अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टातील ग्रॅण्ड ज्युरीने आरोप निश्चित केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले. ट्रम्प यांना जामीन मिळाला असला तरी ज्या प्रकरणात त्यांना अटक झाली त्या पॉर्नस्टर स्टॉर्मी डॅनिअलच्या खटल्याचा निकाल काही दिवसांनी लागेल. पण यानिमित्ताने ट्रम्प यांचेच आणखी एक प्रकरण चर्चेत आले आहे. प्रकरण जुनेच असले तरी ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या प्रेम प्रकरणाकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. प्लेबॉय मासिकासाठी ९० दशकात मॉडेलिंग करणाऱ्या ५२ वर्षीय कॅरेन मॅकडोगलने ट्रम्प यांच्यासोबत प्रेम प्रकरण असल्याचा दावा केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहे कॅरेन मॅकडोगल?

कॅरेन मॅकडोगलचा जन्म इंडियानामध्ये झाला होता. त्यानंतर तिचे कुटुंब मिशिगन येथे आले. वयाच्या २० व्या वर्षी कॅरेनने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर तिने प्लेबॉय या जगप्रसिद्ध मासिकासाठी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. नव्वदच्या दशकात पॅमेल ॲण्डरसननंतर कॅरेन दुसऱ्या क्रमांकाची आघाडीची मॉडेल होती. पुढे जाऊन फिटनेस ट्रेनरच्या रूपात तिची ओळख झाली. मॉडेलिंग क्षेत्रासोबतच टीव्ही जाहिराती आणि मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका कॅरेनने केल्या. २००० साली प्रदर्शित झालेल्या चार्लिस एंजल्स या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका केली होती.

कॅरेन मॅकडोगल आणि ट्रम्प यांचे संबंध कसे जुळले?

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दावा केल्यानुसार २००६ साली कॅरेन मॅकडॉगल आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. लॉस एंजल्समधील ‘प्लेबॉय’ मासिकाच्या कार्यालयात दोघे पहिल्यांदा भेटले. ट्रम्प यांचा सहभाग असलेल्या ‘ॲप्रेंटिस’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते, ज्यामध्ये कॅरेनही काम करत होती. ट्रम्प विवाहित असूनही त्यांना माझ्यात रस निर्माण झाला होता, असा दावा कॅरेनने केला. ‘सीएएन’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅरेन म्हणाल्या की, ट्रम्प आणि माझे जवळपास १० महिने प्रेम प्रकरण सुरू होते. एका महिन्यात कमीत कमी पाच वेळा ते भेटायचे. दोघांचीही या नात्याला सहमती होती. ट्रम्प यांनी कधीही माझ्यावर अधिकार गाजवला नाही, असेही कॅरनने म्हटले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : डोनाल्ड ट्रम्प यांना अटकेची भीती का सतावतेय? पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलचा नेमका आरोप काय आहे?

कॅरेन मॅकडोगलची बातमी “कॅच ॲण्ड किल” केली

कॅरेनने सांगितल्यानुसार २००६ आणि २००७ साली तिचे आणि ट्रम्प यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. ट्रम्प यांनी मात्र तिच्यासोबत लैंगिक संबंध असल्याचे कधीच मान्य केले नाही. नॅशनल एन्कायरर (National Enquirer) या दैनिकाची पालक कंपनी असलेल्या अमेरिकन मीडिया आयएनसी (AMI) कंपनीने कॅरेन मॅकडोगलला दीड लाख डॉलर्स देऊन तिच्या प्रेम प्रकरणाच्या बातमीचे स्वामित्व हक्क विकत घेतले होते. हे हक्क विकत घेतल्यामुळे तिला कुठेही तिची बातमी सार्वजनिक करण्यापासून कायदेशीर अटकाव घालण्यात आला होता. अमेरिकेतील माध्यमांमध्ये एखाद्याची बातमी विकत घेऊन ती दाबून टाकण्याच्या पद्धतीला ‘कॅच ॲण्ड किल’ या नावाने ओळखले जाते. ट्रम्प २०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना ही बातमी बाहेर येऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.

स्टॉर्मी डॅनिअलला पैसे दिल्याबाबतच्या खटल्याची सुनावणी मॅनहॅटन न्यायालयात मंगळवारी सुरू असताना स्टॉर्मीच्या वकिलांनी दावा केला की, ट्रम्प यांनी एका महिलेची (कॅरेन मॅकडोगल) बातमी बाहेर येऊ नये यासाठी पैसे दिले होते. कारण राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या इभ्रतीची चिंता होती. वकिलांनी पुढे सांगितले की, ट्रम्प यांचे वकील मायकेल कोहेन आणि एएमआयचे माजी मुख्य अधिकारी डेव्हिड पेकर यांचे ट्रम्प यांच्यासोबत मैत्रीचे संबंध होते. पेकर यांनी कॅरेनला दिलेल्या रकमेची भरपाई ट्रम्प यांनी करून दिली, असे डेव्हिड पेकर यांनी मॅनहॅटन कोर्टात सांगितले. मॅकडोगलने त्यानंतर एएमआयवर खटला दाखल करून तिचे आणि ट्रम्प यांचे संबंध जाहीर न करण्याबाबतचा करार मोडला.

कॅरेनच्या प्रकरणाला २०२१ मध्ये वळण

२०२१ साली कॅरेनच्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले. अमेरिकेच्या निवडणूक आयोगाला २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीतील खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याचे लक्षात आले. कॅरेनच्या बातमीला अमेरिकन मीडिया आयएनसीने विकत घेतले होते, मात्र ती बातमी त्यांनी प्रसारितच केली नव्हती. ज्याची भरपाई ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांनी अमेरिकन मीडिया आयएनसीला दिलेले पैसे कायद्यात बसत नाहीत. यामुळे अमेरिकन मीडिया आयएनसीला याबद्दल १ लाख ८७ हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is karen mcdougal the playboy model which relation with donald trump case kvg
Show comments