रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष अद्याप सुरू आहे. अण्वस्त्रांचा वापर १९४५ नंतर झाला नसला, तरी अणुहल्ल्याचे इशारे वारंवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विविध देशांकडून आजपर्यंत दिले गेले आहेत. अशा स्थितीत खरेच अणुयुद्धाचा भडका उडाला आणि व्याप्ती तिसऱ्या महायुद्धाइतकी झाली, तर जगातील कुठले प्रदेश राहण्यायोग्य आणि सर्वांत सुरक्षित असतील, याचा अभ्यास एका संशोधनात करण्यात आला आहे. त्या संशोधनाविषयी…
अण्वस्त्रांच्या वापराचा धोका
दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर झाला. या अणुबॉम्बचे पडसाद इतके महाभयंकर होते. आजही हल्ल्याची तीव्रता पाहिली, की सामान्यातल्या सामान्य माणसाचे मनही वेदनेने तळमळते. त्यानंतर अण्वस्त्रांचा वापर होऊ नये, यासाठी अनेक पावले उचलली गेली. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आज जग अणुहल्ल्याच्या उंबरठ्यावर पुन्हा येऊन ठेपले आहे. रशिया, उत्तर कोरिया, इराणसह अनेक देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अणुयुद्धाची भाषा बोलत असतात.
हेही वाचा >>>Wife vs. mistress: पत्नी की प्रेयसी? पुरुष जास्त पैसे कोणावर खर्च करतात? संशोधन काय सांगते?
नव्या अभ्यासातील संशोधन
‘नेचर फूड’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, अण्वस्त्रयुद्ध भडकल्यास नेमके काय होईल याविषयी ऊहापोह करण्यात आला आहे. अण्वस्त्रहल्ला झालाच, तर त्यातून तयार होणाऱ्या उत्सर्जनामुळे पूर्ण पृथ्वीवर मृत्यूचे तांडव येईलच; पण अन्नपुरवठ्याची साखळी पूर्ण कोलमडून पडेल. वातावरण, महासागर, आंतरराष्ट्रीय व्यापार आदी ठिकाणी अडथळे निर्माण होतील. जगभरातील अब्जावधी लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता या संशोधनात वर्तवली आहे. उपासमार, उत्सर्जनामुळे होणारे आजार यांसह विविध दुष्परिणामांचा सामना लोकांना करावा लागेल.
कोणते देश तग धरतील?
या संशोधनानुसार, अण्वस्त्रहल्ल्यानंतरही अर्जेंटिना, ब्राझील, उरुग्वे, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, आइसलँड आणि ओमान देशातील लोक पुन्हा उभे राहतील. त्यांची लोकसंख्या साधारणतः आहे तेवढीच राहील. युद्धानंतरच्या वातावरणात तेथील लोकांच्या अन्नवापराच्या पद्धतीमुळे त्यांना फायदा होईल. तेथील कृषी क्षेत्रही अत्यंत विपरीत स्थितीत तग धरून राहील, असा दावा संशोधनामध्ये केला आहे.
हेही वाचा >>>सोनू सूदने रस्ते अपघात रोखण्यासाठी सुचवला ‘क्रॅश बॅ
कोणत्या देशांना फटका?
जगातील जवळपास सर्वच देशांना अणुयुद्ध झाले, तर फटका बसेल. यामध्ये लोकसंख्या जास्त असलेल्या बहुतेक देशांचा समावेश आहे. अमेरिका, कॅनडा, रशिया, युरोपातील बहुतांश भागाचा समावेश आहे. या ठिकाणी बहुतांश लोकांना उपासमारीचा सामना करावा लागू शकतो. अनेक ठिकाणी दुष्काळ पडू शकतो. अणुयुद्ध झाले, तर अमेरिकेतील ९८ टक्के लोक भुकेने मरू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. पुरेसे अन्न न मिळाल्याने वजन कमी होणे, कॅलरींचा कमी प्रमाणात पुरवठा आणि त्यामुळे होणारा त्रास आदींना सामोरे जावे लागेल.
सुरक्षित प्रदेश कोणते?
अंटार्क्टिका, आइसलँड, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, ग्रीनलँड, इंडोनेशिया, तुवालू हे भाग अणुयुद्धाच्या काळात निर्वासितांसाठी अतिशय सुरक्षित असे असतील. अंटार्क्टिका खंड सर्वांपासून दूर आणि तेथील बर्फाळ वातावरणामुळे अणुयुद्धाचा फटका तेथे बसणार नाही. तसेच इतर प्रदेशांच्या बाबतीत त्यांचे भौगोलिक स्थान, परिसराचा भूगोल, निसर्गाचे लाभलेले कवच आणि त्यांचे संतुलित परराष्ट्र धोरण यांमुळे अणुयुद्धाचा फटका या देशांनाही कमी बसेल. परिणामी, अतिशय सुरक्षित असे स्थान या प्रदेशाला अणुयुद्धात प्राप्त होईल. या देशांचे सामरिक महत्त्वही त्यामुळे नजीकच्या काळात अधिक वाढेल. अणुयुद्धाचा धोका वाढेल, तसे या प्रदेशाचे महत्त्व वाढताना दिसेल.
अणुयुद्ध खरेच होईल का?
अणुयुद्ध झाले, तर सुरक्षित प्रदेश कोणते राहतील, याचे संशोधन केले गेले असले, तरी प्रत्यक्षात जगाला व्यापेल, असे अणुयुद्ध होईल का, हा खरा प्रश्न आहे. अण्वस्त्रांचा वापर युद्धाची खुमखुमी आणि जीवसृष्टीचे मोल न उमजलेला आणि स्वतःचेही अस्तित्व पणाला लावलेला एखादा माथेफिरूच करू शकेल. तसेच, अण्वस्त्रांची तीव्रता किती, यावर बरेचसे अवलंबून असेल. सामरिक क्षेत्रात अण्वस्त्रांच्या प्ररोधनाचा खरेच उपयोग आहे का, याचाही अभ्यास केला जात आहे. कारण युद्ध होऊ नयेत, म्हणून अण्वस्त्रांची भीती उपयुक्त ठरेल, असा कयास बांधला गेला होता. पण, युद्धे होत आहेत. त्याचे स्वरूप बदलत आहे, इतकेच. त्यामुळे अण्वस्त्रांच्या या दुनियेत केवळ अणुयुद्धाचा विचार उपयोगाचा नाही, तर युद्ध टाळण्याकडेच सर्वांचा कल असेल, हे नक्की !
भारताला किती धोका?
भारताचे दोन्ही शेजारी देश चीन व पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज आहेत. पण चीनकडून विध्वंसाचा धोका अधिक आहे. कारण त्यांच्याकडे अण्वस्त्रे आणि ती वाहून नेऊ शकतील अशी पल्लेदार क्षेपणास्त्रे आहेत. भारतातील सर्व टापू चीनच्या माऱ्याच्या टप्प्यात येतात. पण विरोधाभास असा, की भारत चीनचा सर्वांत मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. चिनी तयार वस्तूमाल आणि उपकरणांसाठी भारत ही अजस्र बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतावर हल्ला हा चीनवरील मोठ्या उत्पन्नस्रोतावरील हल्ला ठरेल. शिवाय भारताकडेही प्रतिहल्ल्याची क्षमता आहेच. पाकिस्तानच्या बाबतीत मामला थोडा वेगळा आहे. पाकिस्तानने छोट्या पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित केली असून, पाकिस्तानमध्ये भारत घुसल्यास प्रसंगी पाकिस्तानी भूमीवरही ती वापरली जातील अशी डावपेचात्मक (टॅक्टिकल) स्वरूपाची आहेत. पाकिस्तानी अण्वस्त्रांचे विध्वंसमूल्य तितके अधिक नाही. शिवाय अवघ्या काही अण्वस्त्रांच्या आधारावर भारताकडून संपूर्ण नायनाट संभवतो याची पाकिस्तानी नेतृत्वाला पूर्ण कल्पना आहे. यासाठीच अमेरिका, युरोप, रशिया, उत्तर कोरियाच्या तुलनेत अण्वस्त्रांचा विध्वंस दक्षिण आशियात कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जाते.