मंगल हनवते
बोरिवली ते ठाणे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचे कंत्राटही बहाल करण्यात आले आहे. नुकतीच प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. मात्र या प्रकल्पाचे काम सुरू होण्यास दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र भुयारीकरणाच्या कामास सुरुवात होण्यास वर्षभराचा काळ लागण्याची शक्यता आहे. तेव्हा या प्रकल्पाच्या कामास, भुयारीकरणाच्या कामास वेळ का लागणार याचा हा आढावा.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची गरज का?
ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी सध्या एक ते दीड तासाचा अवधी लागतो. ठाण्याहून बोरिवलीला रस्तेमार्गे जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे- बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला. काही कारणांमुळे हा प्रकल्प २०२१ पर्यंत मार्गी लावणे एमएसआरडीसीला शक्य झाले नाही. मात्र या प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर हा प्रकल्प २०२१ मध्ये एमएमआरडीएकडे वर्ग केला. सरकारच्या निर्णयानुसार आज एमएसआरडीसीचा मूळ प्रकल्प एमएमआरडीए मार्गी लावत आहे.
भुयारी मार्ग कसा असेल?
ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा असून तेथे १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. सहा मार्गिका (येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन) असलेल्या या प्रकल्पासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १०.२५ किमीच्या दुहेरी बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिका असतील. त्यातील दोन मार्गिका वाहतुकीसाठी असतील तर एक आपत्कालीन मार्गिका असेल. आग, अपघात किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्या मार्गिकांवरून तात्काळ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या आणि इतर सामग्री घटनास्थळी पोहचवता येईल. आपत्कालीन स्थितीत वाहनचालक, प्रवाशांना तसेच वाहनांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बोगद्यात तब्बल ४५ क्रॉस पॅसेज तयार करण्यात येणार आहेत. बोगद्यात प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पादचारी क्रॉस पॅसेज असेल. प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर एक वाहन क्रॉस पॅसेज असेल. बोगद्याच्या सुरुवातीला एक नियंत्रण कक्ष असून अपघात, दुर्घटनेची माहिती मिळाल्याबरोबर अपघात स्थळाजवळील पादचारी क्रॉस पॅसेज आणि वाहनांसाठीच्या क्रॉस पॅसेजची दारे उघडतील. त्यानंतर नागरिकांना पादचारी क्रॉस पॅसेजने दुसऱ्या बोगद्यात जाता येईल. वाहनांसाठी असलेल्या क्रॉस पॅसेजमधून वाहनांना बाजूच्या बोगद्यात जाता येईल. वाहनचालक, प्रवासी, वाहने सुरक्षित स्थळी आणून त्यांना बोगद्याच्या बाहेर आणले जाईल. एकूणच क्रॉस पॅसेज आणि आपत्कालीन मार्गिकेमुळे बोगद्यातील प्रवास सुरक्षित होणार आहे.
आणखी वाचा-कुत्रे, रोबोट आणि स्पंज बॉम्ब; जमिनीखालील भुयारात न उतरता इस्रायली सैनिक ते कसे नष्ट करत आहे?
कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती?
या प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून मे महिन्यात निविदा अंतिम केली आहे. हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. निविदा अंतिम झाल्याने आता लवकरच कामाला सुरुवात होईल असे वाटत असतानाच कंत्राट अंतिम करून पाच महिने उलटले तरी कामास सुरुवात झालेली नाही. काम सुरू होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. त्यातही या प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी किमान आठ-नऊ महिने लागण्याची शक्यता आहे.
काम सुरू होण्यास वेळ का लागणार?
ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जात असल्याने या प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळ आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. ती परवानगी मिळाल्यानंतरच दुहेरी बोगद्याच्या कामास सुरुवात करता येणार आहे. त्यानुसार एमएमआरडीएने राज्य वन्यजीव मंडळाच्या परवानगीसाठी प्रस्ताव ठेवला होता. मागील महिन्यातच राज्य वन्यजीव मंडळाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता राज्य वन्यजीव मंडळाकडून हा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा आता एमएमआरडीएला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. परवानगी मिळाली तर एमएमआरडीए कामाला सुरुवात करू शकणार आहे. पण परवानगी कधी मिळणार याचे उत्तर अद्याप कोणाकडेही नाही. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी वेळ लागणार आहे. असे असले तरी नव्या वर्षाच्या सुरुवातीला कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-टायगर ३: बॉलिवूडमधील पाकिस्तानचे चित्रण आणि नवा बदल, पण असे का?
ठाणे- बोरिवली वेगवान प्रवास कधी?
एकीकडे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आणखी आठ-नऊ महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ लागण्याची शक्यता आहे. दोन बोगद्यांसाठी एकूण चार टीबीएम यंत्रे अर्थात टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहेत. ती यंत्रे पहिल्यांदाच भारतात, चेन्नईत तयार केली जाणार आहेत. त्यामुळे यंत्रे परदेशातून आणण्याचा काहीसा वेळ वाचणार असला तरी टीबीएमची निर्मिती करण्यासाठी आणि चेन्नईतून ती मुंबईत आणण्यासाठी आठ-नऊ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुयाराचे काम सुरू होण्यासही वेळ लागण्याची शक्यता आहे. काम सुरू झाल्यापासून पाच महिन्यात काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली असा प्रवास केवळ २० ते २२ मिनिटात करण्यासाठी साधारण २०२९-३० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.