दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तसेच ते टाटा समूहाच्या विविध कंपन्यांची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स लिमिटेडच्या संचालक मंडळावरही आहेत. आता टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांच्या मुली लेआ आणि माया सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट (SRTII) च्या विश्वस्त मंडळात सामील झाल्या आहेत. माया टाटा आणि लेआ टाटा, त्यांचा भाऊ नेव्हिल यांच्यासह टाटा समूहाच्या पुढच्या पिढीतील प्रमुख नावे आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. कोण आहेत लेआ आणि माया टाटा? जाणून घेऊ.
लेआ आणि माया टाटा कोण आहेत?
लेआ टाटा, नोएल टाटा आणि आलू मिस्त्री यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या आहेत. टाटा समूहाची हॉस्पिटॅलिटी शाखा असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडमध्ये त्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. लेह टाटा यांनी स्पेनच्या माद्रिद येथील आयई बिझनेस स्कूलमध्ये मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्या ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेसमध्ये सहाय्यक विक्री व्यवस्थापक म्हणून २००६ मध्ये टाटा समूहात सामील झाल्या. लेह टाटा यांनी २०१० मध्ये लुई व्हिटॉनबरोबर तीन महिन्यांची इंटर्नशिप केली.
एलव्हीमधील कार्यकाळ वगळता त्यांनी गेल्या काही वर्षांपासून टाटा समूहाच्या हॉटेल्सची निर्मिती आणि विस्तार करण्यात खर्च केला आहे. लेआ आणि त्यांची भावंडं, माया आणि नेव्हिल दोघे टाटा मेडिकल सेंटर ट्रस्ट (TMCT) चे ट्रस्टीदेखील आहेत. हे ट्रस्ट कोलकाता येथे रतन टाटा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले एक कर्करोग रुग्णालय चालवतात, असे फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?
इकॉनॉमिक टाईम्स (ईटी)च्या वृत्तानुसार, माया टाटा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टाटा कॅपिटलची उपकंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडातून केली. त्यांनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार संबंधांमध्ये काम केले. माया टाटा ब्रिटनमधील बेज बिझनेस स्कूल आणि वॉर्विक विद्यापीठातील पदवीधर आहेत. त्या सध्या टाटा डिजिटलमध्ये आहेत आणि टाटा न्यू ॲप लाँच करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही बहिणींना ३,६०० कोटी रुपयांच्या टाटा साम्राज्याचे संभाव्य वारस म्हणून पाहिले जाते.
माया आणि लेआ इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळात सामील
इकॉनॉमिक टाईम्स (ईटी)च्या वृत्तानुसार, लेआ आणि त्यांची बहीण माया यांची सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळावर एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर रतन टाटा टाटा समूहाच्या दोन प्राथमिक ट्रस्टपैकी एक आहे. या दोघींची नियुक्ती दुबईतील व्हीएफएस ग्लोबलबरोबर असलेले अरनाझ कोतवाल आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे कार्यरत असलेले फ्रेडी तलाटी यांच्या जागी करण्यात आली आहे. मात्र, या बदलामुळे अंतर्गत तेढ निर्माण झाली असून, अरनाझ कोतवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अरनाझ कोतवाल यांनी सहकारी विश्वस्तांना पत्र लिहून नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीला परवानगी देण्यासाठी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले गेले याबद्दल तक्रार केली.
“मी आता दुबईत असल्याने आणि बराच विचार केल्यानंतर, मी बुर्जिस यांच्या विनंतीला मान्यता दिली आहे, परंतु तुमच्यापैकी कोणीही या विषयावर थेट माझ्याशी बोलण्यासाठी पोहोचले नाही याचे मला खूप वाईट वाटले. त्यांचे सीईओ सिद्धार्थ शर्मा, या दोघांचाही एसआरटीआयशी संबंध नाही,” असे त्यांनी सहकारी विश्वस्तांना लिहिलेल्या पत्रात आर्थिक वृत्तपत्रानुसार म्हटले आहे. बुर्जिस तारापोरवाला हे टाटा ट्रस्टचे कार्यकारी आहेत. लेडी नवजबाई टाटा आणि स्त्री जरथोस्त्री मंडळ १९२८ मध्ये स्थापन करण्यात आले होते, ते महिलांना रोजगार देण्यासाठी समर्पित आहे.
इकॉनॉमिक टाईम्सनुसार, सर रतन टाटा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने बहिणींची निवड केली होती, त्यांना विश्वस्त मंडळाच्या सहा बोर्ड सदस्यांपैकी तीन सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. नोएल टाटा, विजय सिंग, वेणू श्रीनिवासन, डॅरियस खंबाटा, जहांगीर एच जहांगीर आणि मेहली मिस्त्री यांचा समावेश असलेल्या या मंडळात विश्वस्तांनी माया आणि लेआ टाटा यांची निवड केली. या मंडळात सामील करण्यासाठी रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटचे व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी पूर्व ज्ञान असलेल्या लोकांचा शोध सुरू होता. दोन्ही बहीणींनी सर रतन टाटा औद्योगिक संस्थेबरोबर जवळून काम केले आहे.
हेही वाचा : १६ हजार एकरवर अग्नितांडव; कलाकारांसह अनेकांची घरे भस्मसात, अमेरिकेतल्या भीषण आगीचे कारण काय?
दोघींनाही अद्याप सर रतन टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट या दोन प्रमुख ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. ९ ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांच्या निधनानंतर दावेदार म्हणून नोएल टाटा यांचे नाव वारंवार चर्चेत येत होते. त्यांचे भाऊ जिमी यांचेही नाव चर्चेत होते, मात्र ते आधीच निवृत्त झाले आहेत. अखेर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड करण्यात आली. परंतु, त्यांच्या दोन मुलींच्या निवडीनंतर टाटा समूहात अंतर्गत तेढ निर्माण झाल्याचे चित्र आहे.