इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात इस्रायलच्या सैन्यातील भारतीय वंशाच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या दक्षिणेतील दिमोना शहरातील वीस वर्षीय हॅलेल सोलोमनचा युद्धात लढताना मृत्यू झाल्याचे टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटले आहे. बुधवारी (१ नोव्हेंबर) सोलोमन रणगाड्यावर तैनात असताना हमासच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात सोलोमनचा मृत्यू झाला. या हल्ल्यात गिवाती इन्फन्ट्री ब्रिगेडच्या तझाबर बटालियनमधील इस्रायलचे ११ सैनिक मारले गेले. दिमोना शहराचे महापौर बेन्नी बिटन यांनी सोलोमनच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेन्नी बिटन यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही सोलोमनचे पालक रोनित आणि मोरदेचाय यांच्या दुःखात सहभागी आहोत. तसेच यास्मिन, हिला, वेरेड आणि शेक्ड यांचेही दुःख समजू शकतो. सेवा देण्याच्या उद्देशाने सोलोमन लष्करात सामील झाला होता आणि गिवती ब्रिगेडच्या माध्यमातून देशासाठी लढत होता. आपल्या पालकांना अभिमान वाटेल असे सोलोमनचे वागणे होते. तो एक चांगला पुत्र होता. चांगली मूल्य जोपासणाऱ्या सोलोमनने नम्रता आणि माणुसकी कधी सोडली नाही. संपूर्ण दिमोना शहर आज दुःखाच्या सागरात लोटले गेले आहे.”

हे वाचा >> इस्रायल-हमास संघर्ष लोकांना नको असला तरी नेत्यांना हवा आहे का?

इस्रायलमधील छोटा भारत

इस्रायलच्या दक्षिणेकडे आण्विक अणुभट्टीचे शहर म्हणून दिमोना शहराची ओळख आहे, त्यासोबतच या शहराला छोटा भारत म्हणूनही ओळखले जाते. या शहरात भारतातून आलेल्या अनेक ज्यूंची वस्ती आहे. भारतीय ज्यू समुदायापैकी एका व्यक्तीने पीटीआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना सांगितले की, सोलोमन एक तरुण आणि उत्साही असे व्यक्तिमत्व होते. त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल होता. इस्रायलच्या अस्तित्त्वाच्या लढाईसाठी सोलोमन आणि त्यासारखे अनेक तरुण आपल्या प्राणाची आहुती देत आहेत, असे सांगून सोलोमनच्या मृत्यूबाबत भारतीयांनी शोक व्यक्त केला.

गाझापट्टीत चालू असलेल्या युद्धात ११ इस्रायली सैनिक मारले गेले, याचे वर्णन करताना पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी या युद्धाला सर्वात कठीण युद्ध असल्याचे आणि अतिशय दुःखद नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच जोपर्यंत विजय प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही युद्ध लढू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. “आपण सध्या कठीण परिस्थितीतून जात आहोत, हे युद्ध खूप वेळ चालणार आहे. आपल्याला अनेक आघाड्यांवर निर्णायक विजय मिळाला, पण सैनिक गमावणे हे आपल्यासाठी वेदनादायी असे नुकसान आहे”, अशी प्रतिक्रिया नेत्यानाहू यांनी दिली.

नेत्यानाहू पुढे म्हणाले, “आपला प्रत्येक सैनिक आपल्यासाठी विश्वासमान आहे. इस्रायलच्या प्रत्येक नागरिकाला सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अभिमान वाटत असून आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. सैनिकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरातील सदस्य गमावावा लागला, त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो. आमचे सैनिक इस्रायलच्या भूमीला न्याय मिळवून देण्यासाठी या युद्धात उतरले आहेत. हे युद्ध आपल्या हक्काच्या घरासाठी चाललेले युद्ध आहे.”

इस्रायलच्या नागरिकांना आश्वस्त करतो की, मी माझे काम पूर्ण करेनच आणि विजयदेखील आपलाच होईल, यावर नेत्यानाहू यांनी भर दिला.

हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर बेसावधपणे हल्ला केला, ज्यामध्ये १,४०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच हमासने २४० हून अधिका लोकांचे इस्रायलमधून अपहरण करून त्यांना ओलिस ठेवले आहे. इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल युनायटेड स्टेट्स आणि इतर पाश्चिमात्य देशांच्या सहाय्याने हमासविरोधात युद्ध घोषित केले. गाझापट्टीवर २००७ पासून हमासने नियंत्रण मिळवलेले आहे. गाझापट्टीतून हमासला नेस्तनाबूत करणे आणि त्यांच्या तावडीतून ओलिसांची सुटका करण्याची रणनीती इस्रायलने आखली आहे.

इस्रायलने हल्ले सुरू केल्यापासून गाझापट्टीतील ८००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ८ ऑक्टोबरपासून इस्रायलने गाझापट्टीवर हवाई हल्ले सुरू केले, त्यानंतर आता जमिनीवरून आक्रमण करण्याची तयारी इस्रायलने केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is halel solomon the 20 year old indian origin israeli soldier killed in gaza kvg