-प्रशांत केणी
गेल्या महिन्यात फेडरेशन चषक स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक आणि २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणारी महाराष्ट्राची धावपटू ऐश्वर्या मिश्रा उत्तेजक चाचणी टाळून बेपत्ता झाली आहे. या स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीत ऐश्वर्याने हिमा दास (५०.७९ सेकंद; राष्ट्रीय विक्रम) आणि मनजीत कौर (५१.०५ सेकंद) यांच्यानंतर ५१.१८ सेकंद अशी राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ नोंदवून लक्ष वेधले. परंतु या स्पर्धेनंतर महिना उलटला तरी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) आणि जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने स्थापन केलेले ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (एआययू) यांच्याकडून ऐश्वर्याच्या चाचणीचे नमुने घेण्यासाठी शोध सुरू आहे. उत्तेजक चाचणी टाळण्यासाठी ऐश्वर्या बेपत्ता असल्याचे जसे म्हटले जात आहे. तसेच तिच्या ठावठिकाणाबाबत विविध दावे केले जात आहेत. कोण आहे ही ऐश्वर्या मिश्रा, ती सापडल्यावर काय प्रक्रिया राबवली जाईल, तिच्यावर कारवाई होऊ शकेल का, याचा घेतलेला वेध.
ऐश्वर्या बेपत्ता असल्याचे का म्हटले जात आहे?
कोळीकोडे येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत दोन पदके पटकावणारी ऐश्वर्या महिना उलटून गेला तरी उत्तेजक चाचणीसाठी नमुने देऊ शकली नाही. या स्पर्धेनंतर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) आणि ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (एआययू) यांच्याकडून ऐश्वर्याच्या चाचणीसाठी शोध सुरू आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी उंचावणारी ऐश्वर्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळण्याच्या भीतीने टाळाटाळ करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ऐश्वर्याची आतापर्यंतची ॲथलेटिक्समधील कामगिरी कशी होती?
ऐश्वर्याच्या खात्यावर अद्याप एकही आंतरराष्ट्रीय पदक जमा नाही. राष्ट्रीय स्तरावर तिने काही पदके कमावली आहेत. ऑक्टोबर २०१९मध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत ऐश्वर्याने प्रथमच लक्षवेधी कामगिरी करताना ५२.४० सेकंद अशी वेळ नोंदवली होती. याच कामगिरीच्या बळावर तुर्कस्तान येथील राष्ट्रीय सराव शिबिरासाठी तिची त्या वर्षी भारतीय पथकात निवड झाली होती. ऐश्वर्याच्या वेगाने होत असलेल्या उत्कर्षामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण २०२०मध्ये खराब कामगिरीचे कारण देत तिला राष्ट्रीय शिबिरातून वगळण्यात आले होते. मग २०२१मध्ये राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ऐश्वर्याने ४०० मीटर आणि २०० मीटरमध्ये रौप्यपदके कमावली होती. गेल्या महिन्यातील फेडरेशन चषक स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण आणि २०० मीटर शर्यतीत तिने रौप्यपदक पटकावले होते.
ऐश्वर्याच्या ठावठिकाण्याबाबत काय म्हटले जात आहे?
फेडरेशन चषक स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकल्यापासून ऐश्वर्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. संघटनेकडे नोंदवलेला मोबाइल क्रमांक बंद आहे. ऐश्वर्याच्या ठावठिकाण्याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत, असे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव सतीश उचिल यांनी स्पष्ट केले आहे. कांदिवली येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रात ऐश्वर्या सराव करायची. तेथील प्रशिक्षकसुद्धा तिच्याबाबत अनभिज्ञ आहेत, ऐश्वर्या हरयाणात एका व्यक्तीचे मार्गदर्शन घेत होती. या क्रीडापटूला २०१६मध्ये उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळल्याबद्दल ‘नाडा’ने बंदी घातली होती, असेसुद्धा म्हटले जात आहे. परंतु ऐश्वर्या ९० वर्षांची आजी आजारी असल्यामुळे उत्तर प्रदेशात आहे. याचप्रमाणे फेडरेशन स्पर्धेदरम्यान तिची उत्तेजक चाचणी झाली होती. याशिवाय स्पर्धेची आणि तुर्कस्तानच्या सराव शिबिराची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ती दोनदा दिल्लीला गेली होती, असा दावा प्रशिक्षक सुमित सिंग यांनी केला आहे.
ऐश्वर्यावर कारवाई होणार का?
ऐश्वर्याचा ठावठिकाणा लागल्यावर तिची उत्तेजक चाचणी घेतली जाईल. यात ती दोषी आढळल्यास तात्पुरती बंदी घातली जाईल. त्यानंतर तिला ‘ब’ नमुन्यांतर्गत पुन्हा चाचणीची मागणी करता येईल. तिने उत्तेजके घेतल्याचे सिद्ध झाल्यामुळे तिच्यावर चार वर्षांच्या बंदीची कारवाई होऊ शकेल. परंतु वैद्यकीय कारणास्तव अजाणतेपणे उत्तेजके घेतल्याचे तिला सिद्ध करता आले, तर दोन वर्षांची बंदी घातली जाईल.
ऐश्वर्याप्रमाणे याआधी कोणत्या ॲथलेटिक्सपटूने उत्तेजक चाचणी टाळण्यासाठी पलायन केले होते?
उत्तेजक चाचणी टाळण्यासाठी पलायन करणारी ऐश्वर्याही पहिलीच धावपटू नाही. काही वर्षांपूर्वी ४०० मीटरमधील धावपटू निर्मला शेरॉन ही राष्ट्रीय शिबिरातून आपल्या वैयक्तिक प्रशिक्षकासह प्रदीर्घ काळ बेपत्ता होती. मग सापडल्यानंतर झालेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. याचप्रमाणे २०१७मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक तिला गमवावे लागले.