राजेश्वर ठाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धीरेंद्र कृष्ण महाराज ऊर्फ गदाधारी महाराज यांच्या नागपुरातील रामकथा व दिव्य दरबार भरवण्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेऊन ही बाब जादूटोणा कायद्याविरोधी असल्याचा दावा केला. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीका केली, आंदोलनही केले. त्यामुळे सध्या धीरेंद्र कृष्ण महाराज व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे हे महाराज कोण, ते कोणते ‘चमत्कार’ करतात आणि अंनिसचे त्यावर आक्षेप काय असे अनेक प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आले आहेत.

धीरेंद्र कृष्ण महाराज कोण आहेत?

धीरेंद्र कृष्ण यांचा जन्म मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गडा या गावी झाला. त्यांच्या आजोबांनी त्यांना रामायण आणि भागवत गीता वाचायला शिकवले. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी हनुमानाची पूजा आणि १२व्या वर्षीपासून प्रवचन देण्यास सुरुवात केली. त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. ते मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पुजारी आहेत. आपण हनुमानाचा अवतार असल्याचा दावा ते करतात. त्यामुळे त्यांना ‘गदाधारी महाराज’ असेही म्हटले जाते.

धीरेंद्र कृष्ण महाराजाचा मठ कोठे आहे?

धीरेंद्र कृष्ण यांचा दरबार जेथे भरतो त्या स्थळाला बागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते व ते मध्य प्रदेशमध्ये छतरपूर जिल्ह्यात आहे. तेथे २००३पासून ते दरबार भरवत आहेत. तेथे ते नियमित प्रवचन करतात. त्यांचे लाखो भक्त आहेत. ते ‘चमत्कार’ करीत असल्याचा दावा त्यांचे भक्त करतात. त्यामुळे त्यांच्या प्रवचनाला गर्दी होते. त्यांच्या रामकथेच्या व कथित चमत्काराच्या अनेक चित्रफिती समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत.

विश्लेषण : हवामान बदल परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद का?

धीरेंद्र कृष्ण यांना चमत्कारी महाराज का म्हणतात?

धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्याकडे आलेली व्यक्ती कोणती समस्या घेऊन आली, हे त्या व्यक्तीने सांगण्याआधीच महाराज ती जाणतात. संबंधित अनोळखी व्यक्तीला त्यांच्या नावाने हाक मारतात. दरबारात येणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता आणि समस्या एका कागदावर लिहितात. तसेच समस्येचे समाधानदेखील त्यात नमूद करतात. त्या व्यक्तीच्या कुटुंबाबद्दलची माहितीही देतात असा लोकांचा समज आहे. त्यामुळे त्यांना चमत्कारी महाराज असेदेखील म्हटले जाते.

विश्लेषण: क्यूबाचे क्रांतिकारी चे गवेरा यांची मुलगी कोण आहे? भारताशी काय आहे नातं?

धीरेंद्र कृष्ण महाराज नागपुरात चर्चेत येण्याचे कारण काय?

धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या रामकथेचे जानेवारीच्या पहिल्या आठड्यात नागपुरात आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने एकित्रत झालेल्या लोकांसमोर ते दिव्य दरबार भरवत होते व तेथे आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचा दावा करीत होते. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी आक्षेप घेतला. पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. महाराज यांना त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पूर्वनियोजित वेळेच्या आधीच आटोपता घ्यावा लागला. परिणामी धीरेंद्र कृष्ण महाराज व अंनिस यांच्यातील वाद विकोपाला गेला व महाराज चर्चेत आले.

धीरेंद्र कृष्ण महाराजाबद्दल अंनिसचे आक्षेप काय?

महाराजांच्या कथित दिव्यशक्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला. समितीच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायद्या लागू आहे व त्यानुसार भविष्य सांगणे, चमत्कार करणे, दिव्यशक्तीने वस्तू ओळखण्याचा दावा करणे यावर बंदी आहे. आजार बरे करण्याचा दावा करणे आणि त्यातून पैसा कमावणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. महाराजाचा दरबार युट्यूबवर लोक पाहत आहेत. त्यामुळे प्रभावित होऊन मोठ्या संख्येने लोक धीरेंद्र महाराज यांच्या नादी लागत आहेत. यातून जनतेची फसवणूक होत आहे, त्यामुळे महाराजावर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसने केली.

हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका काय?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र महाराजाच्या विरोधात आक्षेप घेतल्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी अंनिसला लक्ष्य करणे सुरू केले. विश्व हिंदू परिषदेने महाराजाच्या समर्थनार्थ व अंनिसच्या विरोधात आंदोलन करून अंनिस केवळ हिंदू बाबांच्या विरोधातच का बोलते, इतर धर्मीयांबाबत का बोलत नाही असा सवाल केला.

विश्लेषण : Marital Rape बाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितलं उत्तर, भारतात काय आहे सद्यस्थिती?

पोलिसांची भूमिका काय?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र महाराजाच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करून जादूटोणा कायद्यानुसार कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी शनिवारपर्यंच कोणतीही कारवाई केली नव्हती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is dhirendra krishna maharaj andhashraddha nirmulan samiti print exp pmw