खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या धामधुमीत कॅनडाचे खासदार जगमित सिंग यांच्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. दहशतवादी निज्जरला न्याय मिळवून देण्याची शपथ भारतीय वंशाचे शीख असेल्या सिंग यांनी घेतली आहे. त्यामुळेच ते कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर खलिस्तानवादी राजकारण करण्याबाबत प्रभाव टाकत असल्याचे बोलले जात आहे. सिंग कोण आहेत? आणि ट्रुडो यांच्यावर ते कसा प्रभाव पाडत आहेत? याबाबत फर्स्टपोस्टने एक लेख लिहिला आहे. त्याबाबत घेतलेला आढावा …
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोण आहे जगमित सिंग?
जगमित सिंग कॅनडामधील न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (NDP) या डाव्या विचारसरणीच्या पक्षाचे प्रमुख आहेत. एनडीपीच्या वेबसाईटनुसार सिंग यांचे पालक नोकरीधंद्याच्या शोधात भारतातून कॅनडात आले. सीबीसी वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार सिंग याचा जन्म २ जानेवारी १९७९ रोजी स्कारबोरो शहरातील ओंटारियो येथे झाला. स्कारबोरो येथेच सिंग लहानाचे मोठे झाले. एनडीपीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सिंग वकील, मानवाधिकार कार्यकर्ता आणि राजकारणी असल्याचे सांगितले आहे.
हे वाचा >> विश्लेषण : कॅनडामध्ये ‘खलिस्तान’ चळवळ अजूनही का जिवंत?
इकॉनॉमिक टाइम्सच्या माहितीनुसार, सिंग यांनी वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठातून २००१ साली जीवशास्त्र विषयात बीएससीची पदवी घेतली. तसेच २००५ साली यॉर्क विद्यापीठाच्या ओसगूड हॉल लॉ स्कूल येथून कायद्याची पदवी घेतली. राजकारणात येण्यापूर्वी सिंग ग्रेटर टोरंटो येथे फौजदारी वकील म्हणून सेवा देत होते. २०११ साली सिंग ओंटारियो येथून प्रांतीय विधिमंडळ सदस्य (MPP) म्हणून निवडून आले आणि २०१७ पर्यंत ते या पदावर होते. ओंटारियोच्या विधिमंडळात पगडी परिधान केलेला पहिला शीख सदस्य म्हणून सिंग यांची ओळख आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी सिंग एनडीपी पक्षाचे नेता बनले. इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, कॅनडाच्या राजकीय पक्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाचा प्रमुख म्हणून कृष्णवर्णीय नेत्याची निवड होणे ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.
सिंग यांच्या हातात पक्षाचे प्रमुखपद आल्यानंतर अमेरिकेतील पुरुषांसाठी वाहिलेल्या प्रसिद्ध अशा जीक्यू मासिकाने (GQ magazine) सिंग यांच्यावर लेख लिहिला. जीक्यू मासिक फॅशन, पेहराव या विषयांवरील लिखाणासाठी प्रसिद्ध आहे. मासिकाने सिंग यांच्या पेहरावाचे कौतुक करत कॅनडाच्या राजकारणातील उदयास येणारा तारा, असे त्यांचे वर्णन केले होते.
कॅनडाच्या दक्षिण बर्नाबी मतदारसंघातून २०१९ साली सिंग खासदार म्हणून निवडून आले आणि कॅनडाच्या संसदेत पोहोचले. दक्षिण बर्नाबी येथे पत्नी गुरकिरण आणि मुलगी अनहद यांच्यासह सिंग वास्तव्यास आहेत. सिंग फ्रेंच आणि पंजाबी भाषा अस्खलितपणे बोलतात.
पंतप्रधान ट्रुडो यांच्यावर प्रभाव
खलिस्तान आणि निज्जरला समर्थन देण्यावरून पंतप्रधान ट्रुडो यांच्यावर सिंग प्रभाव टाकत आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये, कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाचा विजय होऊनही त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मार्च २०२२ मध्ये ट्रुडो यांनी सिंग यांच्या एनडीपी पक्षासह आघाडी करण्याचा निर्णय घेतला. या बदल्यात त्यांना फार्मास्युटिकल आणि डेंटल केअर योजनांबाबत एनडीपीशी तडजोड करावी लागली.
हे वाचा >> हरदीपसिंग निज्जर ते अर्शदीप, एनआयएने पंजाबमधील टोळ्यांवर कशी कारवाई केली?
ट्रुडो यांनी आघाडी केल्यानंतर बोलताना सांगितले होते, “आम्ही एकत्र येऊन काम करण्याचे मान्य केले आहे. आम्ही कोणत्या बाबींवर एकमेकांशी सहमत नाहीत, त्याऐवजी आम्ही कोणत्या बाबींवर सहमत आहोत, यावर अधिक लक्ष केंद्रित करून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” कॅनडातील जुन्या पक्षांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी मात्र ट्रुडो यांच्यावर आघाडी केल्याबाबत टीका केली होती. इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, कॅनडाची सत्ता टिकवण्यासाठी ट्रुडो यांचा पक्ष एनडीपीवर अवलंबून आहे.
सिंग यांचा व्हिसा भारताने नाकारला
२०१३ साली जगमित सिंग भारतात येण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, भारत विरोधी कारवाया आणि कट्टरतावादी घटकांशी संबंध असल्यामुळे भारताने त्यांचा व्हिसा फेटाळला होता. दोन एनजीओकडून “शीख ऑफ द इयर” हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमृतसरला जायचे असल्याचा दावा सिंग यांनी केला होता. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सिंग यांनी सांगितले की, नोव्हेंबर १९८४ रोजी शीख विरोधी दंगलीतील पीडितांच्या न्याय-हक्कांसाठी आवाज उचलल्यामुळे भारत सरकार त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळेच त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला.
ग्लोब अँड मेलच्या बातमीनुसार, सॅन फ्रान्सिस्को येथे जून २०१५ साली खलिस्तानच्या समर्थनार्थ झालेल्या मोर्च्यात सिंग यांचा सहभाग होता. जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा फोटो असलेल्या मोठ्या फलकासमोर उभे राहून जगमित सिंग यांनी भाषण ठोकले, असे व्हिडीओ प्रसारित झाले असल्याचेही ग्लोब अँड मेल या वर्तमानपत्राने बातमीत म्हटले होते. स्वतंत्र शीख राष्ट्राच्या निर्मितीसाठी भिंद्रनवाले याने शीख लोकांमध्ये बंडखोरीची बिजे रोवली होती. १९८४ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबवून भिंद्रनवाले आणि त्याच्या समर्थकांचा खात्मा केला होता. यासाठी अमृतसरच्या शीखांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या सुवर्ण मंदिरात लष्काराला पाचारण करण्यात आले होते.
हे ही वाचा >> निज्जरच्या हत्येवरून कॅनडा-भारत संबंध बिघडणार? भारतीय गुप्तहेरांची खरेच ‘मोसाद’ शैलीत कारवाई?
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भारतात काही ठिकाणी शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. भारताने शीखांचा नरसंहार केला, असा आरोप सिंग यांच्याकडून वारंवार करण्यात आला आहे. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिंग यांनी म्हटले की, आम्ही नरसंहाराबाबत वारंवार का बोलतो? आमच्या लोकांनी त्यावेळी काय सहन केले? याची चर्चा आम्ही वारंवार करत राहणार. कारण ज्या देशात आम्ही राहतो, त्या देशाने आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला. त्या देशाने आमच्या पवित्र सुवर्ण मंदिरावर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला चढविला.
निज्जरची हत्या अपमानजनक आणि धक्कादायक
हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. तसेच कॅनडासाठी हे अपमानजनक आणि धक्कादायक असल्याची बतावणी त्यांनी केली आहे. निर्बंध घातलेल्या खलिस्तान टायगर फोर्स (KTF) या संघटनेचा प्रमुख असलेला ४५ वर्षीय निज्जरला भारताने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याच्यावर दहा लाखांचे रोख बक्षीसही ठेवण्यात आले होते.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यानंतर सिंग याने ट्विटरवर एक ट्विट केले.
Today we learned of allegations that agents of the Indian Government murdered Hardeep Singh Nijjar — a Canadian killed on Canadian soil.
— Jagmeet Singh (@theJagmeetSingh) September 18, 2023
To all Canadians, this is my vow.
I will leave no stone unturned in the pursuit of justice, including holding Narendra Modi accountable.
सिंग यांनी दावा केला की, जेव्हा तुम्ही मानवी हक्कांसाठी भारतविरोधी भूमिका घेऊन त्यांना आव्हान देता, तेव्हा तुमचा भारतात जाण्यासाठीचा व्हिसा नाकारला जातो. अशा कथा ऐकत आम्ही मोठे झालो आहोत. परंतु, कॅनडाच्या पंतप्रधानांनी (ट्रुडो) कॅनडाच्या भूमीत एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये परकीय सरकारचा हात असल्याची संभावना व्यक्त केली आहे, ही बाब आमच्यासाठी आणि कॅनडासाठी मात्र नवी आहे.
आणखी वाचा >> हरदीप सिंग निज्जर कोण होता? खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून कॅनडाने भारतावर आरोप का केले?
कॅनडाच्या अंतर्गत कारभारात बाहेरील देश हस्तक्षेप करत असल्याबाबत कॅनडाने चौकशी सुरू केली आहे. विशेषतः चीनला डोळ्यासमोर ठेवून चौकशी सुरू करण्यात आली. या यादीत भारताचाही समावेश करावा, अशी मागणी सिंग यांनी सप्टेंबरमध्ये केली होती. सिंग यांनी म्हटले, “एक शीख कॅनेडियन नागरिक असण्याच्या माझ्या अनुभवानुसार भारत कॅनेडियन नागरिकांच्या लोकशाही अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत असल्याची शंका मला नेहमीच येत होती. पंतप्रधानांच्या आताच्या भूमिकेमुळे ही शंका योग्य असल्याचे सिद्ध होते.”