संदीप कदम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामाच्या नव्या पर्वात आतापर्यंत पाच जेतेपदे मिळवणारा मुंबई इंडियन्स, चार जेतेपदे मिळवणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेते गुजरात जायंट्स हे संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार ठरतात. मात्र, असेही काही संघ आहेत जे या संघांना आव्हान देऊ शकतात. जाणून घेऊया अशा ‘डार्क हॉर्स’ संघांविषयी…
सनरायजर्स हैदराबाद
या हंगामासाठी सनरायजर्स हैदराबाद संघाने लिलावात चांगल्या खेळाडूंचा समावेश केला. यामध्ये इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला संघाने १३ कोटींहून अधिक रुपये खर्ची करून संघात स्थान मिळवले. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील विजेता संघ सनरायजर्स ईस्टर्न केपचा कर्णधार एडीन मार्करम याच्याकडे हैदराबाद संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. आपल्या आक्रमक गोलंदाजीची ओळख असणाऱ्या हैदराबादने यंदाच्या लिलावात आपली फलंदाजी फळी भक्कम करण्यावर अधिक भर दिला आहे. गेल्या हंगामात संघाला सहा सामने जिंकता आले आणि आठव्या स्थानावर त्यांना समाधान मानावे लागले. यंदा मात्र, संघ भक्कम दिसत आहे. आदिल रशिदच्या रूपात संघात विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा लेग-स्पिनर आहे. यासह संघात भुवनेश्वर कुमार, यान्सेन, उमरान मलिक आणि नटराजनसारखे वेगवान गोलंदाजही संघाकडे आहेत. ब्रूक, ग्लेन फिलिप्स, मयांक अगरवाल आणि अभिषेक शर्मासारखे आक्रमक फलंदाज आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत फटके मारण्यास सक्षम आहेत. मात्र मार्करमला ‘आयपीएल’चा म्हणावा तसा अनुभव नाही. तसेच संघात स्थानिक यष्टिरक्षक नाही.
पंजाब किंग्ज
संघातील सर्वात कमकुवत संघ अशी ओळख असलेल्या पंजाब किंग्ज संघाने या वेळी अनेक बदल केले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्णधारपदाची धुरा अनुभवी शिखर धवन याच्याकडे देण्यात आली आहे. गेल्या हंगामात पंजाबला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. आक्रमक फलंदाज जॉनी बेयरस्टो जायबंदी झाल्याने स्पर्धेत सहभागी होणार नाही. त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्ट्सला स्थान देण्यात आले आहे. संघाकडे लिआम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान आणि सॅम करनच्या रूपात आक्रमक मध्यक्रम आहे. हे सर्व फलंदाज आक्रमक फटके मारण्यास सक्षम आहेत. करन, कगिसो रबाडा यांसारख्या विदेशी गोलंदाजांना अर्शदीप सिंगचीही साथ लाभेल. राहुल चहरसारखा लेग-स्पिनरही संघाकडे आहे. मात्र, बेयरस्टोसारखा आक्रमक शैलीचा फलंदाज संघात नसल्याने त्यांची शीर्ष फळी कमकुवत भासत आहे. यासह संघाच्या मध्यक्रमाचा अनुभव हा कमी दिसत आहे. त्यांच्याकडे फिरकी गोलंदाज सर्वोत्तम दर्जाचे नसले तरीही, निर्णायक क्षणी संघाला बळी मिळवून देण्यात ते सक्षम आहेत. त्यामुळे इतर संघही त्यांना कमी लेखणार नाही.
कोलकाता नाइट रायडर्स
दिल्ली आणि कोलकाता संघाचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सला ‘प्लेऑफ’पर्यंत पोहोचवू शकला नव्हता. गेल्या हंगामात संघाला १४ पैकी सहा सामने जिंकण्यात यश मिळाले आणि त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, अय्यरची दुखापत संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. जायबंदी अय्यर ‘आयपीएल’ खेळणार की नाही याबद्दल स्पष्ट माहिती समोर आली नसली तरीही, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो यंदाच्या हंगामातील अर्धे सामने खेळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, संघाच्या नेतृत्वाची धुरा डावखुरा फलंदाज नितीश राणाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे हंगामात त्याच्या नेतृत्वगुणाचा कस लागेल. कोलकाता संघात वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, शकिब अल हसन, शार्दूल ठाकूर, सुनील नरेनसारखे अष्टपैलू असल्याने कोलकाताचा संघ मजबूत भासत आहे. संघात नरेन, वरुण चक्रवर्तीसारखे फिरकीचे पर्याय आहेत. तर, लॉकी फर्ग्युसन व उमेश यादवसारखे वेगवान गोलंदाज संघाकडे आहेत. सलामीच्या फलंदाजांना फारसा अनुभव नाही. अय्यरच्या अनुपस्थितीत मध्यक्रम कमकुवत भासत आहे. तरीही, हा संघ आपल्या अष्टपैलूंच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलण्यात सक्षम आहे.