भारतीय लष्कराने पुन्हा एकदा जागतिक पटलावर भारताचा नावलौकिक वाढवला आहे. भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांना प्रतिष्ठित जेंडर ॲडव्होकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी ही घोषणा केली आहे. दुजारिक म्हणाले की, गुटेरेस गुरुवारी राधिका सेन यांना २०२३ सालचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करतील. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून तो साजरा केला जातो. सध्या संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या महिला लष्करी शांतीरक्षकांमध्ये भारताचा ११ वा क्रमांक आहे.
…म्हणूनच हा पुरस्कार दिला जातो
प्रतिष्ठित जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड २००० हा सुरक्षा परिषदेच्या ठरावाला चालना देण्यासाठी दिला जातो, ज्यामध्ये महिला आणि मुलींना विवादित भागात लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. मेजर सुमन गवानी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणाऱ्या सेन या दुसऱ्या भारतीय शांततारक्षक आहेत. सुमन गवानी यांनी दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये काम केले आणि त्यांना २०१९ मध्ये हा पुरस्कार मिळाला. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानात मोनुस्कोबरोबर काम करणाऱ्या ६०६३ भारतीय कर्मचाऱ्यांपैकी त्या एक होत्या. तसेच सेन यांनी MONUSCO मधील १९५४ जणांबरोबर कार्य केले, त्यापैकी ३२ महिला आहेत.
राधिका सेन एक आदर्श
गुटेरेस यांनी अभिनंदन करताना त्यांनी राधिका सेन एक आदर्श असल्याचे वर्णन केले आहे. युनायटेड नेशन्सच्या मते, राधिका सेन यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये संयुक्त राष्ट्र मिशनबरोबर काम केले, जिथे त्यांनी एक अलर्ट नेटवर्क तयार करण्यात मदत केली. त्यांनी समर्पणाच्या भावनेने महिला आणि मुलींसह संघर्षग्रस्त समुदायांचा विश्वास जिंकला. उत्तर किवूमध्ये वाढत्या संघर्षाच्या वातावरणातही सेन यांच्या सैनिकांनी त्याच्याबरोबर काम केले.
राधिका यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदव्युत्तर पदवीधर घेतली
राधिका सेन या मूळच्या हिमाचल प्रदेशच्या आहेत. त्या बायोटेक इंजिनीअर आहेत. राधिका यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले होते, त्यानंतर त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. १९९३ मध्ये जन्मलेल्या मेजर सेन आठ वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाल्या. यानंतर त्या प्रगतीच्या एकामागून एक पायऱ्या चढत गेल्या. २०२३ मध्ये त्यांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (MONUSCO) मध्ये भारतीय रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनमध्ये एंगेजमेंट प्लाटून कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आणि एप्रिल २०२४ मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. मेजर सेन यांच्याबद्दल यूएनने दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक समानतेवर लक्ष केंद्रित करून या प्रदेशात शांतता राखण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यांनी मुलांसाठी इंग्रजीचे धडे आणि प्रौढांसाठी आरोग्य, करिअर शिक्षणाचे नियोजन केले. युद्धामुळे प्रभावित झालेल्या उत्तर किवूमधील समुदायांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी कम्युनिटी अलर्ट नेटवर्क्सदेखील तयार केले.
राधिका सेन म्हणाल्या की, “शांतता निर्माण करणे हे प्रत्येकाचे काम आहे. शांततेची सुरुवात आपल्या सर्वांच्या सहकार्याने होते.” हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या आव्हानात्मक वातावरणात कार्यरत असलेल्या सर्व शांती सैनिकांचे कठोर परिश्रम आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळेच मला हा पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी अधोरेखित केले.