भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत उत्तराखंडच्या रुरकीजवळ ३० डिसेंबर २०२२ रोजी जीवघेण्या कार अपघातातून बचावला. अतिशय कठीण परिस्थीतून पंतने समयसूचकता राखून स्वतःला गाडीतून बाहेर काढले आणि नंतर त्याच्या गाडीने लगेच पेट घेतला. अपघाताचे स्वरूप आणि पंतला झालेल्या जखमा आणि होत असलेल्या वेदना लक्षात घेता तो क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरणार की नाही, अशीच शंका निर्माण झाली होती. मात्र, पंतने जिद्द दाखवली. हार न मानता कठोर मेहनत घेणे सुरू ठेवले. आता अपघाताच्या तब्बल दीड वर्षानंतर तो नव्याने पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आगामी ‘आयपीएल’ हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना भारतीय संघात परतण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतचा नेमका अपघात कधी झाला?

३० डिसेंबर २०२२ रोजी आईला भेटून माघारी परतताना पंतची वेगात असलेली मर्सिडिज गाडी हमरस्त्यावरील दुभाजकाला धडकली. हा अपघात इतका गंभीर होता की पंतला घटनास्थळी गाडीतून बाहेर पडणे अवघड झाले होते. खिडकीच्या काचा फोडून पंत बाहेर आला आणि क्षणार्धात गाडीने पेट घेतला. त्याच्या गुडघ्याला, मनगटाला, घोट्याला दुखापत झाली होती. पाठीवर ओरखडे पडले होते. एकूणच सगळी परिस्थिती गंभीर होती. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुरुवातीलाच त्याची क्रिकेट कारकीर्द धोक्यात असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा : ‘बुढ्ढी के बाल’ तब्येतीला मारक?

पंतवरील उपचारपद्धती काय होती?

पंतच्या दुखापती जेवढ्या गुंतागुंतीच्या होत्या, तेवढीच त्याच्यावरील उपचारपद्धती कठीण होती. आवश्यक ते उपचार आणि शस्त्रक्रिया ठरल्यानंतर त्याचे सामर्थ्य वाढवणे आणि हालचालींमध्ये किमान लवचिकता आणणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. यासाठी दोन प्रक्रियेत त्याच्यावर उपचार करण्यात आले. यामध्ये सगळ्यात आधी गुडघ्यावर अस्थिबंधनाच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर मनगट आणि घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मग चेहऱ्यावरील उपचार करून तो पूर्वीसारखा करण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेण्यात आला. सर्वांत शेवटी ११ महिन्यांचा पुनर्वसन कार्यक्रम आखण्यात आला. यामध्ये दररोज तीन सत्रांत फिजिओथेरपी केली जात होती.

पंत मैदानावर कशामुळे परतू शकला?

दुर्दम्य इच्छाशक्ती, चाहत्यांचे प्रेम आणि झटपट मिळालेल्या उपचारामुळे पंत नुसता अपघातातून वाचला नाही, तर आयुष्यात नव्याने उभा राहिला. त्यानंतरही त्याचे मैदानावर परतणे कठीण होते. क्रिकेटच्या मैदानावर सर्वाधिक उठबस कराव्या लागणाऱ्या यष्टिरक्षकाच्या भूमिकेत तो खेळायचा. अपघाताचे स्वरूप बघता एकवेळ फलंदाज करू शकेल, पण यष्टिरक्षण त्याच्यासाठी कठीणच होते. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यासाठी आखलेल्या खास पुनर्वसन कार्यक्रमामुळे पंत मैदानावर पुन्हा पाय ठेवू शकला. फिजिओथेरपी, पोहणे आणि टेबल टेनिस खेळण्यातून त्याने हालचाली करण्यास सुरुवात केली. पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान १८ महिने लागतील आणि तो किती झटपट प्रगती करतो यावर त्याचे मैदानावरील खेळणे अवलंबून असेल असा डॉक्टरांचा अंदाज होता. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पंतने डॉक्टरांनी खात्री दिली होती की तुम्ही जेवढी मुदत द्याल त्याच्या सहा महिने आधी मी तंदुरुस्त होऊन दाखवेन.

हेही वाचा : जिम कॉर्बेट उद्यानातील व्याघ्रसफारीचा वाद काय होता? नैसर्गिक जंगलात सिमेंटचे जंगल कसे उभे राहिले?

पंतच्या पुनरागमनासाठी घाई केली जात आहे का?

पंतला झालेल्या दुखापतीचे स्वरूप आणि क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता लक्षात घेता पंतचे पुनरागमन हा चमत्कार मानला जात आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असलेल्या सुविधा आणि उपलब्ध तज्ज्ञांच्या मेहनतीने पंत मैदानावर उतरण्यासाठी जरूर सज्ज झाला असला, तरी त्याच्याकडे एक फलंदाज म्हणून बघितले जायला हवे. यष्टिरक्षकाला कराव्या लागणाऱ्या हालचाली लक्षात घेता हे पुनरागमन पंतसाठी वेगळे आव्हान घेऊन आले आहे. ‘बीसीसीआय’ने त्याला फलंदाज म्हणूनच नाही, तर यष्टिरक्षणासाठीदेखील तंदुरुस्त जाहीर केले आहे. मात्र, त्याला प्रत्यक्ष मैदानावर ही दुहेरी भूमिका बजावणे जमते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पंत ‘आयपीएल’मध्ये चमक दाखवू शकेल का?

पंतने आता सरावाला सुरुवात केली असून याची चित्रफीत दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रसिद्ध केली. यात तो मोठे फटके मारताना दिसून आला. पंतला फलंदाजी करताना फारशी अडचण येणार नाही असे अपेक्षित आहे. गेल्या हंगामात पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली होती. त्यामुळे त्याचे पुनरागमन दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्याने यापूर्वी अनेकदा दिल्लीला एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. शिवाय यावेळी चाहत्यांचा मोठा पाठिंबाही त्याला लाभेल. अशात तो ‘आयपीएल’मध्ये नक्कीच चमकदार कामगिरी करू शकेल. या स्पर्धेतील कामगिरीवर त्याचे भारतीय संघातील पुनरागमन अवलंबून असेल.

हेही वाचा : मुंबईत आठ रेल्वेस्थानकांच्या नावात बदल कसा अमलात येणार? रेल्वे स्थानकांच्या नामांतराची प्रकिया कशी असते?

पंतच्या पुनरागमनामुळे नव्या खेळाडूंचे काय होणार?

पंतच्या दुखापतीनंतर भारतीय क्रिकेट संघाने अनेक यष्टिरक्षकांना संधी देऊन पाहिली. या दीड वर्षात केएस भरत, इशान किशन, संजू सॅमसन, जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल या यष्टिरक्षकांना संधी मिळाली. मात्र, जुरेल वगळता इतरांना फारशी चमक दाखवता आली नाही. अर्थात, जुरेलची उपयुक्तता ही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून कसोटी क्रिकेटसाठी झाली आहे. जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी ‘आयपीएल’ होणार असल्यामुळे संघ निवडीसाठी हा उत्तम पर्याय ठरणार आहे. पंत ‘आयपीएल’मध्ये यशस्वी झाल्यास त्याचे भारतीय संघातील स्थान निश्चित होईल. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन जास्तीचा यष्टिरक्षक निवडला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will rishabh pant play for india after survived from the deadly accident will he play in ipl print exp css