अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सरकारमध्ये अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश केला आहे. नुकतीच त्यांनी कोलकाता येथे जन्मलेल्या जय भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्था (एनआयएच)च्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. ही संस्था देशातील ४७.३ अब्ज डॉलर्सचा बजेट असलेली देशातील वैद्यकीय संशोधनात प्रमुख सार्वजनिक निधी देणारी संस्था आहे. एनआयएच ही आरोग्य आणि मानव सेवा विभाग (एचएचएस) अंतर्गत कार्यरत असून, वैद्यकीय संशोधन आणि नवोपक्रमासाठी जबाबदार असलेली प्राथमिक यूएस सरकारी संस्था आहे.
नामांकनाची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, स्टॅनफोर्डचे प्राध्यापक आणि अमेरिकेतील कोविड धोरणांचे प्रमुख समीक्षक भट्टाचार्य हे रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्याबरोबर काम करतील. “एनआयएचला वैद्यकीय संशोधनाच्या सुवर्ण मानकावर पोहोचविण्यासाठी ते देशातील दीर्घकालीन आजार आणि रोगाच्या संकटासह अमेरिकेतील सर्वांत मोठ्या आरोग्यविषयक आव्हानांवर उपाय शोधतील,” असे ते म्हणाले. या आठवड्याच्या सुरुवातीला भट्टाचार्य रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांना भेटले आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या म्हणण्यानुसार, एनआयएचमध्ये सुधारणा करण्याच्या त्यांच्या प्रस्तावांनी त्यांना प्रभावित केले. भट्टाचार्य हे जगातील आघाडीच्या वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख असतील, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्त दिले आहे. ‘एनआयएच’मध्ये २७ संस्था आणि केंद्रे समाविष्ट आहेत. प्रत्येक संस्था विशिष्ट संशोधन कार्यक्रमासाठी आहे; ज्यामध्ये कर्करोग आणि हृदयरोग यांसारख्या रोगांचा समावेश आहे. कोण आहेत जय भट्टाचार्य? जाणून घेऊ.
हेही वाचा : आता उपचारासाठी इंजेक्शनची गरज नाही? शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या कॅप्सूल काय आहेत? त्या कशा उपयुक्त ठरणार?
कोण आहेत जय भट्टाचार्य?
जयंता भट्टाचार्य यांचा जन्म १९६८ मध्ये कोलकाता येथे झाला. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात आरोग्य धोरणाचे प्राध्यापक आहेत आणि अमेरिकेतील नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चमध्ये संशोधन सहयोगी म्हणून काम करतात. स्टॅनफोर्ड विद्यापीठात एमडी व पीएच.डी. या दोन्ही पदव्या पूर्ण केल्यानंतर, भट्टाचार्य यांनी स्टॅनफोर्ड सेंटर फॉर डेमोग्राफी ॲण्ड इकॉनॉमिक्स ऑफ हेल्थ ॲण्ड एजिंग येथे संचालक म्हणून काम केले; जिथे त्यांनी आरोग्य धोरण आणि आर्थिक संशोधनात योगदान दिले. स्टॅनफोर्डच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भट्टाचार्य यांचे संशोधन असुरक्षित गटांचे आरोग्य सुधारण्यावर केंद्रित आहे.
अलीकडे त्यांनी कोविड-१९ च्या महामारी विज्ञानाच्या अभ्यासात आणि साथीच्या आजाराशी संबंधित धोरणांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे संशोधन विकसित देशांमधील आरोग्य सेवा खर्च, आरोग्याच्या परिणामांवर वृद्ध लोकसंख्येचा कसा परिणाम होतो हे शोधणे, पेमेंट सिस्टीमशी संबंधित डॉक्टरांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे आणि सार्वजनिक आरोग्यावर वैद्यकीय नवकल्पनांच्या प्रभावाचा अभ्यास करणे यांवर आधारित आहे. त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी वैद्यकीय, अर्थशास्त्र, सार्वजनिक आरोग्य, कायदा आणि इतर क्षेत्रांतील शीर्षस्तरीय जर्नल्समध्ये १३५ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे भट्टाचार्य यांनी कोविड-१९ साथीच्या रोगासाठी फेडरल सरकारच्या प्रतिसादावर टीका केली. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी ग्रेट बॅरिंग्टन डिक्लेरेशनचे सह-लेखन केले. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या म्हणण्यानुसार, वृद्ध प्रौढांसारख्या असुरक्षित गटांसाठी केंद्रित संरक्षण लागू करण्याचे आवाहन करणारे पत्र त्यांनी लिहिले. या प्रस्तावाला रिपब्लिकन राजकारण्यांकडून पाठिंबा मिळाला. परंतु, ‘एनआयएच’चे तत्कालीन संचालक फ्रान्सिस एस. कॉलिन्स यांच्यासह सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी यावर टीका केली होती. एनआयएच ही संस्था अमेरिकन वैद्यकीय संशोधनाचा एक मजबूत आधारस्तंभ आहे.
हेही वाचा : २६/११ दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण; मुंबईवरच्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यातील गुन्हेगार कुठे आहेत?
त्याचे महत्त्व असूनही, एजन्सीला नोकरशाहीच्या अकार्यक्षमतेसाठी आणि ग्राउंडब्रेकिंग संशोधनाकडे लक्ष न दिल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला आहे. भट्टाचार्य यांनी एनआयएच तयार करणाऱ्या २७ संस्था आणि केंद्रांपैकी काहींचा प्रभाव मर्यादित करण्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांचे सांगणे आहे की, साथीच्या आजाराच्या काळात काही नागरी सेवकांनी अयोग्यरीत्या राष्ट्रीय धोरणांना आकार देण्याचा प्रयत्न केला.