गुप्ता बंधूंच्या अटकेच्या बातमीनंतर भारत सरकारशी चर्चा करणार असल्याचे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी सांगितले आहे. आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंपैकी एक जण फरार आहे. भारतीय वंशाचे अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. जेकब झुमा २०१८ मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते. तसेच गेल्या शुक्रवारी बांधकाम व्यावसायिक साहनी यांनी सहस्रधारा रोडवरील पॅसिफिक गोल्फ अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या विवाहित मुलीच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट आणि त्याच्या मुलाच्या जबाबाच्या आधारे सहारनपूर पोलिसांनी अजय कुमार गुप्ता आणि त्याचा मेहुणा अनिल गुप्ता यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डेहराडून न्यायालयाने दक्षिण आफ्रिकेत असलेले उद्योजक अनिल गुप्ता आणि अजय गुप्ता यांना शनिवारी २५ मे रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारच्या न्याय विभागाचे प्रवक्ते क्रिस्पिन फिरी यांनी मिडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले की, “न्याय आणि सुधारात्मक सेवांनी भारतात अजय आणि अनिल या दोन गुप्ता भावांच्या अटकेच्या वृत्ताची दखल घेतली आहे. आमचे अटक वॉरंट राजेश आणि अतुल गुप्ता यांच्यासाठी होते. तरीसुद्धा भारतातील उच्चायुक्तांमार्फत पडताळणी करण्यासाठी आणि संभाव्य सहभागासाठी औपचारिक प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले.”

गुप्ता बंधू नेमके कोण आहेत?

मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे अजय, अतुल आणि राजेश गुप्ता हे १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, अनिल (ज्याला अजयबरोबर अटक करण्यात आली होती) हा त्यांचा मेहुणा असल्याचे मानले जाते. अतुल गुप्ता यांनी पहिल्यांदा चपलांचा व्यवसाय केला आणि नंतर सहारा कॉम्प्युटर सुरू केले. त्यानंतर त्यांनी खाणकाम, हवाई प्रवास, ऊर्जा आणि माध्यम यांसारख्या उद्योगांमध्ये स्वतःचा विस्तार केला. त्यांच्या कंपनीच्या एका कामानिमित्त त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राजकारणी जेकब झुमा यांची भेट घेतली, जे २००९ ते २०१८ पर्यंत देशाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

गुप्ता बंधूंवर काय आरोप आहेत?

गुप्ता बंधूंवर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी झुमाशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे, ज्यामुळे या प्रक्रियेत सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. झुमा यांचा मुलगा डुडुझेन हा गुप्तांच्या सहारा कॉम्प्युटर्सचा संचालक होता. झुमा यांची तिसरी पत्नी आणि त्यांची एक मुलगीदेखील काही काळ गुप्तांच्या नोकरदार होत्या. त्यांच्या संबंध एवढे जिव्हाळ्याचे होते की, त्यांनी झुप्टास हे नाव तयार केले होते, असेही बीबीसीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

२०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत अतुल गुप्ता हे १० सर्वात श्रीमंतांच्या यादीत होते आणि त्यांची संपत्ती ७०० दशलक्ष डॉलर इतकी होती. २००९ मध्ये झुमा यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अनेक घोटाळ्यांमध्ये या भावांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नीतिशास्त्र वॉचडॉगने गुप्तांच्या जवळच्या साथीदारांना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना अनुकूल करार करून दिल्याचा अहवाल प्रकाशित केला होता. त्यानंतर झुमांवरच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी झोंडो कमिशन स्थापन करण्यात आले. कमिशनच्या अहवालातही झुमा यांच्यासह गुप्तांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. झुमा यांनी त्यांच्या ताकदीचा वापर दक्षिण आफ्रिकेतील लोकांविरुद्ध, स्वतःच्या देशाच्या आणि स्वतःच्या सरकारच्या विरोधात काम केले असून, व्यावसायिक हितसंबंध वाढवण्यासाठी गुप्ता यांची मदत घेतल्याचंही अहवालात सांगण्यात आलेय.

गुप्ता बंधू आणि झुमा यांचे नेमके संबंध काय?

२०१८ मध्ये गुप्ता बंधूंच्या व्यवसायांबद्दल नकारात्मक अहवाल आल्यानंतर दोन्ही भावांनी दक्षिण आफ्रिका सोडली. २०२२ मध्ये UAE अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस मिळाल्यानंतर अतुल आणि राजेश यांना अटक केली. यूएईने २०२३ मध्ये सांगितले की, त्यांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे दक्षिण आफ्रिकेची प्रत्यार्पणाची विनंती नाकारली होती. यूएई आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील प्रत्यार्पण करारामध्ये नमूद केल्यानुसार कायदेशीर दस्तऐवजीकरणासाठी कठोर मानकांची पूर्तता केली नसल्याचं समोर आलं होतं.

विशेष म्हणजे याच काळात झुमा यांना ‘झुमा मस्ट फॉल’ या त्यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या निषेधाच्या घोषणेचा सामना करावा लागला. यामुळे २०१८ मध्ये त्यांचा राजीनामा घेण्यात आला. २०२१ मध्ये त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित चौकशीत साक्ष देण्यास नकार दिल्याने त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. आता सुटका झाल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. दोषी ठरल्यामुळे २९ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लढण्यास त्यांना मनाई करण्यात आली होती.

गुप्ता बंधूंचे डेहराडून कनेक्शन काय?

अजय, राजेश आणि अतुल गुप्ता यांना २०१८ मध्ये उत्तराखंड सरकारने ‘Z’ श्रेणी सुरक्षा प्रदान केली होती, जी त्यांनी तोपर्यंत उपभोगलेल्या ‘Y’ श्रेणी सुरक्षेमधून अद्ययावत करण्यात आली होती. या बंधूंची डेहराडूनमध्ये संपत्ती होती आणि त्यांनी नियुक्त केलेल्या सहा कर्मचाऱ्यांना पगारसुद्धा दिले जात होते, असे एका सरकारी अधिकाऱ्याने त्यावेळी सांगितले. २०१९ मध्ये गुप्तांनी औली गावात लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते. उत्तराखंड उच्च न्यायालयाने त्यांना तेथे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ३ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले. यंदा २४ मे रोजी डेहराडूनचे बिल्डर सतेंद्र सिंग साहनी उर्फ ​​बाबा साहनी यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्याच्या मुलाने केलेली तक्रार आणि मृत व्यक्तीने लिहिलेली चिठ्ठीत गुप्ता बंधूंपैकी दोघांचे नाव आहे.

साहनी यांच्या पत्रात गुप्ता बंधूंवर जबरदस्ती आणि त्यांच्या प्रकल्पांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप होता, असेही पोलिसांनी सांगितले. अनिल आणि अजय गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे न्यायमंत्री रोनाल्ड लमोला यांनी अलीकडेच एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना सांगितले की, सरकारला अटकेची माहिती आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेने ज्यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले होते, ते सदस्य आहेत की नाही याबद्दल अनिश्चितता असल्याचे त्यांनी सांगितले.”,