पंजाबमध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची दिवसाढवळ्या भर रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर काही वेळेतच कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी उचलली. त्याने ही हत्या सध्या तुरुंगाची हवा खात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्यासोबत मिळून केल्याचंही सांगितलं. यानंतर कॅनडात राहून भारतातील तुरुंगात बंद कैद्यासोबत संगनमत करून हे हायप्रोफाईल हत्याकांड करणारा गोल्डी ब्रार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचाच आढावा घेणारं हे विश्लेषण.
कोण आहे गोल्डी ब्रार?
सतींदर सिंग उर्फ गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे. तो लॉरेन्स बिश्नोई या राजस्थानमधील अजमेर तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टरचा निकटवर्तीय सहकारी आहे. त्याचा पंजाबमधील अनेक खंडणी प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. गोल्डी ब्रार अनेक गुन्ह्यांमध्ये फरार आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला फरीदपूर येथील न्यायालयाने जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येप्रकरणी ब्रारविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग आहे. पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने १ मे २०२२ रोजी भटिंडा येथून गोल्डी ब्रारच्या तीन जवळच्या साथीदारांना अटक केली होती. माळवा भागातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाकडून तो पैसे उकळणार होता, असे सांगण्यात आले होते.
पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडच्या विद्यार्थी राजकारणातून प्रत्यक्षात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव झपाट्याने पुढे आले. पंजाबमध्ये दविंदर बंबिहा ग्रुप आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुपमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे. २०१६ मध्ये झालेल्या चकमकीत दविंदर बंबीहा मारला गेला होता. मात्र त्यानंतरही त्यांचा गट आजही सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंबिहा ग्रुप आर्मेनियामध्ये बसलेल्या लकी पटियालच्या नेतृत्वाखाली चालतो.
७ ऑगस्ट २०२१ रोजी मोहालीमध्ये युवा अकाली नेते विक्रम सिंह उर्फ विक्की मिड्दुखेडा यांची हत्या करण्यात आली होती. याची जबाबदारी बंबिहा ग्रुपने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली होती. विकी मिड्दुखेडा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करत असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे बंबिहा ग्रुपने म्हटले होते.
हेही वाचा : सिद्धू मुसेवाला यांच्या आईची संतप्त प्रतिक्रिया, मुलाच्या हत्येला पंजाब सरकार जबाबदार असल्याचा आरोप
लॉरेन्स बिश्नोई गटाने मुसेवाला या हत्येत सामील असल्याचा दावा केला होता. मूसेवाला यांच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळावरून तीन एके-९४ रायफलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.