Tear Seeking Therapy Rui Katsu: लोकांना मोकळेपणाने रडता यावं यासाठी जपानमधल्या एका कंपनीने कार्यालयात अश्रू टिपणाऱ्या हँडसम मुलांची व्यवस्था केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मनमोकळं रडता यावं, लोकांना एकत्र वाटावं यासाठी ही शक्कल शोधण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रडणं हे थेरपीसारखं आहे. कामाचं दडपण, चिंता लोकांनी अश्रूवाटे मोकळी करुन दिली तर ते त्यांच्यासाठी वैयक्तिक आणि कामाच्या बाबतीतही उपयोगी ठरू शकतं. अशात तुमचे अश्रू पुसायला तुम्हाला मदतनीस हवा असेल तर जपानमधल्या कंपनीने तरुण मुलांची या कामासाठी नियुक्ती केली आहे.

कार्यालयातील माणसांचे अश्रू टिपण्यासाठी या कंपनीने रीतसर युवा मंडळींची नेमणूकच केली आहे. तुम्ही हे वाचून काहीही वाटेल पण ते खरं आहे. आम्ही अजिबातच गंमत करत नाहीयोत. ७,९०० येन अर्थात भारतीय चलनानुसार ४००० रुपये देऊन अश्रू पुसण्यासाठी माणूस मिळू शकतो. एखाद्या व्यक्तीला मनमोकळं रडायचं असेल पण तसं रडू येत नसेल तरी ही तरुण मंडळी मदत करतात.

नक्की ही कंपनी आहे तरी काय, जाणून घेऊया

टोकियोस्थित ही कंपनी हिरोकी तेराई चालवतात. अश्रू टिपण्यासाठी कंपनीतर्फे ‘इकेमेसो दान्शी’ म्हणजे दिसायला चांगल्या तरुणांची नियुक्ती केली जाते. ग्राहक ऑनलाईन पद्धतीने ही सेवा बुक करू शकतात. इंडिपेंडटने दिलेल्या वृत्तानुसार कंपनी विविध स्वरुपात या तरुण मंडळींना सादर करते. काही चेक्स शर्टात असू शकतात, काही ब्लेझरवरही म्हणजे सुटाबूटात असू शकतात.

ही मंडळी दु:खभाव जागृत करणारे चित्रपट, कारुण्यभाव जागवणारी गाणी तसंच व्हीडिओ यांचा उपयोग करतात. याद्वारे ते ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आणतात. रडणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण नाही, चारचौघात रडण्यात काहीही वावगं नाही हे लोकांना समजावं. एकत्रपणे एकमेकांना समजून घेत वाटचाल करावी असा यामागचा विचार आहे.

स्टफ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अश्रू टिपण्यासाठी नेमलेली तरुण तडफदार मंडळी क्राइंग थेरपिस्ट आहेत.

रायेस या तरुणाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, जपानी माणसं चारचौघात रडत नाहीत. पण जेव्हा तुम्ही सगळ्यांसमोर रडता तेव्हा सगळं वातावरणच बदलून जातं विशेषत: कार्यालयीन चौकटीत.

बीबीसीशी बोलताना कंपनीचे संस्थापक हिरोकी टेराई यांनी सांगितलं की त्यांनी क्राइंग वर्कशॉप आयोजित केलं आहे. जपानी लोकांनी खुलेपणाने व्यक्त व्हावं यासाठी हा उपक्रम सुरू केला. विभक्त होणाऱ्या जोडप्यांना एकत्र बोलावून विभक्त होण्यातला आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं.

२०१३ मध्ये रडणं हेही कमावण्याचा मार्ग असू शकतं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी क्राइंग वर्कशॉप्स आयोजित करायला सुरुवात केली. लोक इथे येतात आणि एकत्र रडतात. रडल्यानंतर त्यांना बरं वाटतं, हलकं वाटतं असं सहभागी सांगतात. रडणाऱ्या पुरुषांची अडचण त्यांनी सांगितली. रडणारा पुरुष म्हणजे कमकुवत मनाचा असा एक समज आहे. पण तो खरा नाही.

त्यातूनच रुबाबदार तरुण पुरुषांनीच अश्रू टिपण्याची कल्पना स्फुरली. जपानी लोकांनी रडावं, मनात कुढत बसू नये असं मला वाटतं. त्यांनी केवळ घरी नव्हे तर ऑफिसमध्येही मोकळेपणाने रडावं असं टेराई यांनी बीबीसीला सांगितलं.

या सेवेचं नाव ‘रुई कात्सू’ असं आहे. मॉडेलसारखे दिसणारे तरुण शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून लोकांना रडण्यास प्रवृत्त करतील. त्याचवेळी ही माणसं भवतालातल्या अन्य लोकांशी जोडली जातील.

अश्रू टिपण्यासाठी तरुण पुरुषांच्या बरोबरीने शरीरसंबंधांविना मिठी आलिंगन सत्र तसंच ‘रेंट अ फ्रेंड’ म्हणजे पैसे देऊन मित्र अशा सेवा जपानमध्ये सुरू झाल्या आहेत.

जपानमध्ये अशा सेवेची का आवश्यकता?

जपानमध्ये एकूण घरांपैकी एक तृतीयांश घरांमध्ये एकच माणूस आहे अशी परिस्थिती आहे. २०२५ पर्यंत जपानच्या लोकसंख्येत एकटं राहणाऱ्या माणसांचं प्रमाण ४० टक्के असणार आहे. द क्वार्ट्झने यासंदर्भात माहिती दिली आहे.

जपानसाठी कमी होत जाणारी लोकसंख्या हाही एक चिंतेचा विषय आहे. जगात सगळ्यात कमी जन्मदर असणाऱ्या देशांमध्ये जपानचा समावेश होतो. सध्याच्या घडीला त्यांची लोकसंख्या १२६ दशलक्ष आहे. २०६० पर्यंत ती एक तृतीयांश दराने कमी होईल असं गार्डियनने म्हटलं आहे.

जपानमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे पण त्याचवेळी लग्न होण्याचं प्रमाण घटताना दिसत आहे.

जपानमधल्या कुटुंब नियोजन संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार १६ ते २४ वयोगटातील महिलांना शरीरसंबंधामध्ये स्वारस्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. साधारण तितक्याच पुरुषांचंही हेच मत आहे.

चित्रपटकार डॅरेल थॉम्स यांनी क्राइंग विथ हँडसम मेन या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून टोराई यांचा उपक्रम मांडला होता. जपानच्या सामाजिक व्यवस्थेत महिलांनी पारंपरिक व्यवस्थेची चौकट भेदत मुसंडी मारली आहे. खूप ताण असलेली कामं त्या समर्थपणे करत आहेत. पण हे काम केल्यानंतर मनमोकळेपणाने बोलता यावं असा साथीदार त्यांच्याकडे नसतो. मन मोकळं करावं असा माणूसच त्यांच्या आयुष्यात नसतो. ही गरज अपुरीच राहते. टोराई असंख्य महिलांना असा आधारवड मिळवून देतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who are handsome weeping boys hired to brush off tears at workplace psp
Show comments