अमेरिकेतील धनाढ्य आणि वयोवृद्ध गुंतवणूकदार तसेच दानवीर जॉर्ज सोरोस यांचे नाव सध्या भारताच्या राजकीय पटलावर गाजते आहे. भाजपने त्यांना स्वतःचा आणि भारताचा शत्रू ठरवले आहे. त्यांच्या आरोपांवरून तरी असे दिसते, की सोरोस आणि काँग्रेसच्या नेत्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. शिवाय काश्मीरविषयी सोरोस यांची भूमिका आणि मतेही वादग्रस्त असल्याचे आरोप होताहेत. नेमके वास्तव काय, याचा आढावा.
भाजपचे आरोप काय?
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ९ नोव्हेंबर रोजी सोनिया गांधी यांचे जॉर्ज सोरोस यांच्या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप केला. त्याच्या आदल्या दिवशी भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरूनही सोरोस आणि सोनिया-राहुल यांच्यातील कथित संबंधांवर सविस्तर टिप्पणी नोंदवण्यात आली. सोनिया गांधी ज्या संघटनेशी संलग्न आहेत, त्या संघटनेस जॉर्ज सोरोस फाउंडेशनकडून अर्थसाह्य होते. या फाउंडेशनने काश्मीर हे स्वतंत्र राष्ट्र असल्याच्या संकल्पनेस पाठिंबा दिला होता, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. सोनिया गांधी या ‘फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स – एशिया-पॅसिफिक’ (एफडीएल-एपी) या संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत. याच संघटनेला सोरोस फाउंडेशनचे पाठबळ मिळते. एफडीएल-एपीने काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र म्हटले आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय शक्तींचा हात असल्याचे यातून स्पष्ट होते, असे भाजपने म्हटले आहे.
जॉर्ज सोरोस कोण?
९२ वर्षीय जॉर्ज सोरोस हे हंगेरियन-अमेरिकन गुंतवणूक सल्लागार आणि दानवीर (फिलांथ्रोपिस्ट) आहेत. हंगेरीत जन्मलेले सोरोस यांचे उच्च शिक्षण लंडनमध्ये झाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. अमेरिकेत त्यांनी १९७३मध्ये हेज फंड स्थापला. बाजारातील अस्थिरतेचा परताव्यावर परिणाम होऊ नये यासाठीची जोखीममुक्त व्यवस्था वा निधी म्हणजे हेज फंड. हेज फंड क्षेत्रातले आद्यप्रवर्तक म्हणून सोरोस यांना गौरवले जाते. चलनबाजारतही त्यांनी मोठी गुंतवणूक केली. जगातील अत्यंत धनाढ्य गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून ते गणले जातात. ५ डिसेंबर २०२४पर्यंत त्यांच्या संपत्तीची मोजदाद जवळपास ६.५ अब्ज डॉलर इतकी होते. या अवाढव्य संपत्ती विनियोग त्यांनी अनेक सनमाजोपयोगी कामांसाठी केला आहे. मानवी हक्क, आरोग्य, शिक्षण, माध्यमस्वातंत्र्य, शोध पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांमध्ये सोरोस यांचे योगदान भरीव आहे. त्यांनी ओपन सोसायटी फाउंडेशन्स (ओएसएफ) ही अनेक संस्था, संघटना, प्रकल्पांची शिखर संघटना स्थापन केली.
हेही वाचा : एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?
सोरोस यांचे भारत ‘कनेक्शन’
ओएसएफ ही फाउंडेशन १९९९पासून भारतात सक्रिय आहे. सुरुवातीस शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्ती देण्याचे काम ही फाउंडेशन करत असे. २००८पासून भारतातील नवउद्यमींना (स्टार्टअप) मदत करण्यासाठी फाउंडेशन जवळपास ९ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. बंगळूरुतील अस्पदा इन्वेस्टमेंट्स ही कंपनी या फाउंडेशनचे काम पाहते. सोनिया गांधी यांनी स्थापलेली राजीव गांधी फाउंडेशन संस्थेचे जॉर्ज सोरोस फाउंडेशनशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप आहे. राहुल गांधी यांची अदानींवर आरोप करणारी पत्रकार परिषद सोरोस-चलित ‘ओसीसीआरपी’ वाहिनीने जगभर पोहोचवली, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. अॅमस्टरडॅमस्थित ‘ओसीसीआरपी’ अर्थात ऑर्गनाइज्ड क्राइम अँडकरप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट हे शोध पत्रकार आणि माध्यमांचे नेटवर्क भारतविरोधी असल्याचा आरोप वारंवार होतो. ‘ओसीसीआरपी’नेच गेल्या वर्षी अदानी समूहावर आरोप केले होते. अदानींवर अति विसंबून राहणे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अहितकारक ठरू शकते, असे ‘ओसीसीआरपी’ने म्हटले होते. खुद्द सोरोस यांनी एकदा मोदी हे लोकसाहीवादी नसल्याचे विधान केले होते. तेव्हापासून भाजपने ‘ओसीसीआरपी’चे प्रणेते जॉर्ज सोरोस यांच्यावर शरसंधान चालवले आहे.