दयानंद लिपारे
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ देशी गाईंच्या मृत्यूमुळे अचानक चर्चेत आला आहे. देशामध्ये अलीकडे गाय, गोमाता या संकल्पनेला महत्त्व दिले जात असताना हिंदुत्वाशी जवळीकीचे नाते सांगणाऱ्या कणेरी मठात रातोरात ५० हून अधिक देशी गाईंचा मृत्यू झाल्याने विविध अंगांनी चर्चा रंगते आहे. मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची कार्यशैली, राजकीय नातेसंबंध हे विषयही यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. एकूणच कणेरी मठाची पार्श्वभूमी, तेथील देशी गाईंचे मृत्यू प्रकरण आणि सध्या तेथे सुरू असणारा ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव’ हे नेमके काय प्रकरण आहे आणि त्याबाबतचा वाद कोणता आहे, याविषयीचे हे विश्लेषण.
कणेरी मठ कोठे आहे?
कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गालगत कणेरी मठ आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन केंद्रात या प्राचीन तीर्थस्थान असलेल्या मठालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे साधू, संत, महंत तसेच अनंत नामवंत दर्शनासाठी येत असतात. जगद्गुरु काडसिद्धेश्वर हेमांडपंती शिल्पकलेचे भव्य शिवमंदिर येथे आहे. मठ सर्व जाती-धर्मांसाठी खुला करणारे श्री मुप्पीन सिद्धेश्वर स्वामी म्हणजे चालते-बोलते वेदान्त असे म्हटले जाते. मोठी भूसंपदा, अर्थसंपदा असलेल्या मठाची सूत्रे अलीकडे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडे एकवटली आहेत. मठावर प्रामुख्याने लिंगायत समाजाचा प्रभाव असला तरी सर्व धर्मीय येथे दर्शन, पर्यटनासाठी येत असतात.
मठाचे महत्त्व कसे वाढले?
अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी १९७७ साली सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशनची स्थापना केली. नंतर मठात शिक्षण, पर्यटन, कृषी, ग्रामीण संस्कृतीचे संग्रहालय, गोशाळा, सांस्कृतिक उपक्रम, रुग्णालय असा पसारा वाढत गेला. येथील गोशाळा मोठी आहे. रमणीय परिसरात पर्यटक, भाविक यांच्या बरोबरीने राजकीय नेतेमंडळी यांचाही वावर वाढला. स्वाभाविक मठ – स्वामी यांना विशेष महत्त्व आले.
पंचमहाभूत महोत्सव काय आहे?
कणेरी मठावर सातत्याने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे दणक्यात आयोजन केले जाते. या अंतर्गत २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवा’चे आयोजन केले आहे. ‘पृथ्वीवरील वाढत्या तापमानाला आवर घालण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. हे थांबवण्यासाठी आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्त्वांचे संवर्धन महत्त्वाचे आहे’, असे कथन करीत काडसिद्धेश्वर स्वामी यांनी याचे आयोजित केले आहे. राज्य शासनाने यासाठी आर्थिक भरघोस आर्थिक निधी देतानाच संपूर्ण शासकीय यंत्रणा महोत्सवासाठी महिनाभर राबत आहे. लाखोंचे प्रायोजक आहेत. या अंतर्गत गो संवर्धनाचे महत्त्व सांगणारा एक वेगळा घटक अंतर्भूत केला आहे.
कणेरी मठाची गोशाळा कशी आहे?
कणेरी मठात सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद करणारा उपक्रम राबवला जातो. त्याच्या जोडीनेच मठामध्ये ४०० विविध प्रकारच्या भारतीय देशी गाई आहेत. त्यात प्रामुख्याने लाल कंधारी, देवणी आणि खिल्लारी या गाईंचा समावेश आहे. गाईपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण; गोमूत्रापासून विविध पदार्थ मठात तयार केले जातात. दरवर्षी गो परिक्रमा आयोजित केली जाते. पशुपालक ‘गायो विश्वस्य मातरम्’ अशा घोषवाक्य असलेल्या टोप्या घालतात. गोमूत्र व शेणापासून खतनिर्मिती केली जाते. गोमूत्रापासून आरोग्य विषयक औषधी तयार केल्या जातात. काडसिद्धेश्वर स्वामी गाय संवर्धनाचे महत्त्व सांगत असतात. पंचमहाभूत महोत्सवात गोसंवर्धनावर विशेष भर दिला जात आहे. गाईंचे महत्त्व असे उच्चरवात सांगितले जात असताना नेमक्या या लोकोत्सव काळातच मठामध्ये ५० हून अधिक देशी गाईंचा मृत्यू झाल्याने वाद निर्माण झाला आहे. या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या वाहिनीच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आली. महोत्सवासाठी गावागावातून मोठ्या प्रमाणात भाकरी, चपाती मागवल्या आहेत. हे शिळे अन्न गाईंच्या पोटात गेल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण पुढे आले आहे. कोणीतरी हे कृत्य केले असावे, असे म्हणत मठाने सारवासारव चालवली आहे. मोठ्या प्रमाणात गाई मृत्यू पावल्यामुळे मठ आणि काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. समाज माध्यमात ते प्रकर्षाने दिसून येत आहे.
राजकीय संदर्भ काय आहेत?
कणेरी मठामध्ये विविध जातीपाती, पंथाचे लोक दर्शनासाठी येतात. तद्वत विविध पक्षांचे नेतेही पायधूळ झाडत असतात. दहा वर्षांपूर्वी मठाची राजकीय अशी कोणती प्रतिमा नव्हती. अलीकडच्या काळात मठामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, हिंदुत्ववादी संघटनाच्या प्रतिनिधींचा ठळकपणे वावर वाढला आहे. सध्याचा पंचमहाभूत लोकोत्सव तर जणू संघ, भाजपचा असल्याप्रमाणेच वातावरण आहे. कणेरी मठ म्हणजे कोल्हापूरची रेशीमबाग असे वर्णन टीकाकार करताना दिसतात. काडसिद्धेश्वर स्वामी हे भाजपचे लोकसभेचे भावी उमेदवार असल्याचे म्हटले जाते. त्याचा स्वामींनी इन्कार केला असला तरीही चर्चा थांबताना दिसत नाही. स्वामी, मठ यावरील भाजपची प्रतिमा गडद होत असल्यानेच उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी गायींच्या मृत्यूप्रकरणी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी काडसिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे