धार्मिक संस्थांसाठी तुलनेत कमी आकारमानाचे साधुग्राम वसवले जाते. दोन्ही ठिकाणी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, तात्पुरती निवारागृहे, शौचालये व प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी लागते. सुरक्षा व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, वाहतुकीसाठी बसगाड्या अशा अनेक पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे लागते.
शिवधनुष्य पेलणे आव्हानात्मक का ठरते?
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सरकार व प्रशासनाला साधारणत: ३४ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. सर्व कामांचे काटेकोर नियोजन करून ती ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्णत्वास न्यावी लागतील. मागील सिंहस्थात तब्बल अडीच हजार कोटींची विकास कामे करण्यात आली होती. साधू-महंतांच्या सरबराईत कोणतीही उणीव राहू नये, याची सर्वतोपरी खबरदारी घेतली होती. नियोजनात २२ शासकीय विभाग सहभागी झाले होते. त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी शेकडो बैठका झाल्या होत्या. मुदतीत कामाचे नियोजन, मान्यता मिळवून पूर्तता करणे आव्हानात्मक असते. नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये अत्यंत कमी जागेत, पावसाच्या हंगामात कुंभमेळा होतो. अतिशय दाटीवाटीची वस्ती व अरुंद रस्त्यांमुळे गर्दीच्या व्यवस्थापनात यंत्रणेची कसोटी लागते. २००३-०४ मधील सिंहस्थात शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ३३ भाविकांना प्राण गमवावे लागले होते. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या जनसागराचे व्यवस्थापन आणि जागेची मर्यादा, हे प्रशासनासमोर मुख्य आव्हान ठरते. साधू-महंतांमधील वादात प्रशासनाची अनेकदा कोंडी होते.