चंद्रशेखर बोबडे

सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या की राज्यातील इतर भागांप्रमाणेच विदर्भावर कोणत्या राजकीय पक्षाचे वर्चस्व असेल असा प्रश्न केला जातो. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात आता कोण्या एका पक्षाचे नाव घेता येईल, अशी स्थिती नाही. २०१९ च्या निवडणुकीत दहापैकी पाच जागा जिंकून भाजपने दबदबा निर्माण केला. तर गेल्या पाच वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांमध्ये काँग्रेस व मित्रपक्षांनी विजय मिळवून भाजपपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या १० जागा असलेल्या विदर्भात राजकीय वारे नेमके कोणत्या दिशेने वाहणार याचा अंदाज बांधणे सुरू आहे.

विदर्भात सध्या कोणाकडे किती जागा?

विदर्भात एकूण ११ जिल्हे असले तरी लोकसभेचे १० मतदारसंघ आहेत. नागपूर या एकाच जिल्ह्यात दोन मतदारसंघ तर भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम या दोन-दोन जिल्ह्यांचे प्रत्येकी एकेक मतदारसंघ आहेत. या १० पैकी अमरावती, रामटेक हे दोन  अनुसूचित जातींसाठी, तर गडचिरोली हा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. पश्चिम आणि पूर्व अशा दोन भौगोलिक क्षेत्रात विभागलेला हा प्रदेश असून पूर्व विदर्भात सहा तर पश्चिम विदर्भात चार जागांचा समावेश आहे. २०१९ मध्ये दहा पैकी पाच जागा भाजपने (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि अकोला) जिंकल्या होत्या, तीन जागा शिवसेनेकडे (बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, रामटेक) आणि प्रत्येकी एक जागा काँग्रेस (चंद्रपूर) व राष्ट्रवादी समर्थित अपक्षाकडे (अमरावती) होती.

हेही वाचा >>>TCS मध्ये नोकरी करण्याची संधी; लवकरात लवकर कंपनीत रुजू झाल्यास मिळणार विशेष लाभ

सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे?

२०१९ मध्ये विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना युती अशी लढत झाली होती. २०२४ मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता आहे. २०१९ मधील आघाडीतील राष्ट्रवादी आणि युतीतील शिवसेना या पक्षातील फुटीर गट युती आणि आघाडीसोबत आहेत. प्रकाश आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी स्वतंत्र लढते की महाविकास आघाडीसोबत जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विदर्भात जोर कोणाचा?

विदर्भ हा तसा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला. आणीबाणीनंतर १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील इंदिरा काँग्रेस यांचा सर्वत्र पराभव झाला असताना संपूर्ण विदर्भातून मात्र त्यांना घवघवीत यश मिळाले होते. कालांतराने या पक्षाची मतदारांवरील पकड सैल झाली व भाजपने बहुजनांना संधी दिल्याने व शिवसेनेने कट्टर हिंदुत्वाचा प्रचार केल्याने पूर्व विदर्भात भाजप तर पश्चिम विदर्भात शिवसेनेने पकड घट्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासूनच या भागात वाढू शकली नाही. शेतकरी संघटनेचा संपूर्ण विदर्भात जोर होता, पण ती राजकारणात आल्यानंतर तो ओसरला. दलित मतांची मोठी ताकद रिपाइंच्या अनेक पक्षांत विभागली गेली. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना एकत्रित करून प्रस्थापितांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अद्याप राजकीय यश मिळालेले नाही. काँग्रेस विदर्भात कमकुवत असली तर त्यांची पारंपरिक ‘व्होटबँक’ कायम आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : टेस्ला पाण्यात, कोट्यधीश उद्योगपतीचा मृत्यू; गाडी खरंच सुरक्षित ठेवते?

२०२४ च्या निवडणुकीचे चित्र काय असेल?

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी युतीमधील प्रमुख घटक पक्ष भाजपने शिंदे गटाच्या जागांवर (विद्यमान खासदार असलेल्या) केलेल्या दाव्यामुळे आणि २०१९ मध्ये मूळ शिवसेनेने जिंकलेल्या जागेवर उद्धव ठाकरे, आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केल्याने युती आणि आघाडीमध्ये पेच निर्माण झाला आहे. शिवसेना फुटली असली तरी मूळ शिवसैनिक ठाकरेंच्या बाजूने असल्याने ठाकरेंना त्यांची मूळ जागा हवी आहे. तर फूट पडल्याने पक्ष खिळखिळा झाल्याचा दावा करीत २०१९ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारा पक्ष म्हणून काँग्रेस या जागांवर हक्क सोडण्यास तयार नाही. सक्षम उमेदवार मिळाला तर युती आणि आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Story img Loader