राजकीय पक्षांच्या सभांनी गाजवलेले आणि मुंबई क्रिकेटची पंढरी मानले जाणारे शिवाजी महाराज मैदान गेल्या काही वर्षापासून धुळीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. खेळाडूंसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे असलेल्या या मैदानातील उडणारी लाल माती आसपासच्या रहिवाशांसाठी त्रासदायक ठरते आहे. गेल्या आठ – दहा वर्षांपासून मातीच्या धुळीचा प्रश्न सोडवण्यासाठी रहिवाशांचे आंदोलन सुरू असून अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. लाल मातीच्या धुळीचा प्रश्न इतका गंभीर का बनला, त्याबाबत घेतलेला हा आढावा…
शिवाजी पार्क मैदानाला इथके महत्त्व का?
दादर पश्चिमेला असलेले शिवाजी पार्क मैदान ही मध्य मुंबईची ओळख. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मुले येतात. तसेच विविध राजकीय आणि धार्मिक सभा या मैदानावर होत असतात. या मैदानाला क्रीडा विश्वात आणि राजकीय पटलावर खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीसारखे खेळाडू या मैदानाने घडवले. तर अनेक राजकीय पक्षही शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतात. मध्यवर्ती भागातील या मैदानाच्या आसपासच्या परिसरात घर असणे ही सुद्धा मुंबईकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. या परिसरातील सुशिक्षित, उच्चभ्रू मराठी वर्ग सुजाण मतदार आहे.
मैदानातील धुळीची इतकी चर्चा का?
मुंबईत अनेक खेळाची मैदाने आहेत. परंतु शिवाजी पार्क मैदान कायम चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून या मैदानातील धुळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी हिवाळ्यात मैदानातील माती हवेत उडू लागते व त्याचा येथील रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे या परिसरातील घरांमध्ये खूप धूळ येते. उन्हाळ्यात हा त्रास अधिकच वाढतो. वर्षानुवर्षे हा त्रास वाढतच आहे. मैदानातील धुळीच्या त्रासामुळे रहिवाशांना व मैदानात खेळायला, बसायला, धावायला येणाऱ्यांना श्वासोच्छवासाचे व त्वचेचे आजार होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
मैदानाची देखभाल कोणाकडे?
मुंबई महानगरपालिकेकडे या मैदानाच्या देखभालीची जबाबदारी आहे. महानगरपालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाची यात मुख्य जबाबदारी आहे. तसेच मैदानात विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच आहे.
धुळीचा इतका त्रास का उद्भवला?
मैदानावर विविध राजकीय आणि धार्मिक सभा आणि कार्यक्रमांनंतर या मैदानाची दुर्दशा होते. तसेच दरवर्षी १ मे व प्रजासत्ताक दिनी मैदानावर पोलिसांचे संचलन होते. संचलनासाठी मैदानात अतिरिक्त माती टाकली जाते. ही माती नंतर तशीच राहते व ती वाऱ्याबरोबर उडते. तसेच मुंबई महापालिकेने २०१५ मध्ये मैदानातील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी हिरव्या गवताची पेरणी केली होती. गवत तयार करण्यासाठी या मैदानावर मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आली होती. पण हिरवळीचा प्रयोग फसल्यानंतर आता उरलेली माती वाऱ्याबरोबर उडत असून धुळीचा त्रास वाढल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
रहिवाशांचे म्हणणे काय?
मैदानात टाकलेली माती काढून टाकावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र गेल्या आठ वर्षांत या समस्येवर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे रहिवासी संघटनेने एप्रिल २०२३ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. मंडळाने पंधरा दिवसांत माती काढण्याचे आदेश दिले होते. तसे आदेश यावर्षीही दिले. मात्र त्यावर काहीही तोडगा निघाला नाही.
पालिकेने आतापर्यंत कोणत्या उपाययोजना केल्या?
धुळीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या. गवत पेरणीचा प्रयोग केला. तसेच पर्जन्य जलसंचय यंत्रणा, तुषार सिंचन असेही अनेक प्रयोग करण्यात आले. तुषार सिंचन प्रकल्पामध्ये पर्जन्य जल पुनर्वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणाली वापरून ३५ नवीन रिंग विहिरी तयार करण्यात आल्या. रिंगवेल विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी या मैदानावर दररोज फवारून धूळ थोपविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मैदानातील वरवरची माती काढण्यासाठी डस्ट सक्शन मशीन अर्थात धूळ खेचून घेणारे यंत्र वापरण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर तसेच राजकीय हस्तक्षेपानंतर हे सगळे प्रयोग अर्धवट राहिले आणि माती काही निघाली नाही.
राजकीय भूमिका काय?
मैदानातील मातीचा प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला. मात्र हा प्रश्न तसाच ठेवून त्याचे राजकारण करण्याचा खेळच इथे जास्त रंगला. परिसरातील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे शस्त्रही उगारले. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्याचबरोबर शिवाजी पार्कमधील उच्चभ्रू रहिवासी वर्ग या प्रश्नासाठी फारसा आक्रमकपणे रस्त्यावर उतरला नाही.
धुळीच्या समस्येबाबत सध्या काय सुरू आहे?
याप्रकरणी दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आयआयटी मुंबई, पर्यावरण तज्ज्ञ प्रा. वीरेंद्र सेठी यांचा सल्ला घेतला. त्यांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत शिफारशी केल्या आहेत. यामध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारच्या उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये मातीवर रोलर संयंत्र फिरवणे, सातत्याने पाणी फवारणी करणे या उपायांचा अंतर्भाव आहे. दीर्घकालीन व्यापक उपाययोजनांमध्ये वाऱ्याचा प्रवाह, इतर संबंधित घटकांचा तपशीलवार अभ्यास करणे आणि त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही आधारित नियोजन करणे आदींचा समावेश आहे. त्यामुळे धुळीचा हा प्रश्न अजून काही काळ असाच राहणार हे स्पष्ट आहे.
indrayani.narvekar@expressindia.com