संसदेच्या नव्या इमारतीचे २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘सेंगोल’ राजदंडाची लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापना करण्यात आली. नव्याने बांधण्यात आलेले हे सभागृह अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. यानंतर संसदेचा कारभार आता नव्या इमारतीतून चालणार आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेच्या जुन्या इमारतीची नव्याने चर्चा होत आहे. वर्तुळाकार असलेली ही इमारत साधारण १०० वर्षे जुनी असून या इमारतीचीही अनेक वैशिष्ट्ये आहेत. संसदेची जुनी इमारत कोणी बांधली? त्यासाठी किती खर्च आला? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या….
हेही वाचा >> विश्लेषण: कोळशाच्या किमतीपेक्षा वाहतुकीच्या दुप्पट खर्चाचा भुर्दंड कुणाला?
इमारत उभारणीसाठी एडवीन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर या दोन वास्तुविशारदांची निवड
संसदेच्या जुन्या इमारतीचे उद्घाटन १८ जानेवारी १९२७ रोजी करण्यात आले होते. या इमारतीच्या उभारणीसाठी एडवीन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर या दोन वास्तुविशारदांची निवड करण्यात आली होती. याच कारणामुळे नवी दिल्लीतील मध्यवर्ती भागाला लुटियन्स दिल्ली म्हणून ओळखले जाते. बेकर हे एक ब्रिटिश वास्तुविशारद होते. ब्रिटिशांची भारतासह अनेक देशांवर सत्ता होती. बेकर यांनी ब्रिटिशांसाठी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे अनेक ऐतिहासिक इमारती उभारण्याचे काम केलेले आहे. बेकर यांच्या तुलनेत लुटियन्स तितकेसे प्रसिद्ध नव्हते. जॉर्ज पाचवे यांचा भारताचे नवे राजे म्हणून १२ डिसेंबर १९११ रोजी राज्याभिषेक झाला. या वेळी त्यांनी आमची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवणार आहोत, असे जाहीर केले. त्यानंतर एडवीन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर या दोन वास्तुविशारदांवर दिल्लीमध्ये संसद भवन, राष्ट्रपती भवन, नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक, राजपथ, इंडिया गेट, नॅशनल आर्काइव्ह बिल्डिंग तसेच इंडिया गेटच्या परिसरात राजपुत्रांच्या राजवाड्यांची निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
हेही वाचा >> विश्लेषणः ९ दिवसांत कर्ज मर्यादेच्या समस्येवर तोडगा न निघाल्यास अमेरिका मंदीच्या कचाट्यात; जग विनाशाच्या उंबरठ्याकडे जाणार?
लुटियन्स आणि बेकर यांच्यात संघर्ष
संसदेच्या उभारणीसाठी एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला. १९२१ ते १९२७ या कालखंडात संसदेच्या जुन्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. ब्रिटिश राजवटीत या संसद भवनाला ‘काउन्सिल हाऊस’ म्हटले जायचे. लुटियन्स आणि बेकर या दोन वास्तुविशारदांवर संसदेच्या जुन्या इमारतीचे बांधकाम सोपवण्यात आले असले तरी या दोघांचे वेगवेगळ्या कारणांमुळे वाद होऊ लागले. कर्तव्य पथावरील विजय चौकाजवळ एखादी व्यक्ती उभी राहिल्यास एक रस्ता हा इंडिया गेडकडे आणि दुसरा रस्ता राष्ट्रपती भवनाकडे जातो. राष्ट्रपती भवन हे साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकला लागून आहे. या दोन्ही ब्लॉकमध्ये महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. या भागातील रस्ता हा तुलनेने काहीसा उंच असल्यामुळे विजय चौकाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती भवन स्पष्टपणे दिसत नाही. राष्ट्रपती भवनाची रचना ही लुटियन्स यांनी केली होती. याच कारणामुळे लुटियन्स आणि बेकर यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.
हेही वाचा >> जुन्या इमारतीला ऐतिहासिक महत्त्व, मग संसदेच्या नव्या इमारतीची गरज का भासली? जाणून घ्या…
संसदेच्या जुन्या इमारतीचे बांधकाम कसे करण्यात आले?
१९१९ साली लुटियन्स आणि बेकर यांनी काऊन्सिल हाऊस (संसद भवन) साठी एक नकाशा तयार केला. ही इमारत वर्तुळाकार असावी, असा निर्णय या दोघांनी घेतला. मध्य प्रदेशमधील ६४ योगींनी मंदिराच्या रचनेची प्रेरणा घेऊनच संसद भवनाची निर्मिती करण्यात आली होती, असे म्हटले जाते. मात्र त्याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही. भारतीय स्थापत्यकला तुलनेने निकृष्ट असल्याचे लुटियन्सला वाटायचे. त्यामुळे जुन्या संसद भवनाची इमारत उभारताना भारतीय कलाकृतींचा यामध्ये समावेश करून नये, असे मत लुटियन्स यांचे होते. मात्र बेकर यांचे मत काहीसे वेगळे होते. ब्रिटिश साम्राज्याची ताकद तसेच ब्रिटिशांचे भारतावरील राज्य दर्शवण्याचे उद्दिष्ट पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य कलेचे मिश्रण करून साध्य करता येऊ शकते, असे बेकर यांना वाटायचे. मात्र शेवटी बेकर यांनी युरोपियन अभिजात शैलीचे श्रेष्ठत्व मान्य करीत करीत त्यानुसार संसद भवनाची निर्मिती करण्याचे मान्य केले.
हेही वाचा >> नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने चलनात येणार १०० रुपयांचे नाणे; जाणून घ्या आतापर्यंतच्या विशेष नाण्यांची कहाणी!
जुन्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी काय सामान वापरण्यात आले?
संसदेच्या जुन्या इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या दगडांची तसेच संगमरवराची गरज होती. या कामासाठी साधारण २५०० कामगारांकडून काम करून घेण्यात आले. या इमारतीत १४४ खांब आहेत. हा प्रत्येक खांब २७ फूट उंच आहे. या इमारतीच्या बांधकामाला तेव्हा ८३ लाख रुपये लागले होते. संपूर्ण भारतीय कामगारांनी या इमारतीच्या उभारणीसाठी काम केले. १९२७ साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा उद्योग आणि कामगार विभागाचे प्रभारी सर भूपेंद्रनाथ मिश्रा यांनी १८ जानेवारी १९२७ रोजी या इमारतीच्या उद्घाटनासाठी व्हाइसरॉय लॉर्ड इरवीन यांना निमंत्रण दिले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेने ही इमारत ताब्यात घेतली आणि १९५० साली भारतीय संविधान लागू झाल्यामुळे ही इमारत ‘भारतीय संसद भवन’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
हेही वाचा >> विश्लेषण: टिपूची तलवार आणि त्याचा वादग्रस्त इतिहास !
जुन्या इमारतीत वस्तुसंग्रहालय
दरम्यान, संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व कामकाज या नव्या इमारतीत पार पडणार आहे. तर संसदेची जुनी इमारत ही पाडली जाणार नाही. संसदेच्या नव्या इमारतीत कामकाज सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीत ‘लोकशाही वस्तुसंग्रहालय’ उभारले जाणार आहे.