सध्याच्या घडीला आपल्या देशात एका विदेशी अब्जाधीशाचं नाव चर्चेत आलं आहे. ते नाव दुसरं तिसरं कुठलंही नाही तर जॉर्ज सोरोस हेच आहे. जॉर्ज सोरोस यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही. जॉर्ज सोरोस यांनी म्युनिक येथील सुरक्षा परिषदेच्या भाषणात गौतम अदाणी यांचा विषय काढला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणी उत्तर द्यावंच लागेल असं म्हटलं आहे. ९२ वर्षीय जॉर्ज सोरोस यांनी अदानी समूहाला बसलेल्या धक्क्यांमुळे भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कमुकवत होईल असे विधान अमेरिकी उद्योजक जॉर्ज सोरोस यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात केलं. आता याचे पडसाद भारतात उमटण्यास सुरूवात झाली आहे.
जॉर्ज सोरोस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
४० मिनिटांच्या आपल्या भाषणात जॉर्ज सोरोस यांनी रशिया युक्रेन युद्ध, अमेरिकेतला सामाजिक तणाव, तुर्कस्तानातला भूकंप, चीनची धोरणं या विषयांना स्पर्श केला. त्यानंतर त्यांनी गौतम अदाणींच्या विषयावरून भारताला लक्ष्य केलं. म्युनिच सुरक्षा परिषदेमध्ये केलेल्या भाषणामध्ये सोरोस म्हणाले की, अदाणी समूहामुळे गुंतवणुकीची संधी असलेला देश या भारताच्या प्रतिमेला धक्का बसला होता. आता या घडामोडींमुळे भारतातील सत्तेवरील मोदींची पकड सैल होईल आणि सध्या अतिशय आवश्यक असलेल्या संस्थात्मक सुधारणांसाठी दरवाजे उघडले जातील असेही सोरोस म्हणाले.
मोदींबाबत काय म्हणाले जॉर्ज सोरोस?
भारत हा एक लोकशाही देश आहे. मात्र या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही मानणारे नाहीत. मुस्लिम समाजाविरोधात चिथावणी देणं हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक भाग आहे. पंतप्रधान मोदी हे खुल्या आणि बंदिस्त समुदायांशी संबंध बाळगून आहेत असंही सोरोस यांनी म्हटलं आहे. उद्योजक गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळचे सहकारी आहेत. त्यांचे भाग्य एकमेकांशी जोडलेले आहे. अदानी यांच्यावर शेअर बाजारात गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. या विषयावर मोदी शांत आहेत. पण त्यांना परकीय गुंतवणूकदारांकडून आणि संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
कोण आहेत जॉर्ज सोरोस?
जर्मनी येथे होत असलेल्या म्युनिक सुरक्षा संमेलनाच्या आधी जॉर्ज सोरोस यांनी म्युनिक विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत असताना सदर वक्तव्य केलेलं आहे. तसेच गौतम अदाणी यांच्या अदाणी समूहाने शेअर मार्केटला वेठीस धरल्यामुळे भारताच्या विश्वासार्हतेला कसा तडा गेला? यावरही भाष्य केले. जॉर्ज सोरोस हे ओपन सोसायटी फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती ८.५ अब्ज डॉलर्स एवढी आहे. लोकशाहीवादी, पारदर्शकतेला प्राधान्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या गटांना ते निधी पुरवत असतात.