अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यानंतर एकामागून एक धक्कादायक निर्णय घेणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पश्चिम आशियात आजवरची सर्वांत मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले सुरू केल्यानंतर अमेरिकेने थेट हवाई हल्ला चढवत प्रत्युत्तर दिले आहे. काही आठवडे अमेरिकेचे हे हल्ले सुरू राहतील, असे सांगण्यात येत आहे. एकीकडे इस्रायल-हमासमधील शस्त्रसंधी कधीही मोडण्याच्या बेतात असताना पश्चिम आशियात आणखी एक संघर्ष पेटण्याची ही नांदी आहे का?
हुथी बंडखोर आणि त्यांचा इतिहास
१९९०च्या दशकाच्या उत्तरार्धात, उत्तर येमेनमध्ये हुथी या घराण्याने झैदी शिया पंथीय धार्मिक पुनरुज्जीवन चळवळ सुरू केली. एके काळी संपूर्ण येमेनवर या पंथाची सत्ता होती. मात्र कालांतराने त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि येमेनची राजधानी सनामधील सत्ताधाऱ्यांबरोबर त्यांचे खटके उडाले. येमेनी सैन्यदलावर गनिमी काव्याने हल्ले आणि नजिकच्या सुुन्नीबहुल सौदी अरेबियाबरोबर सीमावर्ती भागात संघर्ष अशा दोन आघााड्यांवर हुथी बंडखोर कारवाया करतात. अब्दुल मलिक अल-हुथी याने डोंगराळ प्रदेशात विखुरलेल्या गटांना एकत्र आणून जागतिक महासत्तांना आव्हान देऊ शकेल, अशी अतिरेकी संघटना बांधली. वारंवार ठिकाणे बदलत, पत्रकारांना चार हात लांब ठेवून आणि पूर्वनियोजित कार्यक्रमांना उपस्थिती टाळून तो सावधगिरी बाळगतो. अल-हुथीच्या नेतृत्वाखाली या गटाचे संख्याबळ वाढत गेलेच, शिवाय ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अशी अत्याधुनिक आयुधेही त्यांच्याकडे आहेत. हुथींना शस्त्रसज्ज करण्यात इराणचा हात असल्याचा सौदी अरेबिया आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचा दावा असला, तरी इराण मात्र याला नकारच देत आला आहे. अल-हुथी याची ओळख ही वारंवार ठिकाणे बदलणारा, प्रसारमाध्यमांना न भेटणारा आणि नियोजित सार्वजनिक उपस्थिती टाळणारा नेता अशी आहे.
लाल समुद्रावर नियंत्रण
२०१४मध्ये भडकलेल्या यादवी युद्धात हुथी बंडखोरांनी राजधानी सनावर कब्जा मिळविला. आपल्या शेजारी देशात इराणचा वाढता प्रभाव सौदी अरेबियाला मान्य नव्हताच… त्यामुळे त्यांनी २०१५मध्ये युरोप-अमेरिकेच्या मदतीने येमेन सरकारकडे मदतीचा हात पुढे केला. या जोरावर येमेनी राज्यकर्त्यांनी हुथींना उत्तरेकडे ढकलले. एडन बंदरामध्ये आपला तळ हलवून आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले येमेन सरकार अस्तित्वात असले, तरी सनासह लाल समुद्राचा संपूर्ण किनारा हुथींच्या ताब्यात आहे. इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला केल्यानंतर हमासच्या समर्थनार्थ लाल समुद्रातून जाणाऱ्या इस्रायल आणि अमेरिकेच्या जहाजांवर हुथी बंडखोरांनी हल्ले सुरू केले. इस्रालयच्या मदतीला जाणाऱ्या जहाजांवर एडनचे आखात, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि भूमध्य सागरातही हल्ले केल्याचा दावा हुथींकडून करण्यात येत आहे. या हल्ल्यांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जहाज कंपन्यांना दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून येणारा लांबचा सागरमार्ग घ्यावा लागत आहे. सुमारे १५ टक्के जागतिक व्यापार चालणारा हा मार्ग मोकळा करणे युरोप-अमेरिका-इस्रायलसाठी महत्त्वाचे बनले आहे. गाझामधील शस्त्रसंधीनंतर हुथींनी हल्ले थांबविले होते. मात्र इस्रायलने गाझातील मदत बंद केल्यानंतर परिस्थिती पुन्हा चिघळली असून आता तर ट्रम्प यांनी थेट हवाई हल्ले सुरू केले आहेत.
हुथींच्या आडून इराणला इशारा
इराणने इस्रायलच्या सभोवती बंडखोर गटांना शस्त्रसज्ज करत पद्धतशीरपणे जाळे विणले आहे. इराणच्या या तथाकथित ‘प्रतिरोध अक्षा’चा हुथी बंडखोरही भाग आहेत. लेबनॉनमधील हेजबोला आणि गाझामधील हमासनंतर हा इराणचे समर्थन असलेला तिसरा मोठा गट मानला जातो. अमेरिका-इस्रायलला विरोध आणि इस्लाम हे समान दुवे असलेले इराण, हेलबोला, हमास, हुथी यांचे लागेबांधे असले, तरी जाहीरपणे मात्र हे सर्वजण एकमेकांशी संबंध नसल्याचे सांगतात. आपण इराणचा हस्तक असल्याचे अल-हुथी मान्य करत नाही. येमेनमधील तज्ज्ञदेखील हुथी बंडखोरांचा संघर्ष प्रामुख्याने देशांतर्गत कारणांमुळे असल्याचे सांगत असले, तरी त्यांच्याकडे असलेल्या अद्ययावत शस्त्रांवरील इराणी शिक्का लपून राहात नाही. एकूणच कुणालाही न जुुमानता निर्णय घेण्याचा धडाका लावणाऱ्या ट्रम्प यांनी येमेनवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलशी संघर्षामुळे हेजबोला आणि हमासचे कंबरडे मोडले असताना आता हुथींना लक्ष्य करून ‘प्रतिरोध अक्षा’वर अमेरिकेने आणखी एक आघात केला असला तरी यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष चिघळण्याची शक्यता वाढली आहे.
हुथी बंडखोरांचे संभाव्य प्रत्युत्तर
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ३१ जण ठार झाले असून यात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याचा दावा हुथी बंडखोरांनी केला आहे. यात सुमारे १०० नागरिक जखमीही झाले आहेत. अमेरिकेचे हल्ले सुरू झाल्यानंतर अल-हुथी यांनी एक दृकश्राव्य संदेश जारी करून बदला घेण्याचा इशारा दिला. हुथींकडे अत्याधुनिक हत्यारे असली, तरी ते थेट अमेरिकेला शिंगावर घेतील, इतके ताकदवान नाहीत. त्यामुळे एकतर इस्रायल किंवा सौदी अरेबियामधील काही ठिकाणांवर हुथी बंडखोर हल्ले करू शकतात. मात्र सर्वांत महत्त्वाचे आहे ते लाल समुद्रातील व्यापारी मार्गांना वाढलेला धोका… अमेरिकी हल्ल्यांचा बदला म्हणून जहाजांवरील हल्ले वाढण्याची भीती असून याचा फटका जागतिक व्यापाराला बसणार आहे. दुसरीकडे, हुथींना मदत सुरू ठेवली तर आपले पुढले लक्ष्य इराण असेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिल्यामुळे आगामी काळात पश्चिम आशियातील धग आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.
amol.paranjpe@expressindia.com