कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. या वर्षी २९ मार्च रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (२६ ऑक्टोबर) एक निवेदन जारी करून या निकालाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “भारताच्या आठ माजी नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचा निर्णय अनपेक्षित असून, आम्ही तपशीलवार निकालाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करू”, असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. माजी नौसैनिकांना कोणत्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याची कारणे काय आहेत? याची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. हे प्रकरण भारत सरकारसाठी एक मोठे राजनैतिक आव्हान बनले आहे.

हे भारतीय माजी नौसैनिक कोण? ते कतारमध्ये काय करीत होते?

कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते. रॉयल ओमान एअर फोर्समधून निवृत्त झालेले वैमानिक व ओमानी नागरिक खमिस अल अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या आठ भारतीयांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

Security forces managed to kill 12 Naxalites in an encounter on border of Bijapur Sukma district in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार; बस्तर सीमा भागात सुरक्षा यंत्रणेसोबत…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
industries minister uday samant proposed bhaskar jadhav to join shinde shiv sena
भास्कर जाधव यांना शिंदे गटाचा थेट प्रस्ताव; रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
fraud with senior citizen, pretending army officer,
लष्करी अधिकारी असल्याच्या बतावणीने ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
man cheated Seven unemployed people by luring them with Navy jobs
नौदलात नोकरीचे आमिष दाखवून, सात बेरोजगारांना गंडा

कंपनीच्या जुन्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, कतारच्या (QENF) नौदलाला प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स व देखभाल सेवा देण्याचे काम ही कंपनी करीत होती. मात्र, हे जुने संकेतस्थळ सध्या उपलब्ध नाही. नव्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीत, कंपनीचे नाव दाहरा ग्लोबल असल्याचे नमूद केलेले आहे. पण, आता कंपनीच्या कतारच्या नौदलाशी असलेल्या संबंधाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच सात भारतीय माजी नौसैनिकांच्या पदांबाबतही नव्या संकेतस्थळावर कोणताही उल्लेख नाही.

निवृत्त कमांडर पुरेनेन्दु तिवारी हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. २०१९ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. दहरा ग्लोबल कंपनीच्या निमित्ताने भारत-कतारचे नातेसंबंध मजूबत करण्यात योगदान दिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. तसेच दोहा येथे तत्कालीन भारतीय राजदूत पी. कुमारन आणि कतार संरक्षण दलाच्या आंतरराष्ट्रीय लष्कर सहकार्याचे प्रमुखांनी तिवारी यांचा सत्कार केला होता. भारतीय सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम पार पडला होता. भारतीय नौदलाचे अधिकारी कॅप्टन कपिल कौशिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दाहरा कंपनीच्या संकेतस्थळावर तत्कालीन राजदूत कुमारन यांनी दिलेले प्रमाणपत्र जोडण्यात आले होते. त्यांच्यानंतर आलेले अधिकारी राजदूत दीपक मित्तल यांनीही भारत – कतार यांच्यामधील संबंध दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल कंपनीच्या कार्याची प्रशंसा केली होती. कतारी यंत्रणेकडून अटक करण्यात आलेले बहुतेक भारतीय हे चार ते सहा वर्षांपासून दाहरा या कंपनीत काम करीत होते.

कतारने भारतीय अधिकाऱ्यांना कधी आणि का अटक केली?

आठही जणांना कतारी गुप्तचर यंत्रणा स्टेट सिक्युरिटी ब्युरोने अटक केली होती; ज्याची माहिती सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला देण्यात आली. ३० सप्टेंबरला प्रथमच त्यांना कुटुंबातील सदस्यांशी दूरध्वनीद्वारे बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर जवळपास महिनाभराने ३ ऑक्टोबरला भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना आठही भारतीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. पुढचे काही महिने या नौसैनिकांना आठवड्यातून एकदा कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलण्याची परवानगी देण्यात आली होती.

या आठ भारतीय माजी नौसेना अधिकाऱ्यांवर काय आरोप ठेवण्यात आले, याची माहिती अद्याप सार्वजनिक केली गेलेली नसली तरी त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकांतवासात बंदिस्त केल्यामुळे हे प्रकरण सुरक्षेशी संबंधित असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

भारत आणि कतारचे संबंध कसे आहेत?

भारत आणि कतारमध्ये अनेक दशकांपासून चांगले संबंध आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नोव्हेंबर २००८ साली पहिल्यांदा कतारला भेट दिल्यानंतर अशी भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध आणखी सुधारले होते. कतारचे अमीर (मुसलमान राज्यकर्त्यांची पद) शेख तमिम बिन हमाद अल थानी यांनी २०१५ साली भारताला भेट दिली होती; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली कतारचा दौरा केला होता. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आतापर्यंत किमान तीन वेळा कतारचा दौरा केला आहे. भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी २०१८ साली कतारचा दौरा केला होता. कतारचा दौरा करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या परराष्ट्रमंत्री ठरल्या होत्या.

२०२१ साली कतारमधून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या चार प्रमुख देशांपैकी भारत एक देश होता; तर कतारमध्ये आयात होणाऱ्या तीन सर्वोच्च देशांमध्ये भारताचा समावेश होता. दोन्ही देशांमध्ये जवळपास १५ अब्ज डॉलरची व्यापारी उलाढाल होते; ज्यापैकी कतारमधून १३ अब्ज किमतीच्या एलएनजी आणि एलपीजीची निर्यात होते.

संरक्षण सहकार्याला भारत आणि कतार यांच्यातील महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जाते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यांनी २००८ साली कतारचा दौरा केला असताना भारत – कतार संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. २०१८ साली या कराराला आणखी पाच वर्षांची वाढीव मुदत देण्यात आली होती.

मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अॅण्ड ॲनालिसीस (IDSA) यांनी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी भारत – कतार यांच्यामधील संरक्षण कराराचे वर्णन करताना म्हटले होते की, कतारमध्ये आत फक्त सैनिक तैनात करणे बाकी आहे. या कराराच्या माध्यमातून कतार नौदलाला भारताकडून प्रशिक्षण देण्यासंदर्भात उल्लेख केला गेला होता. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना दोन्ही देशांत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.

भारतीय नौदल आणि तटरक्षक जहाजे हे नियमितरीत्या कतारला भेट देत होते. कतार नौदलातील दोन शिष्टमंडळांनी सागरी सराव करण्यासाठी २०२१ साली दोन वेळा भारताचा दौरा केला होता.

आता कोणती आव्हाने भारतासमोर आहेत?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जाहीर टीव्हीवर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे जून २०२२ साली दोन्ही देशांच्या संबंधात पहिले मोठे आव्हान निर्माण झाले होते. कतार हा पहिला देश होता; ज्याने याबाबत आपली रोखठोक भूमिका मांडत भारताने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. कतारमधील भारतीय राजदूतांसमोर कतारने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. त्यानंतर इस्लामी देशांनी नाराजी व्यक्त केल्यावर भाजपाने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि मग या प्रकरणातील पुढील नाराजी मावळली होती.

त्यानंतर आता भारताच्या आठ माजी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुळे भारतासमोर दुसरे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जवळपास आठ लाख भारतीय नागरिक कतारमध्ये काम करीत आहेत किंवा वास्तव्यास आहेत. परदेशातून आलेल्यांपैकी भारतीय हा कतारमधील सर्वांत मोठा समुदाय आहे. इंदूरमध्ये मागच्या वर्षी झालेल्या प्रवासी भारतीय दिवस या कार्यक्रमासाठी कतारमधून २१० जणांचे शिष्टमंडळ आले होते. मॉरिशसनंतर सर्वांत मोठे शिष्टमंडळ कतारचे होते.

भारतीय आठ अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा जाहीर करण्याची बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा मध्य आशियातील वातावरण तापलेले आहे. इस्रायल गाझावर बॉम्बवर्षाव करीत आहे. पॅलेस्टिनींच्या अवस्थेबद्दल कतार सहानुभूती बाळगून आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या दोन अमेरिकन ओलिसांच्या सुटकेसाठी कतारने मध्यस्थी केली होती. या संकटकाळात कतार मध्यस्थाची भूमिका बजावणार असल्याचे कतारच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी याधीच जाहीर केले आहे.

Story img Loader