हरियाणातील नूह जिल्ह्यात ३१ जुलै रोजी धार्मिक यात्रा काढल्यानंतर जातीय हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसाचारानंतर हरियाणातील मेवात क्षेत्र प्रकाशझोतात आले. या हिंसाचाराची दाहकता त्यानंतर संपूर्ण हरियाणा आणि राजस्थान व उत्तर प्रदेशच्या भागात जाणवली. ज्या मेवात क्षेत्रात हिंसाचार उफाळला होता, त्या ठिकाणी मेव मुस्लीम यांची मोठी संख्या आहे. हे मेव मुस्लीम जवळच्या राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील काही भागांत मोठ्या संख्येने राहतात. मेवात आणि मेव मुस्लीम यांचे काय नाते आहे? या समुदायाला मेव हे नाव का पडले? त्यांचा इतिहास काय? याबद्दल घेतलेला हा सविस्तर आढावा….

मेव मुस्लीम कोण आहेत?

हरियाणामधील मेवात क्षेत्र नूह जिल्ह्याच्या आसपास पसरले आहे. प्रशासकीयदृष्ट्या नूह हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी या भागाला मेवात अशी ओळख आहे. हरियाणामधील नूह, पलवल, फरिदाबाद आणि गुरगाव जिल्ह्यापर्यंत मेवात प्रांताचा विस्तार आहे. (आपल्याकडे ज्याप्रमाणे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ओळख आहे) राजस्थानमधील अलवर आणि भरतपूर या दोन जिल्ह्यांतही मेव मुस्लिमांची संख्या लक्षणीय अशी आहे, तर पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग जो हरियाणा आणि राजस्थानला लागून आहे, त्या भागातही आणि विशेष करून मथुरेपर्यंत मेव मुस्लीम आढळतात. मेव मुस्लीम हे हिंदू आणि मुस्लीम अशा मिश्र संस्कृतीचे आचरण करतात. मेवात भाग मागासवर्गीय म्हणून ओळखला जातो.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Pathri Constituency, Suresh Warpudkar,
बंडखोरीवरून वरपूडकर- बाबाजानी यांच्यात कलगीतुरा

हे वाचा >> हरियाणा हिंसाचार : नूह जिल्ह्यातील जलाभिषेक यात्रा काय आहे?

हरियाणामधील कुरुक्षेत्र विद्यापीठातील इतिहास विभागाचे अध्यक्ष आणि समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक एस. के. चहल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधत असताना मेव मुस्लिमांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. मध्ययुगीन भारतात जेव्हा मुघल शासक अकबराचा भारतावर अंमल होता, त्यावेळी मेवात १५ प्रांतात विभागला गेला होता. चहल म्हणाले की, अनेक इतिहासकारांच्या मते मेव मुळचे मुस्लीम नव्हते. १२ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत दिल्लीतील सुलतान आणि मुघल शासकांनी औरंगजेबच्या काळात हळूहळू इस्लाम स्वीकारला.

खिलजी घराण्याच्या राजवटीत दिल्लीमध्ये १३ व्या शतकापासून सुलतानशाही सुरू झाली. १६ व्या शतकाच्या मध्यात दिल्लीचे तख्त मुघलांच्या ताब्यात गेले. १८ व्या शतकांपर्यंत मुघल शासक तग धरून राहिले असले तरी औरंगजेब हा मुघलांचा शेवटचा एकछत्री अंमल करणारा शासक म्हणून ओळखला जातो.

मात्र, इतर काही इतिहासकारांनी मेव यांनी हळूहळू इस्लाम धर्म स्वीकारला याबाबतचे जरा वेगळे विश्लेषण केले आहे. मेव यांच्या वांशिक रचनेबद्दल लेखन केलेल्या प्राध्यापक शेल मायाराम यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना म्हटले, सध्या सर्रास वापरली जाणारी धर्मांतर ही आधुनिक संकल्पना आहे. आपण १४ आणि १५ व्या शतकाबाबत बोलत आहोत, त्यावेळी धर्मांतर अशी काही संकल्पना अस्तित्त्वात नव्हती. मेव समुदायातील लोक काही सुफी संतांच्या प्रभावाखाली आले होते. परंतु, तरीही त्यांनी आपल्या चालीरीती, रुढी यांचे आचरण सुरूच ठेवले होते. त्यामुळे मेव समुदायात ‘बहु धार्मिकता’ दिसत होती.

मेव हा शब्द डोंगराळ भागातील आदिवासी समूहासाठी वापरला जातो. मेव मुस्लिमांचा संबंध मीना आदिवासी गटाशी असल्याचेही काही इतिहासकार सांगतात. “अरवली पर्वतरांगामध्ये ज्या ठिकाणी मीना आदिवासी जमातीचे लोक राहत असत, त्याच भागातून मेव समुदाय आला असल्याचे मानले जाते. एकीकडे अरवली पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला नद्यांचे विस्तृत पात्र, यादरम्यान असलेल्या जंगलामध्ये यांचे वास्तव्य होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे लोक इतर स्थानिक गट जसे की, अहिर आणि जाट यांच्यात येऊन मिसळायला लागले”, अशी माहिती चंदीगडमधील पंजाब विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक एम. राजीवलोचन यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली.

तथापि, मेव यांचे नेमके मूळ कोणते? याबाबत अनेक इतिहासकारांमध्ये दुमत आहे. प्राध्यापक चहल म्हणतात, इतिहासकार एस. एल. शर्मा आणि आर. एन. श्रीवास्तव यांच्या इतिहासाला प्रमाण मानणाऱ्या वर्गाच्या मतानुसार, मेव हे मुळचे राजपूत आहेत, तर पी. डब्लू. पोवेट यांच्या मतानुसार, मेव हे मुळचे आदिवासी असून मीना यांच्याशी त्यांचा संबंध आहे.

हे वाचा >> हरियाणामध्ये हिंसाचार का भडकला? गोरक्षक मोनू मानेसरशी त्याचा काय संबंध?

“डिस्ट्रिक्ट गॅझेटियर ऑफ अलवर (१८७८)” यामध्ये पोवेट यांनी दरिया खान मेव याच्यावर आधारित एका प्रेमगीताचा हवाला देताना सांगितले की, दरिया खान मेव याचे सिस्बदानी या मीना आदिवासी जमातीमधील मुलीशी लग्न झाले होते. काही काळ वेगळे झाल्यानंतर त्या दोघांनी पुन्हा लग्न केले होते. पोवेट यांनी असेही सांगितले की, मेव आणि मीना समुदायातील अनेकांची आडनावे ही एकसारखीच आहेत.

बाबरच्या विरोधात मेवात सरदार लढले

दिल्लीच्या सुलतानांनी मेव यांची सरदार पदावर नेमणूक केली होती. उदाहरणार्थ, राजा नहर खान या मेव सरदाराला दिल्लीचा सुलतान फिरोझशाह तुघलक याने १३७२ मध्ये ‘वली-ए-मेवात’ ही पदवी देऊन गौरविले होते. राजा हसन खान मेवाती हेदेखील आणखी एक उदाहरण आहे. राजा हसन खान हा शेवटचा मेवाती सरदार होता, ज्याने मुघल बाबर याच्या विरोधात राजपूत राजा राणा संघाच्या सोबतीने १५२७ साली खान्वाच्या युद्धात सहभाग घेतला होता. मात्र, या युद्धात बाबरने त्यांचा पराभव केला. इतिहासकार म्हणतात की, बाबरने राजा हसन खान याला त्याच्या बाजूने लढण्याची विनंती केली होती. आपण एकाच धर्माचे असून आमच्या बाजूने ये, असा प्रस्ताव देऊनही राजा हसन खान याने राजपूत राजा संघाच्या बाजूने लढणे पसंत केले होते.

एम. राजीवलोचन यांच्या मते, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जॅदोन जमात ज्यांना जदुवंशी म्हणून ओळखले जाते, त्यांनी मेवात आणि गुरुग्राम एकत्रित प्रदेश करून तिथे राज्य केले. राजीवलोचन पुढे म्हणाले, १२ व्या आणि १३ व्या शतकात मेव समुदायाने आपल्या प्रथा आणि परंपरा जपल्या होत्या, पण जेव्हा दिल्लीत सुलतानशाही प्रस्थापित झाली, तेव्हा मेवातवर अनेक स्वाऱ्या करण्यात आल्या. दिल्लीत फिरोजशाह तिसरा याचे राज्य असताना अनेक जदुवंशी लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. यातूनच बहादूर नाहरसारखा नेता तयार झाला. बहादूर नाहर याने खान आडनाव धारण केले होते. त्याच्या कुटुंबाने पुढे अनेक वर्ष मेवातवर राज्य केले.

मेव यांच्या धार्मिक प्रथा काय आहेत?

मेव यांच्या संमिश्र अशा धार्मिक प्रथा आहेत, म्हणून त्यांची ओळख इतरांपेक्षा वेगळी आहे. चहल यांनी सांगितले की, मेव समुदायातील लोक इस्लाम सणांसह दिवाळी, होळी आणि तीज यांसारखे हिंदू सणही तेवढ्याच उत्साहाने साजरे करतात. उत्तरेत सुफी चळवळ फोफावली असताना सुफी संत निझामुद्दीन औलिया यांचा या संमिश्र धार्मिक परंपरेत महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या प्रभावाखाली मेव समुदाय बहु धार्मिक परंपरा जोपासू लागला.

मेव यांना पूर्वी गुन्हेगारी जमात का म्हटले जायचे?

ब्रिटिशांविरोधात १८५७ ला झालेल्या पहिल्या उठावात मेव समुदायाने मोठ्या संख्येने भाग घेतला होता. ज्यामुळे ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमाती कायदा, १८७१ (Criminal Tribes Act of 1871) नुसार संपूर्ण समुदायावर गुन्हेगारी जमात असा शिक्का मारला. स्वातंत्र्याच्या उठावात सक्रिय सहभाग घेतल्याची त्यांना शिक्षा देण्यात आली रोती. मेवात इतिहासाचे स्वतंत्र संशोधक सिद्दिकी अहमद यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, १८५७ च्या उठावात जवळपास दहा हजार मेव नागरिकांनी आपले प्राण गमावले होते.

आणखी वाचा >> धार्मिक यात्रेतील भाविकांना शस्त्रे कुणी पुरवली? हरियाणा हिंसाचारावरून केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला फटकारले

पण, त्यानंतर कायद्याने त्यांना गुन्हेगारी जमात ठरवल्यामुळे त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांचा निगराणीखाली राहावे लागले. एखादा अपराध घडल्यास त्यांना आपोआपच दोषी मानले जाई. प्राध्यापक चहल सांगतात त्याप्रमाणे, गुन्हेगारीचा शिक्का माथी मारल्यामुळे मेवात समुदायाला प्रगती करण्याची संधी नाकारण्यात आली. परिणामस्वरूप ते उदरनिर्वाहासाठी गुन्हेगारीकडे वळले.

मेवात प्रांताच्या मागासलेपणाची कारणे कोणती?

एम. राजीवलोचन यांच्या माहितीनुसार, मेवात येथील जमीन फारशी सुपीक नाही. तसेच या प्रांतात मोठे बाजार नाहीत की महामार्ग जात नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या सुलतानांनी या प्रांताला कमी महत्त्व दिले.

सिद्दिकी अहमद यांनी सांगितले की, मेवात समुदायातील शिक्षित आणि प्रभावशाली लोकांचा गट फाळणीच्यावेळेस पाकिस्तानात निघून गेला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सजग राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वाअभावी शैक्षणिक, क्रीडा आणि सिंचनासारख्या सुविधांवर कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही मेवात प्रांताचा मागासलेपणा कायम राहिला.

प्राध्यापक चहल सांगतात, मागच्या काही दशकांपासून मेव मुस्लीम समुदायाच्या लोकसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. हे त्यांच्या मागासलेपणाचे आणखी एक उदाहरण आहे. अविकसित भाग आणि वंचित घटकांमध्ये साधारणपणे लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो. मेवात समुदायातील मागासलेपण दूर करावयाचे असेल तर मेवाती संस्कृती आणि त्यांच्या परंपरांचे जतन करणे आणि त्यांच्या बहुधार्मिक परंपरेचा प्रचार करणे हा सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकेल.

सिद्दिकी अहमद म्हणतात, स्वातंत्र्यानंतर फाळणीच्यावेळी मेवात प्रांतात फारश्या तणावाच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, आता धर्माच्या आधारावर जे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे, तो नवीनच प्रकार आहे.