अमेरिकेच्या निवडणुकांकडे प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील शिकागो येथे डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन (डीएनसी) सुरू आहे. हे एक पक्षांतर्गत अधिवेशन असून निवडणुकीच्या आधी याला खूप महत्त्व आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पक्षांतर्गत किती पाठिंबा आहे, हे या सत्रात प्रत्यक्ष दिसून येते. बुधवारी याचे तिसरे सत्र पार पडले. या सत्रात हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ओलिस ठेवलेल्या तरुणाच्या पालकांचे स्वागत करण्यात आले.
जॉन पॉलिन आणि रॅचेल गोल्डबर्ग-पॉलिन यांचा मुलगा हर्ष गोल्डबर्ग-पॉलिनचे अपहरण करण्यात आले होते. त्यांनी गाझामध्ये बंदिवान असलेल्या लोकांच्या सुटकेसाठी विनवणी करत मंचावर एक भावनिक भाषण केले. ‘टाइम्स नाऊ’नुसार, शिकागोमध्ये हे अधिवेशन पाहण्यासाठी दररोज २० दशलक्ष अमेरिकन एकत्र येत आहेत. कोण आहे हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन? तो इतका चर्चेत असण्याचे कारण काय? जाणून घेऊ.
हेही वाचा : ‘या’ देशात मुलांचे संगोपन करण्यासाठी भाड्याने मिळतात आई-वडील; ‘प्रोफेशनल पॅरेंट’ ही संकल्पना नक्की काय आहे?
हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन कोण आहे?
७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर अपहरण करण्यात आलेल्या आठ अमेरिकन लोकांमध्ये हर्षचाही समावेश होता. तो गाझा पट्टीजवळील जंगलातील नोव्हा संगीत महोत्सवात होता, तेव्हा हमासच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांनी इस्रायलच्या सीमेवरील कुंपण तोडले आणि हल्ला केला; ज्यात सुमारे १२०० लोक मारले गेले. इस्रायलच्या अंदाजानुसार त्यावेळी २५३ जणांचे अपहरण करण्यात आले. मारल्या गेलेल्या लोकांपैकी सुमारे ३६० लोक उत्सवाला उपस्थित होते. हमासचा हल्ला सुरू झाला तेव्हा हर्ष ‘ॲडव्हरटाईझ ॲज सेलिब्रेटिंग पीस’ या संगीत महोत्सवात होता, असे त्याची आई रॅचेलने संमेलनात सांगितले. अपहरण होण्यापूर्वी हर्ष इतर २७ जणांसह रस्त्याच्या कडेला असलेल्या बॉम्ब आश्रयस्थानात होता. मात्र, हमासचे बंदूकधारी बाहेर जमले आणि त्यांनी ग्रेनेड फेकण्यास सुरुवात केली.
अपहरणावेळी ग्रेनेडमुळे हर्षच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. मुलाचे आई आणि वडील दोघांनीही आपल्या कपड्यांवर ३२० क्रमांकाचे स्टीकर चिकटवले होते. त्यांच्या मुलाला किती दिवस बंदी ठेवण्यात आले, हे त्याचे प्रतीक होते. या वर्षाच्या मे महिन्यात हमासच्या टेलिग्राम खात्यावर हर्षचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये हर्षच्या हाताला दुखापत झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याने मुद्दाम कॅमेरासमोर आपला हात वर केला होता, असे ‘बीबीसी’च्या वृत्तात दिले आहे. त्याने गाझामधील इस्रायलच्या लष्करी मोहिमेवर टीका केला आणि आपल्या पालकांना व दोन बहिणींना सुटकेसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची विनंती केली. त्याची आई रॅचेल म्हणाली की, उपाध्यक्ष कमला हॅरिसप्रमाणेच त्यांचा जन्मही कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे झाला. अपहरणाच्या चार दिवस आधी तो २३ वर्षांचा झाला होता.
परत आणण्याची विनंती
“हे राजकीय अधिवेशन आहे, पण आमचा एकुलता एक मुलगा आणि ओलिसांना घरी आणणे हा राजकीय मुद्दा नाही, ही एक मानवतावादी समस्या आहे,” असे जॉन पॉलिन म्हणाले. जॉन पॉलिन आणि त्यांची पत्नी रॅचेल गोल्डबर्ग-पॉलिन यांच्या भाषणावर शिकागोमधील हजारो डेमोक्रॅटिक लोकप्रतिनिधींद्वारे ‘त्याला घरी आणा’ अशा घोषणा करण्यात आल्या. हर्षच्या वडिलांनी दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे आणि विशेषतः बायडेन प्रशासनाच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आम्ही सर्व त्यांचे मनापासून आभारी आहोत. ओलिस कुटुंबांना अमेरिका आणि जगभरातील लाखो लोक जे प्रेम आणि समर्थन देत आहेत, त्यासाठी आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत,” असे ते पुढे म्हणाले.
“आपल्या ज्यू परंपरेत आपण म्हणतो, प्रत्येक व्यक्ती हे संपूर्ण विश्व आहे. आपण या सर्व विश्वाचे रक्षण केले पाहिजे. मध्यपूर्वेमध्ये एकच गोष्ट शांतता आणू शकते आणि ती म्हणजे १०९ ओलिसांना त्यांच्या घरी सोडणे. हा गाझामधील निष्पाप नागरिकांचे दुःख संपवणारा करार आहे,” असे जॉन म्हणाले. ‘डीएनसी’च्या मंचावर भाषण करताना हर्षची आई रॅचेल भावुक झाल्या आणि म्हणाल्या, “हर्ष जर तू आम्हाला ऐकू शकत असशील तर मला सांगायचे आहे की, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू धीर सोडू नकोस.” गाझामध्ये अजूनही १०० हून अधिक ओलिस आहेत, परंतु काही मारले गेल्याचे मानले जात आहे. आठ अमेरिकन ओलिसांपैकी सहा जणांचे कुटुंब शिकागोमधील आहे, ते त्यांच्या प्रियजनांच्या प्रतीक्षेत आहे.
ओमेर न्यूट्रा या अमेरिकन नागरिकाचे पालक रोनेन आणि ओरना न्यूट्रा यांना बंदिवासात ठेवण्यात आले आहे, त्यांना गेल्या महिन्यात रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात भाषणाची संधी देण्यात आली होती. “सर्व नेत्यांनी हमास आणि इस्रायली सरकार या दोघांवर दबाव आणण्यासाठी द्विपक्षीय पद्धतीने एकत्र काम केले पाहिजे आणि असे करार लवकरात लवकर केले पाहिजे,” असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.
डेमोक्रॅटसाठी संवेदनशील मुद्दा
या भाषणाने इस्रायल-हमास संघर्षाला एक भावनिक चेहरा दिला. डेमोक्रॅटला पॅलेस्टिनी निदर्शकांच्या दबावाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायल-हमास युद्ध ज्या पद्धतीने हाताळले त्याबद्दल त्यांच्यात नाराजी आहे. असोसिएटेड प्रेसनुसार, अधिवेशनादरम्यान पॅलेस्टिनींना बोलण्याची संधी देण्यात आली होती, मात्र त्यांनी अधिकार्यांची विनंती नाकारली.
“उपाध्यक्षांनी आम्हाला परत बोलावून सांगावे की, पॅलेस्टिनी अमेरिकन लोकांची दडपशाही डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित नाही आणि पॅलेस्टिनी स्पीकर या मंचावर बोलतील,” असे अनकमिटेड नॅशनल मूव्हमेंटचे सह-संस्थापक अब्बास अलावीह म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मी कॉलची वाट पाहत आहे.” मंगळवारी, इस्रायली वाणिज्य दूतावासाबाहेर सुरू झालेल्या आणि आजूबाजूच्या रस्त्यावर पसरलेल्या निषेधादरम्यान पोलिसांशी चकमक झाल्यानंतर अनेक पॅलेस्टिनी निदर्शकांना अटक करण्यात आली. बायडेन यांनी बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोलले आहेत. अमेरिका इस्रायल आणि हमासवर ‘ब्रिजिंग प्रस्ताव’ मान्य करण्यासाठी दबाव आणत आहे; ज्यामुळे युद्धविराम लागू शकेल.
© IE Online Media Services (P) Ltd