इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू झाल्यानंतर माध्यमांमध्ये रोज यासंबंधी बातम्या येत आहेत. या संघर्षादरम्यान इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाला धर्म या एकाच चष्म्यातून पाहिले जात असल्याचे दिसते. विशेष करून पॅलेस्टाईनबाबत अनेक समज-गैरसमज असल्याचे दिसतात. भारतात तरी पॅलेस्टाईन हे मुस्लीम राष्ट्र असून, ज्यू इस्रायलवर दहशतवादी कारवाया करीत आहे, असे चित्र रंगवले गेले आहे. या गैरसमजामुळे पॅलेस्टिनी लोकांच्या समृद्ध आणि तेवढ्याच किचकट इतिहासाकडे कानाडोळा केला जात आहे. या संघर्षाचे मूळ जाणून घ्यायचे असेल तर पॅलेस्टिनी नेमके कोण आहेत? हे माहिती करून घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यानुसार पॅलेस्टिनी नेमके कोण? याबद्दल घेतलेला हा आढावा ….
पॅलेस्टिनी हा शब्द पहिल्यांदा कधी वापरला गेला?
पॅलेस्टाईन हा शब्द पहिल्यांदा ग्रीक इतिहासकार आणि भूगोल शास्त्रज्ञ हेरोडोटस यांनी इसवी सन पूर्व ५०० मध्ये वापरला. फेनिसिया (प्रामुख्याने आधुनिक लेबनॉन) आणि इजिप्त यांच्या दरम्यान असलेल्या सागरी किनाऱ्याजवळील जमिनीची ओळख दर्शविण्यासाठी हा शब्द वापरण्यात आला होता. ग्रीक लेखकांनी फिलिस्तिया (Philistia) या नावावरून पॅलेस्टाईन हे नाव घेतले. दक्षिण-पश्चिम लेव्हंटच प्रदेश ज्यामध्ये मुख्यत्वेकरून गाझा, एश्केलॉन, अश्दोद, एक्रोन आणि गथ (ही सर्व ठिकाणे सध्या इस्रायल किंवा पॅलेस्टाईनमध्ये आहेत) या शहरांच्या भूभागाला पॅलेस्टाईन नाव देण्यात आले. पूर्व भूमध्य समुद्राच्या आसपासच्या परिसराला लेव्हंट ही ऐतिहासिक-भौगोलिक संज्ञा वापरण्यात आली.
हे वाचा >> गाझापट्टीला जगातील सर्वात मोठे ‘खुले कारागृह’ का म्हणतात?
सुरुवातील पॅलेस्टाईन हे विशिष्ट भूभागाला ओळखण्यासाठी दिले गेलेले नाव होते. त्यानंतर या प्रदेशात राहणाऱ्या सर्वच लोकांना धर्म, वंश यापलीकडे जाऊन पॅलेस्टिनी अशी ओळख मिळाली. हा शब्द वापरत असताना रोमन नोंदीत ज्यू किंवा ख्रिश्चन यांच्यात फरक केलेला नाही. इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबांनी लेव्हन्ट प्रदेशावर विजय मिळविला. त्यानंतर पॅलेस्टाईन या नावाचा अधिकृत वापरावर मर्यादा आल्या. विसाव्या शतकापर्यंत हीच परिस्थिती कायम राहिली. तथापि, स्थानिक भाषेत पॅलेस्टाईन हा शब्द प्रचलित होताच. शिवाय अरबी भाषेत फिलास्टिन असा उल्लेख केला गेला. हिंदी किंवा मराठी भाषेत फिलिस्टिनचा उल्लेख पॅलेस्टाईन असा केला गेला आहे. पॅलेस्टाईनच्या भूभागाचे जसजसे इस्लामीकरण होत गेले आणि अरब संस्कृतीचा प्रसार होत गेल्यानंतर या प्रदेशात अनेक सांस्कृतिक ओळखी उदयास येत गेल्या.
पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर १९२२ साली ऑटोमन साम्राज्य खालसा झाले. तेव्हाच्या ऑटोमन साम्राज्यामध्ये पॅलेस्टाईन (आधुनिक तुर्कीचा काही भाग वगळता, सीरिया, अरबी द्वीपकल्प आणि उत्तर आफ्रिकेचा भाग येत होता) प्रदेश ब्रिटिश आणि फ्रेंचमध्ये विभागला गेला. ब्रिटिशांच्या हुकुमानुसार पॅलेस्टाईनची भौगोलिक रेषा ठरविली गेली. या हुकुमानुसार १९४७ मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन राज्यांमध्ये त्याची विभागणी केली गेली.
हे वाचा >> मुंबईपेक्षाही लहान असलेली ‘गाझा’पट्टी गेल्या १०० वर्षांत युद्धभूमी कशी ठरली?
मग आजचे पॅलेस्टिनी कोण आहेत?
आज पॅलेस्टाईनमध्ये राहणारे (वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेम) लोक पॅलेस्टिनी म्हणून ओळखले जातात. तसेच ब्रिटिशांनी आखून दिलेल्या सीमा प्रदेशातील निर्वासित नागरिक जिथे कुठे राहत आहेत, त्यांनाही पॅलेस्टिनी निर्वासित मानले जाते. इस्रायलच्या सीमाप्रदेशात राहणाऱ्या काही लोकही स्वतःला पॅलेस्टिनी म्हणून ओळखले जात आहे.
१९६८ साली, ‘पॅलेस्टिनी राष्ट्रीय सनद’ याद्वारे आधुनिक पॅलेस्टिनी राष्ट्रवादाचा आधार असणारा वैचारिक दस्तऐवज तयार केला गेला. यामध्ये पॅलेस्टिनींच्या अरबी ओळखीवर जोर देण्यात आला. सनदेच्या कलम ५ मध्ये असे म्हटले आहे की, पॅलेस्टिनी हे अरब नागरिक आहेत. १९४७ पर्यंत सामान्यतः हे लोक पॅलेस्टाईनमध्ये वास्तव्य करत होते, त्यांना तिथून बेदखल केले गेले होते किंवा ते तिथे कधी काळी राहिले होते. १९४७ नंतर पॅलेस्टिनी वडिलांच्या पोटी जन्माला आलेला कुणीही पॅलेस्टिनी म्हणूनच ओळखला जाईल.
आणखी वाचा >> इजिप्त आणि इतर अरब राष्ट्र पॅलेस्टिनी निर्वासितांना का स्वीकारत नाहीत?
या प्रदेशातील बहुसंख्य अरब हे मुस्लीम आहेत. पॅलेस्टाईनची सनद पॅलेस्टाईनचा विशिष्ट धर्म विशद करत नाही. कलम ६ नुसार, जे ज्यू आधीपासूनच पॅलेस्टाईनमध्ये राहत होते, त्यांना पॅलेस्टिनी मानले जाईल. १९४८ नंतर फार कमी ज्यू लोकांनी नवीन इस्रायलीपेक्षा पॅलेस्टिनी असल्याची ओळख कायम ठेवण्यात रस दाखविला आहे.
पॅलेस्टाईनमध्ये आज बहुसंख्य सुन्नी मुस्लीम आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, वेस्ट बँकमधील ८०-८५ टक्के आणि गाझापट्टीतील ९९ टक्के लोकसंख्या मुस्लीम धर्मीय आहे. (यात संप्रदायाचा उल्लेख केलेला नाही)