Naga Sadhu at Kumbh Mela: महाकुंभमेळ्याचा भव्य आध्यात्मिक सोहळा आता काहीच दिवसांवर आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील महिन्यात सुरू होणारा हा जगातील सर्वात मोठा आणि आध्यात्मिक मेळावा ‘संस्कृती, श्रद्धा आणि प्राचीन’ परंपरांचा संगम ठरणार आहे. हा भव्य सोहळा जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांना साद घालतो. दर १२ वर्षांनी साजरा होणारा महाकुंभमेळा याखेपेस १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रयागराज येथे होणार आहे. या महाकुंभमेळ्याचे आयोजन त्रिवेणी संगमावर ‘गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती’ या तीन पवित्र नद्यांच्या संगमस्थळी करण्यात आले आहे. दीर्घ प्रतीक्षेत असलेला हा धार्मिक मेळावा भारतातील नागा साधूंच्या गूढ जगाचा अनुभव घेण्याची अनोखी संधी देखील असतो. कुंभमेळ्यापूर्वीच अनेक संत आणि नागा साधू प्रयागराज येथे पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. नागा साधू कुंभमेळ्याचे एक प्रमुख आकर्षण केंद्र असतात. हे साधू प्राचीन हिंदू परंपरेनुसार स्थापन झालेल्या विविध आखाड्यांशी संबंधित असतात. हे साधू भगवान शिवाचे निष्ठावंत भक्त असून ते त्यांच्या अत्यंत कठोर तपस्येमुळे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या कडक आध्यात्मिक साधनेसाठी ओळखले जातात.
नागा साधू भौतिक सुखसुविधांपासून दूर राहून त्याग, तपश्चर्या आणि धार्मिक भक्ती यावर भर देत जीवन जगतात. ते इतर संतांपेक्षा वेगळी परंपरा पाळतात. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण होते. प्राचीन परंपरेनुसार नागा साधूंना हिंदू संस्कृती आणि धर्माचे रक्षक मानले जाते. ते हिमालयात वास्तव्य करतात आणि कुंभमेळ्यादरम्यानच हे साधू सामान्य लोकांमध्ये वावरताना दिसतात. ते त्यांच्या बरोबर त्रिशूल बाळगतात आणि आपल्या विवस्त्र शरीरावर राख फासतात. याशिवाय ते रुद्राक्षांच्या माळा परिधान करतात आणि प्राण्यांच्या कातड्यांसारख्या पारंपरिक पोशाखांचा स्वीकार करतात. महाकुंभमेळ्यात विशेषतः शाही स्नानाच्या (राजविभूषित स्नान) वेळी नागा साधू महत्त्वाची भूमिका बजावतात. या पवित्र विधीमुळे त्यांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित होते. हिंदू पंचांगानुसार ठरवलेल्या शाही स्नानाच्या दिवसांमध्ये हे साधू भव्य धार्मिक मिरवणुकीत सहभागी होतात. या मिरवणुकीत मंत्रोच्चार आणि ढोल-ताशांच्या गजरात सूर्योदयाच्या वेळी पवित्र नदीत स्नान करण्यासाठी जातात. या पवित्र स्नानामुळे आत्मा शुद्ध होतो आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते असा विश्वास आहे.

महाकुंभमेळ्यात नागा साधूंचे महत्त्व
नागा साधूंचे महाकुंभमेळ्याबरोबर विशेष नाते आहे. महाकुंभमेळ्यात प्रथम स्नानाचा मान नागा साधूंना दिला जातो. हे साधू पवित्र जलात डुबकी घेतात त्यानंतर इतर भक्तांना पवित्र स्नान करण्याची परवानगी दिली जाते.
नागा साधूंची ऐतिहासिक भूमिका
मध्ययुगात नागा साधूंनी हिंदू धर्म, श्रद्धा, परंपरा आणि मंदिरांचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुघल, अफगाण आणि तुर्क आक्रमकांच्या हल्ल्यांपासून त्यांनी हिंदू मंदिरांचे रक्षण केले. १७५७ साली अफगाण सम्राट अहमद शाह अब्दालीने चौथ्यांदा भारतावर आक्रमण केले. त्या वेळी मुघल साम्राज्य कमजोर झाले होते तर उत्तर भारतात इस्लामी आक्रमकांना आव्हान देण्यासाठी कोणतीही मोठी हिंदू सत्ता अस्तित्वात नव्हती. याचा फायदा घेत अफगाणांनी मुघल सम्राट आलमगीरशी एक अन्यायकारक करार केला. या कराराने अब्दालीला दिल्ली लुटण्याची परवानगी मिळाली. १७५७ साली अब्दालीने दिल्ली लुटली, मंदिरं उद्ध्वस्त केली. आपल्या दोन अफगाण सेनापतींना नजीब खान आणि जहां खान यांना २०,००० सैनिकांसह बल्लभगड, मथुरा, आग्रा, आणि वृंदावन येथे हल्ले करण्याचा आदेश दिला.
अफगाण सैन्याने मथुरेत मंदिरे उद्ध्वस्त केली, स्त्रियांना बेअब्रू केलं, हिंदू पुरुषांचे शिरच्छेद केले, महिला- मुलांना गुलाम केले. अफगाण सैन्याने १२ कोटी रुपये किमतीच्या संपत्तीची लूट केली आणि ६००० हिंदू महिलांना गुलाम करून काबूलमध्ये विक्रीसाठी नेले. मथुरेवर हल्ला केल्यानंतर अफगाण सैन्य वृंदावनकडे वळले जिथे मथुरेप्रमाणेच नरसंहार आणि विध्वंस झाला. वृंदावन नष्ट केल्यानंतर अफगाण सैन्याने महावनवर धडक मारली. खजिना लुटला आणि हिंदूंचा नरसंहार केला. त्यांच्या पुढील हल्ल्याचे लक्ष्य आग्रा होते. मात्र, अचानक अफगाण सेनापती सरदार खान याने महावनपासून फक्त ९ किलोमीटर अंतरावर असलेले गोकुळ लुटण्याचा विचार केला. तो १०,००० अफगाण सैनिकांसह गोकुळकडे वळला. परंतु, गोकुळमध्ये त्यांना ४,००० नागा साधू युद्धासाठी उभे असल्याचे दिसले. अफगाण सैनिकांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची माहिती नागा साधूंना मिळाल्यानंतर हरिद्वार आणि उज्जैनसारख्या हिंदूंच्या पवित्र शहरांतील १०,००० नागा साधू गोकुळकडे निघाले. मात्र, अंतर लांब असल्याने त्यांना पोहोचायला उशीर झाला.
गोकुळमध्ये अफगाण सैन्य आणि नागा साधूंच्या सैन्याचे युद्ध सुरू झाले. सुरुवातीला हे भस्मधारी काय लढणार असा अफगाण सैन्याचा समज होता. परंतु लवकरच नागा साधूंच्या लढाऊ कौशल्याने अफगाण सैनिक पूर्णतः पायउतार झाले. नागा साधू तलवारी, तोफखाना आणि मॅचलॉक्ससह सज्ज होते. त्यांच्या राखेने माखलेल्या चेहऱ्यांनी अफगाण सैनिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण केली. अफगाण सैनिकांना प्रतिकार करता आला नाही. अफगाण सैन्याला मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागली. युद्धभूमीवर त्यांची ताकद झपाट्याने कमी होऊ लागली.

युद्धातील नागा साधूंचा पराक्रम आणि अफगाण सैन्याचा पराभव
या पराभवामुळे अब्दालीचा प्रचंड संताप झाला. त्याने युद्धात अधिक सैन्य पाठवले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अफगाण सैनिकांचे मृतदेह वाढत होते आणि त्यांचे मनोबल खचत होते. याच दरम्यान नागा साधूंचे इतर गटही युद्धभूमीत दाखल झाले. त्यामुळे नागा साधूंच्या हल्ल्यांची तीव्रता वाढली. युद्धात पराभव आणि सैनिक गमावण्याच्या भीतीने सरदार खानने अफगाण सैन्याला माघारीचे आदेश दिले. या युद्धात ५००० पेक्षा जास्त अफगाण सैनिक ठार झाले आणि असंख्य सैनिक जखमी झाले. तर २००० नागा साधूंनी बलिदान दिले. गोकुळमधील या पराभवामुळे अब्दाली सरदार खानला अपमानास्पद शिक्षा देईल हे माहीत होते. म्हणून अब्दालीने बंगालमधून आणलेली लूट आणि खजिन्याच्या तपासणीसाठी नेमलेल्या जुगल किशोरकडून त्याने खोटा अहवाल तयार करून घेतला. अफगाण सैन्य माघारी गेले कारण त्यांच्या सैन्यात साथीचा रोग पसरला होता. हे कारण अहवालात नमूद केले गेले. यामुळे गोकुळच्या युद्धात पराभव होऊनही सरदार खानवर कोणतीही कठोर शिक्षा झाली नाही. नागा साधूंनी गोकुळला अफगाण अत्याचारांपासून वाचवले. अनेक हिंदू मंदिरांचे रक्षण करण्यात नागा साधूंनी मोलाचे योगदान दिले. या शूर नागा साधूंनी दिलेले बलिदान आणि युद्धात दाखवलेले धैर्य अफगाण सैन्यासाठी अभूतपूर्व ठरले.
नागा साधूंचा पराक्रम आणि प्रेरणा
नागा साधू हे खर्या शौर्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्यांनी मातृभूमी आणि संस्कृतीचे रक्षण परकीय आक्रमकांपासून कसे करावे याचे उदाहरणच घालून दिले. ‘हर हर महादेव’ या युद्धघोषासह लढताना त्यांनी बलिदान दिले. नागा साधूंचा इतिहास आणि परंपरा शौर्याने भरलेली आहे आणि त्यांनी जगातील भौतिक इच्छांपासून अलिप्त राहून धर्मरक्षण केले आहे.