जर्मनीमध्ये २३ फेब्रुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तारूढ आघाडीचा दारूण पराभव झाला. प्रमुख विरोधी आघाडीतील पक्षांकडे सत्ता येईल असे मतदानोत्तर चाचण्यांनी दाखवून दिले. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) या पक्षाचे प्रमुख फ्रीडरीश मेर्झ हे नवे चान्सेलर होतील हे जवळपास निश्चित आहे. त्यांनी विजयाच्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करून भावी राजकारणाची दिशा दाखवून दिली. युरोपमधील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुखपदी अशी व्यक्ती विराजमान झाल्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात युरोपचा आवाज अधिक बुलंद होऊ शकेल.
काय घडले निवडणुकीत?
प्राथमिक अंदाजानुसार ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) आणि ख्रिश्चन सोशल युनियन (सीएसयू) यांच्या आघाडीला २८.६ टक्के मते किंवा बुंडेस्टॅग या जर्मन कायदेमंडळात २०८ जागा मिळतील. अतिउजव्या आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारत १५२ जागा आणि २०.८ टक्के मते मिळवले. तर मावळत्या सत्तारूढ सोशल डेमोक्रॅटिक पार्टीला (एसपीडी) तिसऱ्या क्रमांकाची १६.४ टक्के मते (१२० जागा) मिळाली. एएफडीची ही आजवरची सर्वांत उत्तम कामगिरी. तर दुसऱ्या महायुद्धानंतर एसपीडीची ही आजवरची सर्वांत खराब कामगिरी. याशिवाय पर्यावरणवादी ग्रीन पार्टीला ११.६१ टक्के मते (८५ जागा) आणि दी लिन्के या डाव्या पक्षाला ८.७७ टक्के मते (६४ जागा) मिळाली.
नवीन सरकार कोणाचे?
जर्मनीतील राजकीय परंपरेप्रमाणे याही वेळी नवे सरकार हे आघाडी सरकारच राहील. विशेष म्हणजे, यावेळी सीडीयू आणि एसपीडी या दोन कडव्या विरोधी राजकीय पक्षांचे मिळून आघाडी सरकार बनेल हे जवळजवळ निश्चित आहे. गेल्या खेपेस एसपीडीने ग्रीन आणि एफपीडी या पक्षास हाताशी धरून आघाडी सरकार बनवले होते. पण यंदा एफपीडी या पक्षास पाच टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाल्यामुळे हा पक्ष बुंडेस्टॅगसाठी पात्रच ठरू शकला नाही. ग्रीन पक्षाचेही मताधिक्य घटले. दुसरीकडे, सीडीयू-सीएसयू आघाडीला सर्वाधिक २०८ जागा मिळत असल्या तरी ६३० सदस्यीय बुंडेस्टॅगमध्ये बहुमतासाठी लागणाऱ्या ३१६ जागांपेक्षा हा आकडा खूपच कमी आहे. सीडीयू आणि एसपीडी या दोन्ही पक्षांनी निवडणुकीपूर्वीच, एएफडी या अतिउजव्या पक्षाची मदत सरकार बनवण्यासाठी घेणार नसल्याचे निक्षून जाहीर केले आहे. त्यामुळे १५२ जागा मिळालेल्या एएफडीला विरोधी बाकांवरच बसावे लागेल. अशा परिस्थितीत १२० जागा जिंकलेल्या एसपीडीबरोबर आघाडी करण्यावाचून दुसरा पर्याय सीडीयूसमोर दिसत नाही. या दोन पक्षांना मिळून ३२८ जागांचे साधे बहुमत प्राप्त परिस्थितीत दोन्ही पक्षांसाठी स्वीकारार्ह ठरते.
नवीन चान्सेलर कोण?
सीडीयूचे नेते फ्रीडरीश मेर्झ हे जर्मनीचे नवे चान्सेलर बनणार हे जवळजवळ निश्चित आहे. निवडणुकीपूर्वीच त्यांच्या पक्षाने फ्रीडरीश यांच्या नावाची घोषणा भावी चान्सेलर म्हणून केली होती. मेर्झ हे लक्षाधीश वकील असून गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. सन २०००मध्ये ते सीडीयूचे अध्यक्ष होते. पण अँगेला मर्केल यांच्याशी पक्षांतर्गत स्पर्धेत ते मागे पडले. पुढे मर्केल १६ वर्षे चान्सेलर आणि युरोप व जगातील प्रमुख नेत्या म्हणून वावरल्यामुळे मेर्झ जवळपास विस्मृतीत गेले होते. मात्र मावळते चान्सेलर ओलाफ शोल्त्झ यांच्या ढासळत्या कारकीर्दीत आणि मर्केल यांनी निवृत्ती पत्करल्यानंतर मेर्झ यांच्या राजकीय कारकीर्दीचे पुनरुज्जीवन झाले.
ट्रम्प, अमेरिकेला इशारा
युरोपला अमेरिकेपासून ‘स्वतंत्र’ करण्यास प्राधान्य राहील, असे मेर्झ यांनी जाहीर केले आहे. युरोपिय समुदायाने सरंक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले पाहिजे. याबाबत फ्रान्स आणि ब्रिटनशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. स्थलांतरितांबाबत त्यांचा पवित्रा शोल्त्झ किंवा मर्केल यांच्यापेक्षा अधिक कठोर असेल. या मुद्द्यावर प्रस्थापित पक्षांविरुद्ध नाराजी भविष्यात परवडणारी नाही, अशा इशारा मेर्झ यांनी दिला आहे. याबरोबरच, जर्मनी आणि युरोप युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असेही मेर्झ यांनी घोषित केले आहे. ट्रम्प यांच्या युक्रेनसंदर्भातील वक्तव्ये आणि निर्णयांबाबत इतर युरोपियन नेते बोटचेपेपणा करत असताना, फ्रीडरीश मेर्झ यांचा थेट ट्रम्पविरोधी पवित्रा उल्लेखनीय ठरतो. अमेरिकेकडून काय अपेक्षित धरावे किंवा धरू नये याची पूर्ण कल्पना आहे, असा टोलाही त्यांनी ट्रम्प यांना लगावला.