मध्यंतरी नेटफ्लिक्सवर एक ‘जामतारा’ नावाची वेबसीरिज आली होती. यामध्ये भारतातल्या एका अशा जिल्ह्याची गोष्ट सांगितली होती जो सायबर क्राईम आणि फिशिंगसारखे गुन्हे करण्यात अव्वल आहे. या जिल्हयातली प्रत्येक पिढी या व्यवसायात असते. हे गुन्हे करण्याची पद्धत, त्यामागची कारणं, राजकीय लुडबूड आणि अशा बऱ्याच गोष्टी या सीरिजच्या माध्यमातून मांडल्या गेल्या होत्या.
याच सीरिजचा पुढचा भाग म्हणजेच दूसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा ट्रेलरदेखील आजच प्रदर्शित करण्यात आला आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये ‘जामतारा’ गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीची आणखीन वेगळी बाजू आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानेच या ‘जामतारा’ विषयी आणि तिथे होणाऱ्या एवढ्या गंभीर अपराधांविषयी जाणून घेऊयात.
‘जामतारा’ हा जिल्हा नेमका आहे तरी कुठे?
झारखंड राज्यातला एक छोटासा आणि दुर्लक्षित असलेला जिल्हा म्हणजे जामतारा. या जिल्ह्यात साप मोठ्या प्रमाणावर आढळतात म्हणून याचं नाव जामतारा (जामताडा) पडलं. संथाली भाषेत जामचा अर्थ साप आणि ताडाचा अर्थ निवास असा आहे. त्यामुळे सापांचे अस्तित्व इथे मोठ्या प्रमाणावर असल्याने याला जामतारा ही नाव पडले. पण गेल्या काही वर्षांपासून हा जिल्हया एका कुख्यात कारणासाठी प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की या जिल्ह्यातून आलेला एक फोन कॉल तुम्हाला देशोधडीला लावू शकतो.
खूप वर्षांपूर्वी हा जिल्हा तसा मागासलेला होता, लोकांकडे पक्की घरं, इतर सोयी सुविधा नव्हत्या. पण गेल्या काही वर्षात इथला प्रचंड कायापालट झाला आहे. इथल्या लोकांकडे सगळ्या सुविधा आल्या आहेत. यामागे या गावातून केलेल फोन कॉल्स आहेत असाच अंदाज लावला जातो आहे.
जामतारा जिल्हा सायबर क्राईमचं केंद्रस्थान कसा बनला?
असं म्हणतात की देशभरात जेवढे सायबर गुन्हे होतात त्यापैकी ८०% केसेसमध्ये जामतारा जिल्ह्याचं नाव असतं. सध्या तर हा जिल्हा म्हणजे अशा अपराधांचं केंद्रबिंदू बनला आहे. खासकरून या जिल्ह्यातल्या करमाटांड गावातली लोकं या गुन्ह्यात सहभागी असतात असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. ही टोळी फोनच्या माध्यमातून देशातल्या कोणत्याही व्यक्तीच्या बँकेतून पैसे चोरते. चोरी करण्याची त्यांची पद्धत इतकी सहज आहे की तुम्हाला आलेला फोन हा याच चोरांचा आहे हेदेखील समजत नाही. या अशा कामांसाठी इथे कित्येक तरुण मुलांना प्रशिक्षण दिलं जातं आणि मग याच मुलांची टोळी ही फोन कॉल करून लाखो लोकांना फसवते.
आणखी वाचा : बॉलिवूडमुळे मुंबईतील चित्रपटगृहं बंद व्हायच्या मार्गावर : आता वितरकांना अपेक्षा फक्त ‘ब्रह्मास्त्र’कडूनच
काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या बँक अकाऊंटमधून ५ लाख रुपये असेच गायब झाले होते, असं म्हंटलं जातं की बच्चन यांना गंडा घालणारी टोळी ही जामताराचीच होती. एवढंच नव्हे तर पंजाबचे पूर्व मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि त्यांच्या पत्नीच्या अकाऊंटमधूनही याच टोळीने तब्बल २३ लाख रुपये चोरले होते. केरळचे एक खासदार तसेच काही केंद्रीय मंत्री यांनासुद्धा या टोळीने असंच लुटलं आहे. आणि या सगळ्या अपराधांची मुळं थेट जामतारामध्येच आहेत. ही लोकं तरी प्रतिष्ठित नावाजलेली आहेत, याखेरीज या टोळीने आपल्यासारख्या कित्येक सामान्यांना फसवलं आहे, त्याचा हिशोबच नाही.
पोलिसांच्या तपासानुसार जामतारामध्ये हे उद्योग २०१३ मध्ये सुरू झाले. त्यानंतर राज्य सरकारने याविरोधात कारवाई केली आणि पोलिसांनी बऱ्याच गुन्हेगारांना पकडलं, त्यापैकी बरीच तरुण मुलं होती ज्यांचं वयदेखील कमी होतं. त्यांच्या बँक अकाऊंटमधली रक्कम समजल्यावर हा सगळा सापळा कसा रचला जातो ते पोलिसांच्या लक्षात आलं.
आणखी वाचा : विश्लेषण : शाहरुख खान, अक्षय कुमारसारख्या कित्येकांशी पंगा घेणारा केआरके आहे तरी कोण?
आजही जामतारा जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये अशा कित्येक टोळ्या काम करत आहेत. ही मुलं कोणालाही फोन करतात, समोरच्या व्यक्तीशी गोड बोलून, बँकेशी निगडीत काम आहे सांगून त्यांचा विश्वास संपादन करतात. आणि त्याच व्यक्तिच्या मदतीने ही टोळी त्यांचं बँक अकाऊंट साफ करते. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी सामान्य माणसांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हालाही असे अनुभव येऊ शकतात, फक्त सावध रहा आणि तुमची कोणतीही गोपनीय माहीत समोरच्या व्यक्तीला पुरवू नका.