-अभय नरहर जोशी
‘सिलिकॉन व्हॅली’साठी खडतर काळ सुरू आहे. ‘मेटा’, ‘ट्विटर’, ‘स्नॅप’, ‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या दिग्गज कंपन्यांनी याआधीच आपली कर्मचारी कपात केली आहे. त्यानंतर ‘अॅमेझॉन’ने दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे वृत्त येऊन थडकले. करोनानंतर अपेक्षित वृद्धीदर तेवढ्या वेगात न गाठल्याने या बड्या समाजमाध्यम, माहिती-तंत्रज्ञान, ई-वाणिज्य कंपन्या अडचणीत आल्या आहेत. मंदीची चर्चा सुरू असताना या कंपन्या खर्च कमी करत आहेत. यापैकी ‘कर्मचारी कपात’ ही एक उपाययोजना. मात्र, बेरोजगारीची कुऱ्हाड कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्या विषयी…
‘अॅमेझॉन’मधील कपात कोणत्या विभागांत?
‘अॅमेझॉन’च्या दहा हजार कर्मचारी कपातीचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रथम दिले.‘अॅमेझॉन’च्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कर्मचारी कपात असेल. ‘अॅमेझॉन’ची किरकोळ विक्री, विविध संच, उपकरणे आणि मनुष्यबळ विभागात ही कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ‘ब्लूमबर्ग’ वाहिनीने ऑक्टोबरमध्ये सर्वप्रथम दिलेल्या वृत्तानुसार, खर्च कपातीच्या उपायांचा एक भाग म्हणून कंपनीने उत्पादने ‘होम डिलिव्हरी रोबोट स्काउट’ ही स्वयंचलित यंत्रणेची सेवा थांबवली होती. या विभागातील ४०० कर्मचाऱ्यांना इतर विभागांत सामावून घेण्यात आले. तसेच करोना महासाथीत सुरू केलेली ‘अॅमेझॉन एक्सप्लोर’ ही आभासी खरेदीसेवा बंद करण्यात आली.
‘अॅमेझॉन’च्या कपातीमागची कारणे कोणती?
ही कर्मचारी कपात फक्त अमेरिकेपुरती की जगभरातील बाजारपेठांवर त्याचा परिणाम होईल, याबद्दलचे चित्र धूसर आहे. ‘अॅमेझॉन’ची १५ लाख कर्मचारीसंख्या आहे. त्या तुलनेत ही कपात टक्केवारीत कमी भासते. परंतु ‘मेटा’नेही ११ हजार कर्मचारी कपात केली आहे. रोजगाराच्या दृष्टिकोनातून ही लक्षणीय कर्मचारीसंख्या आहे. कंपन्यांची कमकुवत कामगिरी व खालावलेली आर्थिक उलाढाल पाहता ही कपात अपेक्षित होती. ‘अॅमेझॉन’च्या तिसऱ्या तिमाहीच्या कामगिरीवर नजर टाकली तर कंपनीची निव्वळ विक्री १५ टक्क्यांनी वाढून १२७.१ अब्ज डॉलर झाली आहे. कंपनीचे परिचालन उत्पन्न (ऑपरेटिंग इन्कम) तर मागील वर्षी याच तिमाहीतील ४.९ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा २.५ अब्ज डॉलरपर्यंत घसरले आहे. ‘अॅमेझॉन’ला चौथ्या तिमाहीत २ ते ८ टक्के व्यवसायवृद्धी अपेक्षित आहे. जी तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.
‘मेटा’च्या कोणत्या कर्मचाऱ्यांचा समावेश?
‘मेटा’च्या कर्मचारी कपातीचा परिणाम ‘फेसबुक’,‘इन्स्टाग्राम’, व्हॉट्स अॅप’ आणि ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ आदी विभागातील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. कंपनीने सेवामुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना १६ आठवड्यांचे मूळ वेतन देऊ केले आहे. तसेच संभाव्य सेवेतील प्रत्येक वर्षाच्या दोन आठवड्यांचे वेतन देण्याचे मान्य केले आहे. उर्वरित सेवाकाळासाठी कर्मचाऱ्यांना आरोग्यविम्याचा लाभही दिला जाईल. तसेच त्यांच्या रोजगारासाठी सहाय्यकाची मदत उपलब्ध करून देणार आहे. मात्र, एच १ बी ‘व्हिसा’ घेऊन काम करणाऱ्या चिनी-भारतीय कर्मचाऱ्यांना मदत करणारे विशेषज्ञांच्या मदतीचे आश्वासन दिले असले तरी ही सेवा कार्यरत नसल्याचे वृत्त ‘बझ फीड’ने दिले आहे. पुढील वर्षी कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याची ‘मेटा’ची योजना आहे.
‘ट्विटर’ची कपात वादग्रस्त कशी?
जेव्हा उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ विकत घेतले तेव्हाच कर्मचारी कपात अपेक्षित होती. परंतु ती ज्या पद्धतीने करण्यात आली, त्यामुळे मस्क यांच्यावर टीका झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह नेड सेगल आणि विजया गड्डेंना या ‘ट्विटर’च्या वरिष्ठांना सर्वप्रथम हटवले गेले. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी मोठी कपात करण्यात आली, सेवामुक्तीचा ‘ई मेल’ त्यांना पाठवला गेला. कामावर येत असाल तर घरी परत जा, असेही कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. मस्क यांनीने कंपनीतील निम्मे म्हणजे सुमारे ३७०० कर्मचारी काढून टाकले. १४ नोव्हेंबर रोजी ‘ट्विटर’ने आपल्या साडे पाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले. भारतात, जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले. नंतर मस्क यांच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पांतील काही कर्मचाऱ्यांना परत रुजू करूनही घेण्यात आले. या गोंधळानंतर काही वरिष्ठ अधिकारी ‘ट्विटर’ सोडून गेले. मात्र मस्क यांनी कठोर उपाय सुरूच ठेवले. त्यांनी कर्मचाऱ्यांची दूरस्थ कामाची (रिमोट वर्क) सुविधा थांबवली व कार्यस्थळी किमान ४० तास उपस्थिती अनिवार्य केली. ‘ट्विटर’ मुख्यालयातील मोफत भोजनसुविधाही बंद केली. संभाव्य दिवाळखोरीचा इशारा देऊन यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे मस्क यांनी सांगितले.
गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपलची कोणती पावले?
‘इंटेल’ने अद्याप कपातीची घोषणा केलेली नाही. परंतु ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार कंपनी २० टक्के कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. मात्र नेमक्या आकड्याबाबत ‘इंटेल’कडून अद्याप दुजोरा मिळाला नाही. ‘इंटेल’च्या ‘हबाना लॅब’ने ऑक्टोबरमध्ये १०० कर्मचाऱ्यांना (सुमारे दहा टक्के) सेवामुक्त केले गेले. ‘मायक्रोसॉफ्ट’ने जगातील विविध भागांतील आपले एक हजार कर्मचारी सेवामुक्त केले. ‘अॅपल’ने कर्मचारी कपात केली नसली तरी, भरतीची गती कमी केली आहे. ‘गुगल’ने आपल्या अंतर्गत बैठकांत संभाव्य कर्मचारी कपातीवर चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना भरती कमी केल्याचे सांगून अधिक कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन केले आहे. कर्मचारी खर्चातही कपात केली आहे. ‘स्नॅपचॅट’ची मूळ कंपनी ‘स्नॅप’ने ऑगस्टमध्ये २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली. कपात करणाऱ्या समाजमाध्यम कंपनीपैकी ही पहिली कंपनी ठरली. ‘स्ट्राईप’, ‘सेल्सफोर्स’, लिफ्ट’, ‘बुकिंग.कॉम’, ‘आय रोबोट’, ‘पेलोटॉन’ व ‘अनअॅकॅडमी’सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे ‘स्ट्राईप’ वित्तीय सेवा कंपनीने १४ टक्के व ‘बायजू’ने २५०० कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले आहेत.