एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्हावर कुणाचा हक्क? अशा प्रश्नानंतर मागील काही दिवसात दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्रात राजकीय खडाजंगी सुरु आहे. विभागलेल्या शिवसेनेतील दोन्ही गट दसरा मेळाव्यावरून एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आणि आपणच आयोजन करणार असा पवित्रा घेऊन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आहेत. दसरा मेळाव्याच्या आयोजनाची संधी कुठल्या गटाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहेच पण तत्पूर्वी आपण आजवरच्या दसरा मेळाव्याची परंपरा व त्यातील महत्त्वपूर्ण क्षणांची सविस्तर माहिती घेऊयात..
दसरा मेळावा का व कधी सुरु झाला?
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या स्थापनेनंतर बराच अवधी जाहीर सभा झालेली नव्हती. कार्यकर्ते घरी येऊन भेटत होते, या कार्यकर्त्यांना एकत्रित भेटण्यासाठी शिवाजी पार्कवर सभा घ्यायचे ठरले आणि त्याचा मुहूर्त ठरला दसरा मेळावा! १९ जून १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ३० ऑक्टोबर १९६६ ला पहिला दसरा मेळावा आयोजित केला होता. दरवर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना याच दिवशी वर्षभरासाठी कार्यक्रमांची रूपरेषा सांगत त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक न चुकता ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर सहभागी व्हायचे.
..जेव्हा दसरा मेळाव्यावर आस्मानी संकट कोसळलं
शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात दरवर्षी बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर न चुकता येत होते. मात्र या परंपरेत तीन वर्ष खंड पडला होता. २००६ साली अतिपावसामुळे दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता. याशिवाय २००९ व २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू असल्याने दसरा मेळावा झाला नव्हता. हे अपवाद वगळल्यास आजतागायत दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे. २०१२ साली बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात भाषण केले होते.
पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना भीती..
अकोलकर यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या वाहिल्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरेल की नाही अशी भीती बाळासाहेब ठाकरे यांना वाटत होती. म्हणूनच निदान समोर प्रेक्षक दिसावेत अशा विचाराने पार्कच्या कडेऐवजी मधोमध व्यासपीठाचा मंच उभारण्यात आला होता. या पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या अपेक्षेच्याउलट प्रचंड गर्दी झाली होती. यानंतर ना शिवसेनेकडून कधी व्यासपीठाची जागा बदलली ना कधी शिवसैनिकांची गर्दी ओसरलेली पाहायला मिळाली
दसरा मेळाव्यातील काही अविस्मरणीय क्षण
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची तोफ अनेकदा कडाडली होती, शिवसैनिकांच्याच नव्हे तर देशभरात सर्वांच्या कायम लक्षात राहतील असे अनेक क्षण या शिवतीर्थाने पाहिले आहेत. १९७५ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या आणीबाणीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविण्याचा क्षण असो वा १९९१ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या सामन्याला विरोध करायचा असो असे अनेक महत्त्वाच्या घोषणा बाळासाहेबांनी या शिवतीर्थावर केल्या होत्या.
१९७८ च्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतर बाळासाहेबांनी, ‘तुमचा माझ्यावर विश्वास नाही, तर मी शिवसेना सोडून जातो,’ असं मुंबईकरांना सुनावलं होतं. या एका वाक्याचा थेट परिणाम १९८५ च्या महापालिका निवडणुकीत दिसला आणि पहिल्यांदा शिवसेनेने स्वबळावर महापालिकेत भगवा फडकवला.
१९९१ साली बाळासाहेबांनी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर पाकिस्तानचा सामना होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा दिला होता, यानंतर शिवसैनिकांनी वानखेडेवर जाऊन पिच खोदूनवर डांबर टाकलं. परिणामी तिथे मॅच होऊ शकली नव्हती.
दरम्यान, २०१० मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कचा समावेश ‘सायलेंट झोनमध्ये’ केल्यावर सामनातून बाळासाहेबांनी या निर्णयावर कडाडून टीका केली होती, ज्यांनंतर हायकोर्टाने पक्षाला वार्षिक सभा शिवाजी पार्कात घेण्याची परवानगी दिली होती. आता यंदा हे मैदान आणि शिवसैनिक दसरा मेळाव्यात नेमक्या शिवसेनेच्या कोणत्या गटाच्या बाजूने दिसणार या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.