जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदान १९ एप्रिलपासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १०२ जागांवर शुक्रवारी मतदान होत आहे. मतदानानंतर डाव्या हाताच्या बोटावर निळ्या शाईने (इलेक्शन इंक) खूण केली जाते, ही खूणही लोकशाहीच्या उत्सवात तुम्ही सहभाग घेतलाय याची खूण समजली जाते. अनेक जण मतदान केल्यानंतर बोटावरील निळ्या शाईचा फोटोही सोशल मीडियावर टाकतात. तुमच्या बोटावरची निळी शाई हा पुरावा आहे की, तुम्ही तुमचे मत सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला दिले आहे. भारतीय निवडणुकांमध्ये निळ्या शाईचा समावेश करण्याचे श्रेय देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) सुकुमार सेन यांना जाते. परंतु ही निळी शाई आली कुठून? याचा शोध कोणी लावला हे जाणून घेणार आहोत.
निवडणूक शाई म्हणजे काय?
पाणी आधारित शाई हे सिल्व्हर नायट्रेट, विविध रंग आणि काही सॉल्व्हेंट्स यांचे मिश्रण आहे. लोक त्याला निवडणुकीची शाई म्हणून ओळखतात. ४० सेकंदांच्या आत बोटांच्या नखांवर आणि त्वचेवर ती लावल्यास जवळजवळ अमीट छाप मागे सोडते.
या शाईची निर्मिती कशी झाली?
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (NPL) नवी दिल्ली येथील केमिस्ट डॉ. नाहर सिंह हे सध्या या फॉर्म्युलेशनचे संरक्षक आहेत. डॉ. सिंह म्हणतात, “हे एक गुपित आहे. इलेक्शन इंकवर कधीही पेटंट घेतले गेले नाही, जेणेकरून ते अत्यंत गोपनीयतेत ठेवले जाईल. हे रहस्य १९६२ पासून कधीही उघड झालेले नाही.” भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी निळ्या शाईचा विकास झाला. NPL कडे या शाईची कोणतीही लेखी नोंद नाही. औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) रसायनशास्त्रज्ञ सलीमुझ्झमान सिद्दीकी यांनी ही शाई तयार केल्याचे सांगितले जाते. मात्र, नंतर ते पाकिस्तानात गेले. भारतात हे काम त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेषतः डॉ. एम. एल. गोयल, डॉ. बी. जी. माथूर आणि डॉ. व्ही. डी. पुरी यांनी पुढे नेले.
निवडणूक शाई पहिल्यांदा कधी वापरली गेली?
१९६२ मध्ये देशात तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हापासून सर्व संसदीय निवडणुकांमध्ये मतदारांना चिन्हांकित करण्यासाठी निवडणूक शाई वापरली जात आहे. दुहेरी मतदान रोखण्यासाठी हे केले जाते. डॉ.सिंह सांगतात, ही निळी शाई पाणी, डिटर्जंट, साबण आणि इतर सॉल्व्हेंट्सला प्रतिरोधक बनवण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे हात कशानेही धुतले तरी ही शाई क्षीण किंवा तात्काळ निघणार नाही. ही खूण नखावर काही आठवडे राहते. जसजशी नखे वाढू लागतात, तसतशी ती हळूहळू मिटायला सुरुवात होते. या शाईपासून त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही, असंही डॉ. सिंह सांगतात.
हेही वाचाः मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
ही शाई कुठे तयार होते?
दक्षिण भारतातील एका कंपनीत आता निळी शाई तयार केली जाते. म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड (MVPL) नावाची कंपनी ही शाई तयार करते. NPL ने १९६२ मध्ये परवाना आणि या शाईची सर्व माहिती म्हैसूर पेंट्स आणि वार्निश लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरित केली होती. MVPL ही निवडणूक शाई मोठ्या प्रमाणात विकत नाही. ही शाई फक्त सरकार किंवा निवडणुकीशी संबंधित एजन्सींनाच पुरवली जाते.
२०२४ च्या निवडणुकीसाठी कंपनीने निवडणूक आयोगाला शाईच्या २८ लाख बाटल्या दिल्या
२०२४ च्या निवडणुकांसाठी MVPL ने भारतीय निवडणूक आयोगाला सुमारे २८ लाख निळ्या शाईच्या बाटल्यांचा पुरवठा केला आहे. त्याची किंमत ५८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक आयोगाला सुमारे २६ हजार लिटर निवडणूक शाईचा पुरवठा करण्यात आला होता. MVPL च्या मते, ही निळी शाई एक विशेष फॉर्म्युलेशन आहे. त्यात सिल्व्हर नायट्रेट असते, जे त्वचेवर आणि नखांवर रसायनांवर प्रतिक्रिया करून बोटांवर डाग सोडते जो कित्येक आठवडे तसाच राहतो. या शाईमध्ये १०-१८ टक्के सिल्व्हर नायट्रेट आणि इतर सॉल्व्हेंट्स असतात. सिल्व्हर नायट्रेट त्वचेसाठी सुरक्षित मानले जाते. MVPL सीईओ मोहम्मद इरफान म्हणतात, “आम्ही सुमारे एक अब्ज लोकांना शाई देऊ शकतो. MVPL ने विकसित केलेल्या निवडणूक शाईच्या वापरामुळे भारतातील निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यात आणि मतदारांची फसवणूक रोखण्यात मदत झाली आहे. निवडणुकीची निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी हे एक साधन आहे.”
MVPL या देशांना निवडणुकीची शाई पुरवते
आतापर्यंत MVPL ने निळ्या शाईचे मलेशिया, कॅनडा, कंबोडिया, घाना, आयव्हरी कोस्ट, अफगाणिस्तान, तुर्की, नायजेरिया, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, मादागास्कर, नायजेरिया, सिंगापूर, दुबई, ल्योन, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, मंगोलिया यासह सुमारे ३५ देशांमध्ये मागणीनुसार निर्यात केली जाते.
मतदानापूर्वी ते का लागू केले जाते?
मतदारानं मत दिल्याची पडताळणी होताच मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर या शाईने खूण केली जाते, जेणेकरून मतदार मतदान केल्यावर मतदान केंद्र सोडतो, तोपर्यंत निवडणूक शाई सुकण्यासाठी आणि बोटावर एक वेगळे अमीट चिन्ह विकसित होण्यासाठी पुरेसा वेळ असतो.
तुम्ही शाई वापरण्यास नकार देऊ शकता का?
जर मतदाराने सूचनांनुसार डाव्या बोटावर शाई लावल्यास परवानगी नाकारली किंवा त्यांच्या बोटावर आधीच शाईचं चिन्ह असेल तर त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मतदाराने शाईची खूण काढण्यासाठी काही केले तर त्यांना मतदान करण्यापासूनही रोखले जाते. बोटात तेलकट किंवा स्निग्ध पदार्थ असल्यास अमिट शाईचे चिन्ह तटस्थ करण्याच्या उद्देशाने अधिकारी प्रथम बोट स्वच्छ करतात आणि नंतर शाई लावतात.